অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फेर्दीनां एदवार ब्यूईसां

फेर्दीनां एदवार ब्यूईसां

फेर्दीनां एदवार ब्यूईसां : (२० डिसेंबर १८४१ – १६ फेब्रुवारी १९३२). फ्रेंच शिक्षणतज्ञ, प्राथमिक शिक्षणाचा संघटक व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. पॅरिस येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. पदवीधर झाल्यानंतर त्याने शिक्षकीपेशा पतकरला; तथापि तिसऱ्या नेपोलियनशी एकनिष्ठ राहण्याची शपथ त्याने नाकारली, त्यामुळे त्यास नोकरी गमवावी लागली. पुढे त्याला नशाटेल (स्वित्झर्लंड) येथे अध्यापकाची नोकरी मिळाली (१८६६) जिनीव्हा येथील पहिल्या शांतता परिषदेस तो उपस्थित होता (१८६७). तीत युनायटेड स्टेट्स ऑफ यूरोप असा एक संघ असावा, हे मत त्याने मांडले. तिसऱया नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर फ्रान्समध्ये तिसरे प्रजासत्ताक स्थापन झाले (१८७१). तेव्हा तो फ्रान्सला परतला आणि फ्रँको-प्रशियन युद्धातील (१८७०-७१) पीडितांसाठी त्याने मदतकेंद्र उघडले. त्यानंतर त्याची पूर्वप्राथमिक शिक्षण खात्यात शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शालेय अभ्यासक्रमात धार्मक शिक्षण नसावे, असे त्याचे स्पष्ट मत होते.

पुढे त्याची पॅरिसमधील पव्लिक स्कूलचा महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली (१८७८) ; पण धार्मिक शिक्षणास त्याचा विरोध असल्याने त्यास याही पदाचा राजीनामा द्यावा लागला. चर्चच्या नियंत्रणातून पब्लिक स्कूल ही संस्था स्वायत्त असावी व त्यावर चर्चचे कसलेही नियंत्रण असू नये, यासाठी फ्रान्सचा तत्कालीन पंतप्रथान झ्यूल फेरी याने दोन अधिनियम तयार केले. त्यांचा मसुदा तयार करण्यास ब्यूईसाँने मदत केली (१८८१ व १८८६). त्याच्याच प्रयत्‍नांमुळे फ्रान्समध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले. त्यानंतर त्याची सॉरबॉन विद्यापीठीत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१८९६). त्याने मानवी हक्कांचा पुरस्कार करणारी (लीग ऑफ ह्यूमन राइट्स) संघटना स्थापन करण्यात पुढाकार घेतला (१८९८). पुढे फ्रेंच संसदेवर तो निवडून आला. तिचा तो अनेक वर्षे सदस्य होता (१९०२-१४ व १९१९-२३). पहिल्या महायुद्धापूर्वीच त्याने शांतता व सहजीवन या तत्वांचा पुरस्कार केला आणि महायुद्धकाळात मानवी हक्कांच्या रक्षणासाठी फ्रन्सने केलेल्या लष्करी प्रतिकाराचे त्याने समर्थन केले. पुढे राष्ट्रसंघाच्या स्थापनेला पूर्ण पाठिंबा दर्शविला. मानवी हक्क संघाचा अध्यक्ष (१९१३-२६) या नात्याने तसेच फ्रँको-प्रशियन युद्धात केलेल्या मदतकार्यांमुळे जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक लूटव्हिख क्विहड्बरोबर त्यास विभागून देण्यात आले (१९२७).

राजकारणात त्याने नेहमीच पुरोगामी चळवळीला पाठिंबा दिला आणि स्त्रियांना मताधिकार व प्रमाणशीर प्रतिनिधित्व या लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार केला. त्याने विविध नियतकालिकांतून स्फुट लेख लिहिले. शिक्षणशास्त्रावरील डिक्शनरी द पेडॅगॉगी (इं. भा. ६ खंड, १८८२-९३) हा त्याचा संपादित ग्रंथ प्रसिद्ध आहे. तो त्यलॉय सेंतँत्वान (वाझ) येथे मरण पावला. लूटव्हिख क्विहडे (२३ मार्च १८५८-५ मार्च १९४१) ह्या जर्मन इतिहासकाराचा जन्म ब्रेमेन (जर्मनी) येथे झाला. स्ट्रॅसबर्ग व गर्टिगेन विद्यापीठांत शिक्षण घेतल्यानंतर म्यूनिक विद्यापीठात तो प्राध्यापक म्हणून नोकरीस लागला. जर्मन रिव्ह्यू ऑफ हिस्टॉरिकल सायन्स (इं. भा.) हे नियतकालिक त्याने काढले (१८८९). त्याचा तो १८९५ पर्यंत संपादकही होता. जर्मनीतील शांतता चळवळीचा प्रसार करण्यासाठी त्याने म्यूनिक येथे शांतता संस्था उभारली (१८९४). जर्मन शांतता संस्थेचा तो दीर्घकाल (१९१४-२९) अध्यक्षही होता. तो बव्हेरियन डायेट (१९०७-१८) व वायमार (१९१९-२०) या संसतांचा सदस्य होता. पुढे त्याने जर्मनीच्या संयुक्त संसदेतही काही दिवस काम केले. पहिल्या महायुद्ध काळात त्याला स्वित्झर्लंडमध्ये हद्दपारीत रहावे लागले (१९१४-१९).

जर्मनीस परत आल्यानंतर (१९१९) त्याने राष्ट्रसंघाचा पुरस्कार केला. युद्धपूर्व व युद्धकाळात त्याने जर्मन साम्राज्याला विशेषतः कैसर दुसऱ्या विल्यमच्या विस्तारवादी धोरणास प्रखर विरोध केला आणि कैसर दुसरा विल्यम याच्यावर त्याने कालिग्यूला : ए स्टडी इन रोमन सीझेरियन मॅडनेस (इं. भा.) हे रूपात्मक पुस्तक लिहिले. या पुस्तकात कालिग्यूला या रोमन सम्राटाच्या विक्षिप्त वर्तनाच्या रूपाने त्याने कैसर दुसरा विल्यम याच्या राजकीय कारकीर्दीवर प्रच्छन्नपणे टाकी केली आहे. या उत्कृष्ट राजकीय रूपाकात्मक पुस्तकाच्या एका वर्षात तीस आवृत्त्या निघाल्या. त्याबद्दल क्विहडेवर फिर्यादही झाली; पण त्यातून तो निर्दोष सुटला. विविध शांतता परिषदांतून त्याने जागतिक शांततेचा पुरस्कार केला आणि युद्धविरोधी भूमिका घेतली. या त्याच्या कार्याबद्दल त्याला शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९२७). हिटलरच्या उदयानंतर १९३३ पासूनचे उर्वरित आयुष्य त्याने स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत केले. जिनीव्हा येथे त्याचे निधन झाले.

 

लेखक - रूक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate