অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झांव्हीक्तॉर पॉस्ले

झांव्हीक्तॉर पॉस्ले

झांव्हीक्तॉर पॉस्ले : (१ जुलै १७८८ – २२ डिसेंबर १८६७). फ्रेंच गणितज्ञ व अभियंते. आधुनिक प्रक्षेपीय भूमितीचे भूमिति एक जनक. त्यांचा जन्म मेट्स येथे झाला. त्यांचे शिक्षण पॅरिस येथील एकोल पॉलिटेक्निक (१८०८-१०) व मेट्स येथील एकोल द ॲप्लिकेशन (१८१०-१२) येथे झाले. नंतर त्यांनी अभियंता म्हणून सैन्यात नोकरी धरली. नेपोलियन यांनी रशियावर केलेल्या स्वारीत पाँस्ले हे युद्धकैदी म्हणून पकडले गेले व व्होल्गा नदीवरील सराटव्ह येथे त्यांना बंदीवासात ठेवण्यात आले. १८१४ मध्ये ते फ्रान्सला परतले आणि १८१५-२५ या काळात मेट्स येथे त्यांनी विविध लष्करी अभियांत्रिकीय प्रकल्पांमध्ये काम केले. १८२५-३५ मध्ये ते मेट्स येथील एकोल द अॅप्लिकेशनमध्ये यामिकीचे (प्रेरणांची वस्तूंवरील क्रिया व त्यांमुळे निर्माण होणारी गती यांसंबंधीच्या शास्त्राचे) प्राध्यापक होते. १८३४ मध्ये पॅरिस येथील ॲकॅदेमी दे सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. पुढे ॲकॅदेमीच्या विज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून त्यांनी १८३८-४८ या काळात काम केले आणि त्या वेळी त्यांनी भौतिक व प्रायोगिक यामिकीचा एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमाच्या आधारे त्यांनी औद्योगिक, भौतिक व प्रायोगिक यामिकीवर एक ग्रंथही लिहिला.

१८४८-५० मध्ये त्यांनी एकोल पॉलिटेक्निकचे अधिपती (कमान्डंट) म्हणून काम केले. रशियामध्ये बंदीवासात असताना संदर्भ ग्रंथ उपलब्ध नसतानाही प्रक्षेपीय भूमितीवर संशोधन केले व या विषयावरील आपला विख्यात ग्रंथ Trait des projectvies des figures १८२२ मध्ये प्रसिद्ध केला (पुढे १८६५-६६ मध्ये त्यांनी या ग्रंथाची दुसरी आवृत्ती दोन खंडात तयार केली). या ग्रंथात त्यांनी एका केंद्रातून प्रक्षेपण करण्याच्या पद्धतीवर तसेच सांतत्याच्या तत्त्वावर भर दिला. त्यांनी प्रगुणोत्तराची संकल्पनाही (जर अ, आ, इ, ई हे एका रेषेवरील पृथक् बिंदू असतील, तर इ बिंदू अ आ ला ज्या गुणोत्तरात विभागतो व ई बिंदू ज्या गुणोत्तरात अ आ ला विभागता त्या गुणोत्तरांच्या गुणोत्तराला प्रगुणोत्तर म्हणतात) आपल्या विवेचनात पायाभूत संकल्पना म्हणून वापरली. समजातीय आकृतींचा अभ्यास पाँसले यांनीच सुरू केला. अनंतस्थ वृत्तीय बिंदूचा उपयोग करून त्यांनी आधुनिक भूमितीतील सांतत्याचे तत्त्व प्रस्थापित केले.

प्रक्षेपण, व्यस्तीकरण व समजातीय आकृती यांच्या साहाय्याने त्यांनी शांकवांचे शंकुच्छेद सर्व गुणधर्म प्रस्थापित केले.यंत्रांसंबंधीच्या यामिकीच्या अभ्यासक्रमावर आधारलेला आणि विद्यार्थ्यांकरिता लिहिलेला त्यांचा ग्रंथ (१८२६) तसेच जलचक्कीवरील त्यांचा निबंध हे उल्लेखनीय आहेत. १८५१ मध्ये लंडन येथे व १८५५ मध्ये पॅरिस येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतील औद्यागिक यंत्रे व हत्यारे या विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. लंडन येथी प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून तोपावेतो विविध उद्योगधंद्यांत वापरण्यात येणाऱ्या यंत्रांत व हत्यारांत झालेल्या प्रगतीचा विस्तृत आढावा घेणारा अहवाल दोन खंडांत तयार केला व तो १८५७ मध्ये प्रसिद्ध झाला. पाँस्ले यांनी आउगुस्ट क्रेले यांच्या गणितविषयक नियतकालिकात बरेच लेख लिहिले. त्यातील विशेष महत्त्वाचे लेख भूमितीतील समस्या सांतत्याच्या तत्त्वाचा व असत् घटकांचा संख्या उपयोग करून सोडविण्यासंबंधी होते. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

 

लेखक - स. ज. ओक

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate