অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिट्टाग-लफ्लर, मांग्नस यस्टा

मिट्टाग-लफ्लर, मांग्नस यस्टा

मिट्टाग-लफ्लर, मांग्नस यस्टा :(१६ मार्च १८४६–७ जुलै १९२७).स्वीडिश गणितज्ञ. गणितीय विश्लेषणात महत्त्वाचे कार्य व Acta Mathematica या गणिताच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे संस्थापक.त्यांचा जन्म स्टॉकहोम येथे झाला. त्यांचे शिक्षण अप्साला विद्यापीठात झाले. १८७२ मध्ये त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. त्यानंतर ते अप्साला विद्यापीठात एक वर्ष गणित विषयाचे अधिव्याख्याते होते. १८७३ मध्ये प्रवासी शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते पॅरिस,गॅटिंगेन व बर्लिन येथे गेले. पॅरिस येथे शार्ल हरमाईट या गणितज्ञांना भेटल्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार ते कार्ल व्हायरश्ट्रास या जर्मन गणितज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करण्याकरिता बर्लिन येथे गेले. मिट्टाग-लफ्लर यांच्या पुढील प्रगतीवर व्हायरश्ट्रास यांचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो.

मिट्टाग-लफ्लर यांनी १८७७ मध्ये विषृवृत्तीय फलन सिद्धांतावर लिहिलेल्या महत्त्वपूर्ण प्रबंधाचा परिणाम म्हणून त्यांची हेलसिंकी विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पुढे १८८१–१९११ या काळात ते स्टॉकहोम विद्यापीठात प्राध्यापक होते. १८८६–९१ व १८९३ या साली स्टॉकहोम विद्यापीठात त्यांनी रेक्टर म्हणून काम केले. १८८२ मध्ये त्यांनी स्वीडनचे राजे द्वितीय ऑस्कर यांच्या आर्थिक आश्रया खाली Acta Mathematica या गणितीय नियतकालिकाची स्थापना केली आणि चार स्कँ डिनेव्हियन देशांतून संपादक वर्ग उभारू न त्यांनी प्रमुख संपादक म्हणून ४५ वर्षे काम केले. या नियतकालिकाकरिता एमील बॉरेल,गेओर्क कँ टर, झाक हादामार्द,डाव्हीट हिल्बर्ट,झ्यूल प्वँ कारे वगैरे त्या काळातील सुप्रसिद्ध गणितज्ञांनी महत्त्वाचे लेखन केले. १९१६ मध्ये त्यांनी पत्नीच्या बरोबर अप्साला येथे गणिताचे ग्रंथालय स्थापन केले.

सीमा, कलन, वैश्लेषिक भूमिती व संभाव्यता सिद्धांत यांच्याशी संबंधित असलेल्या गणितीय विश्लेषणामध्ये मिट्टाग-लफ्लर यांनी महात्त्वाचे कार्य केले. स्वयंचल (स्वतंत्रपणे मूल्ये धारण करू शकणारी राशी) व परचल (अन्य चलांच्या मूल्यानुसार मूल्ये धारण करणारी राशी) यांच्यातील संबंधाविषयीच्या फलनांच्या व्यापक सिद्धांतावर त्यांनी कार्य केले. १८७५ मध्ये त्यांनी सदसत्‌ चलाच्या फलनांच्या आधुनिक सिद्धांतात आधारभूत ठरलेल्या ऑग्युस्तीन कोशी यांच्या प्रमेयाची सिद्धता दिली. त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य एक-मूल्यी फलनाच्या वैश्लेषिक निदर्शनासंबंधी असून त्यातूनच पुढे सुप्रसिद्ध ‘मिट्टाग-लफ्लर सिद्धांत’ त्यांनी विकसित केला.

मिट्टाग-लफ्लर १८९७ मध्ये भरलेल्या पहिल्या आणि त्यानंतर भरलेल्या गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या संघटकांपैकी एक होते. त्यांना बोलोन्या,ऑक्सफर्ड, केंब्रिज, क्रिस्तियाना (ऑस्लो), ॲबर्डीन आणि सेंट अँड्रूझ या विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले. १८९६ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून निवड झाली.

ते स्टॉकहोमजवळील यूर्सहॉल्म येथे मृत्यू पावले. त्यांची संपत्ती आणि गणिताचे ग्रंथालय यूर्सहॉल्म येथील मिट्टाग-लफ्लर मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट या संस्थेचा भाग बनली आहे.

 

 

लेखक -सूर्यवंशी वि.ल.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate