অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्टॅनफर्ड मुर

स्टॅनफर्ड मुर

स्टॅनफर्ड मुर : (४ सप्टेंबर १९१३–२३ ऑगस्ट १९८२). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रथिनांच्या रेणवीय संरचनेविषयी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल १९७२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मुर व विल्यम हॉवर्ड स्टाइन यांना मिळून अर्धे आणि क्रिस्तीआन बोहेमर आनफिन्‌सेन यांना अर्धे असे विभागून मिळाले.

मुर यांचा जन्म शिकागो येथे झाला आणि शिक्षण व्हॅनडरबिल्ट व विस्कॉन्सिन या विद्यापीठांत झाले. १९३८ मध्ये त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठाची कार्बनी रसायनशास्त्राची पीएच्.डी. पदवी मिळविली. १९३९ मध्ये रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च (आता रॉकफेलर विद्यापीठ) या संस्थेतील प्रथिन रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत दाखल झाले आणि कालांतराने तेथेच १९५२ मध्ये ते प्राध्यापक झाले. युद्धकाळात त्यांनी वॉशिंग्टन येथील वैज्ञानिक संशोधन व विकास कार्यालयात तांत्रिक साहाय्यक म्हणून काम केले (१९४२–४५).

मुर व स्टाइन यांनी वर्णलेखनाविषयी १९४५ मध्ये संशोधन करण्यास प्रारंभ केला. प्रथिने व जैव द्रायू द्रव व वायू यांपासून मिळालेल्या ॲमिनो अम्लांच्या व पेप्टाइडांच्या विश्लेषणासाठी त्यांनी वर्णलेखन तंत्राचा उपयोग केला. १९६० च्या सुमारास त्यांनी स्वयंचलित ॲमिनो अम्ल विश्लेषक उपकरण तयार केले. हे उपकरण पुढे सर्वत्र वापरात आले. या उपकरणाच्या साहाय्याने मुर व स्टाइन यांनी रिबोन्यूक्लिएज या एंझाइमातील जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनातील ॲमिनो अम्लांचा क्रम निर्धारित केला. अशा तऱ्हेची संरचना ठरविले जाणारे हे दुसरे प्रथिन परंतु पहिलेच एंझाइम होते. फ्रेडरिक सँगर यांनी इन्शुलीन या प्रथिनाची संरचना १९५५ मध्ये निर्धारित केली होती व त्याकरिता त्यांना फक्त ४१ ॲमिनो अम्लांची साखळी अभ्यासावी लागली होती. मुर व स्टाइन यांनी रिबोन्यूक्लिएजमधील १२४ ॲमिनो अम्लांच्या साखळीचा उलगडा केला व तीतील १८७४ अणूंची स्थाने निर्धारित केली.

नोबेल पारितोषिकाखेरीज मुर यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचे रिचर्ड्स पदक (१९७२), लिडंरस्ट्राम-लांग पदक (१९७२) वगैरे बहुमान मिळाले. ते अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स या संस्थेचे अध्यक्ष (१९६६), तसेच अमेरिकन केमिकल सोसायटी, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, ब्रिटनची बायोकेमिकल सोसायटी, हार्व्ही सोसायटी वगैरे संस्थांचे सदस्य होते. जर्नल ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळाचे ते सदस्य होते. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

 

लेखक  -  धै. शं. फाळके

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate