অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बेटी विल्यम्झ

बेटी विल्यम्झ

बेटी विल्यम्झ : (२२ मे १९४३ ). ग्रेट ब्रिटनमधील शांतता चळवळीची धडाडीची आयरिश कार्यकर्ता व शांतता नोबेल पारितोषिकाची सहमानकरी. तिचे मूळ नाव एलिझाबेथ. तिचा जन्म उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट शहरी एका मध्यमवर्गीय कुटुंबांत झाला. बेलफास्टमधील ‘सेंट तेरेसा प्रायमरी स्कूल’ मधून शिक्षण घेऊन तिने एका सार्वजनिक कार्यालयात स्वागतिकेची नोकरी धरली. ऐन तारूण्यात तिचा प्रथम विवाह राल्फ विल्यम्झ याच्याबरोबर झाला (१९६१). त्यांना एक मुलगा व मुलगी झाली. १९७६ पर्यत ती संसार व घरकाम यांतच मग्ना असे. त्यानंतर उत्तर आयर्लंडमधील अशांत दहशतवादी परिस्थिती पाहून तिने मेअरीड कॉरिगनच्या मदतीने ‘कम्यूनिटी ऑफ पीस पीपल’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेने उत्तर आयर्लंडमध्ये शांतता चळवळ सुरू केली. १९७६-७८ च्या दरम्यान या चळवळीने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. उत्तर आयर्लंडमध्ये १९७५ पासून घातपाती दंगलींना प्रारंभ झाला आणि पुढे सप्टेंबर १९७६ मध्ये तेथील परिस्थिती अधिकच चिघळली.

प्रॉटेस्टंट पंथीयांनी आणि समाजकंटकांनी खून, मारामाऱ्या, जाळपोळ, दहशत या मार्गानी सामान्य व्यक्तींचे दैनंदिन जीवन उद्‌ध्वस्त करून टाकले. यात सुरक्षा दलाचीही अपरिमित हानी झाली. ही परिस्थिती तत्कालीन मुख्यमंत्री फॉक्‌नर यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अशा परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्याचे धाडसी काम विल्यम्झ बेटी व तिची कार्यकर्ती मैत्रीण मेअरीड कॉरिगन यांनी अंगीकारले (१९७६). त्या दोघी रोमन कॅथलिक असून, त्यांनी प्रथम रोमन कॅथलिक स्त्रियांना एकत्र येण्याचे आवाहन केले आमि अहिंसक व शांततामय मार्गाने कॅथलिक फॉल्स रोड व शांकिल भागांतून सलग तीन शनिवारी मिरवणुका काढल्या. त्यांची पहिली सभा अँडरसन टाउन येथे व दुसरी ओर्मिड पार्क येथे झाली. शांकिल भागात रोमन कॅथलिक १९३२ नंतर प्रथम समूहाने गेले. त्यामुळे आयर्लडमध्ये तंग वातावरण निवळले आणि लोकांना धार्मिक दंगलीतील फोलपणा लक्षात आला. पुढे लहानमोठ्या गावांतून शांतता चळवळीच्या सभा- मिरवणुका होऊ लागल्या.

२१ ऑगस्ट १९७६ च्या जाहीर सभेत ‘कम्युनिटी ऑफ पीस पीपल’ असा या चळवळीचा पुनरुच्चार करण्यात आला, तसेच प्रत्येकक व्यक्तीला जगण्याचा व प्रेम करण्याचा हक्क असून त्यासाठी न्याय आणि शांतता या तंत्वांवर या संस्थेची उभारणी झाली असल्याची घोषणा करण्यात आली. या संस्थेच्या प्रचारार्थ व शांतता चळवळीला पाठिंबा मिळविण्यासाठी बेटी विल्यम्झ व मेअरीड कॉरिगन यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मेक्सिको, जर्मनी आदी देशांचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्यात जोन बेअझ हा प्रसिद्ध लोकसंगीतकार सामील झाला. त्यामुळे या शांतता चळवळीस आर्थिक निधी व लोकांची सहानुभूती मोठ्या प्रमाणात लाभली. या संस्थेने दहशतवादाचा धिक्कार केला, तसेच हृदयपरिवर्तन आणि शांततेचा प्रसार-प्रचार अहिंसात्मक मार्गाने करण्याचा निर्धार केला. सप्टेंबर १९७६ मध्ये ‘पीस पीपल’ या महिला संघटनेने उत्तर आयर्लंडमध्ये ठिकठिकाणी मिरवणुका आणि सभा घेतल्या. बेटी विल्यम्झ आणि मेअरीड यांच्या या शांतता कार्याची दखल ऑस्लो येथील रहिवाश्यांनी प्रथम घेतली आणि त्या दोघींना नॉर्वेजियन वृत्तसंपादकांनी जमा केलेले सतरा लाख नॉर्वेजियन क्रोनर ‘पीपल्स पीस प्राइझ’ या शीर्षकाखाली पारितोषिकादाखल ऑस्लो येथे देण्यात आले (१९७६). त्यानंतर बेटी विल्यम्झ व मेअरीड या दोघींना १९७६ चे शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. मात्र ते प्रत्यक्षात १९७७ मध्ये देण्यात आले.

मेअरीड कॉरिगन मेअरीड कॉरिगन बेटी विल्यम्झने बक्षीसादाखल मिळालेली सर्व रक्कम उत्तर आयर्लडमधील लोकोपयोगी प्रकल्पांवर विशेषतः सामूहिक केंद्रांवर-खर्च केली आणि बेरोजगारांसाठी स्ट्रबॅन येथे कुटिरोद्योग उभारला. नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त बेटी विल्यम्झ व मेअरीड कॉरिगन या दोघींनाही शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष धाडस दाखविल्याबद्दल बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघाचे ‘कार्ल फोन ओसिएट्स्की’ पदक, तसेच सन्मान डॉक्टरेट ही पदवी (येल विद्यापीठ) मिळाली. बेटी विल्यम्झला डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स (१९७७) हा सन्मानही लाभला. पुढे बेटी व मेअरीड यांच्यात मतभेद झाले (१९८०). त्यानंतर बेटी ही जेम्स पर्किन्सबरोबर दुसरा विवाह करून अमेरिकेत फ्लॉरिडा येथे कायम वास्तव्यास गेली (१९८२). नोबेल शांतता पारितोषिकाची बेटी विल्यम्झसमवेतची सहविजेती मेअरीड कॉरिगन (२७ जानेवारी १९४४ -) हीदेखील आयरिश होती. तिचा जन्म उत्तर आयर्लडमधील बेलफास्ट गावी एका कामगार कुटुंबात झाला. तिचे वडील अँड्र्यू कॉरिगन हे मोठमोठ्या दुकानांतून झाडूवाल्याचे काम करीत. तिचे प्राथमिक शिक्षण बेलफास्ट येथील ‘सेंट व्हिंसेंट’ या कॅथलिक शाळेत झाले. वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ऐन तारूण्यात तिने पाळणाघरात, तसेच काही दिवस ग्रंथसंग्रहालयात काम केले. पुढे तिने ‘मिस गॉर्डन्स कमर्शिअल कॉलेज’ मधून लघुलिपीची पदविका मिळविली आणि लघुलिपिका व सचिव म्हणून एका मद्यार्काच्या कार्यालयात नोकरी धरली; तथापि सामाजिक कार्याकडे ती विद्यार्थिदशेतच आकृष्ट झाली होती. तिचा विवाह जॅकी मॉग्यूरे यांच्याबरोबर (१९८१) झाला असून त्यांना एक मुलगा आहे.

उत्तर आयर्लंडमधील हिंसक व प्रक्षोभक परिस्थिती नियंत्रणाखाली यावी व तेथे शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून मेअरीड कॉरिगनने विल्यम्झ बेटीसमवेत शांतता चळवळी, सभा, मिरवणुका, परदेश-दौरे, निधि-संकल्पन इ. कार्यात मोठ्या हिरिरीने पुढाकार घेतला व स्पृहणीय यश संपादन केले. वयाच्या अठराव्या वर्षीच तिने दीडशे मुलांचे एक शिशूविद्यालय स्थापण्यात पुढाकार घेतला आणि प्रॉटेस्टंट वा कॅथलिक असा भेदभाव न करता सर्व गरीब व होतकरू मुलांचे संगोपन पतकरले. हे विद्यालय तिने अत्यंत मागास वस्तीत सुरू करून त्या वस्तीतील लोकांची सहानुभूती मिळविली. आयर्लडमध्ये आयोजित केलेल्या ‘वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेस’ या जागतिक परिषदेत (१९७२) तिने भाग घेतला. मेअरीड कॉरिगनने आपली नोकरी सोडून ‘पीपल्स कम्यूनिटी’ या संस्थेला पूर्णतः वाहून घेतले. तिची या संस्थेच्या अध्यक्षपदी १९८०-८१ मध्ये नियुक्ती झाली असून बेलफास्टमधील लिसबर्न येथे तिचे वास्तव्य आहे.

 

संदर्भ : Deutsch, Richard, Mairead Corrigan and Betty Williams, New York, 1977.

लेखक - रूक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate