অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योहोनेस पेटर म्यूलर

योहोनेस पेटर म्यूलर

योहोनेस पेटर  म्यूलर: (१४ जुलै १८०१–२८ एप्रिल १८५८). थोर जर्मन निसर्गवैज्ञानिक. अचूक निरीक्षणांच्या आधारे त्यांनी जर्मनीमध्ये जीववैज्ञानिक संशोधनाचे नवे युग सुरू केले, तसेच वैद्यकामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर सुरू केला आणि शरीरक्रियाविज्ञान, शरीरविकृतिविज्ञान, भ्रुणविज्ञान व प्राणिविज्ञानविषयक अनेक मुलभूत शोध लावून त्यांनी या विषयांतील काही नवीन संकल्पना प्रस्थापित केल्या. ते आधुनिक प्रायोगिक शरीरक्रियाविज्ञानाचे संस्थापक मानले जातात. त्यांचा दृष्टीकोन व पद्धती अनुसरणारे बहुतेक शास्त्रज्ञ आणि त्यांचे विद्यार्थी यांनी प्राकृतिक विज्ञानांमधील तंत्रांचा वापर करून वैद्यकशास्त्राची व्याप्ती वाढविली.

म्यूलर यांचा जन्म व आधीचे शिक्षण कोब्लेंट्‌स (आता प. जर्मनी) येथे झाले. प्रथम त्यांनी कॅथलिक चर्चमध्ये धर्मशास्त्राचे अध्ययन केले. नंतर बॉन विद्यापीठात जाऊन त्यांनी वैद्यकाची पदवी मिळविली (१८२२). तद्‌नंतर दीड वर्षे बर्लिन येथे अध्ययन केले. १८२४ साली ते राज्य वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाले व बॉन विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञान व तुलनात्मक शरीर या विषयांचे व्याख्यातेही झाले. तेथेच ते सहप्राध्यापक (१८२६) व प्राध्यापक (१८३०) झाले. १८३३ ते बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक व तेथील तुलनात्मक शरीरविषयक संग्रहालयाचे संचालकही झाले.

म्यूलर यांचे मानवी अभिव्यक्तींच्या विश्लेषणाचे निष्कर्ष, तसेच कीटक व कवचधारी प्राण्यांच्या संयुक्त डोळ्याविषयींचे  डोळा संशोधन १८२६ साली प्रसिद्ध झाले. विविध प्रकारच्या उत्तेजकांना प्रत्येक ज्ञानेद्रिंय आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्गाने (त्यांच्या भाषेत वैशिष्ट्यपूर्ण ऊर्जेने) प्रतिसाद देते. (उदा. दृक, तंत्रिकेला-मज्जातंतूला-विद्युतीय उद्दीपन मिळल्यास फक्त प्रकाशाचेच संवेदन होते). त्यामुळे बाह्य जगातील आविष्कार केवळ त्यांच्याकडे संवेदी तंत्रात होणाऱ्या बदलांद्वारेच जाणवतात, असे त्यांनी सांगितले. या निष्कर्षामुळे तंत्रिकाविषयक (मज्जाविषयक) शरीरक्रियाविज्ञानाचा पाया घातला गेलाच, शिवाय त्याचा प्रभाव ज्ञानमीमांसेवरही पडला. त्यांनी शरीरक्रियाविज्ञान, क्रमविकास (उत्क्रांती) व तुलनात्मक शारीर यांच्यातील पुष्कळ प्रश्नांचे परीक्षण केले आणि ⇨ प्रतिक्षेपी क्रियेची संकल्पना स्पष्ट केली.

जिवंत बेडकांवर प्रयोग करून त्यांनी चार्ल्स बेल व फ्रांस्वा मॉझँदी यांच्यावरून ओळखण्यात येणाऱ्या बेल-मॉझँदी नियमांची खातरजमा करून घेतली. या नियमानुसार मेरुरज्जूपासून निघणारी तंत्रिकांची अग्रमूले (टोके) प्रेरक तर पश्चमूले संवेदी असतात  तंत्रिका तंत्र यांशिवाय त्यांनी तंत्रिकांची कार्ये, ग्रंथीची नाजूक संरचना, स्त्रवण प्रक्रिया वगैरेंचे अनुसंधान केले. भ्रूणामधील जननेद्रिंयाच्या विकासाचा मागोवा घेताना त्यांनी मादीच्या अंतर्गत जननेद्रिंयाचा किंवा भ्रुणवाहिनींचा शोध लावला म्हणून तिला ‘म्युलेरीय वाहिनी’ म्हणतात. हिच्यापासून फॅलोपियन नलिका, गर्भाशय व योनी बनतात. त्यांनी सूक्ष्मदर्शकाने अर्बुदाच्या (शरीराच्या निरुपयोगी गाठीच्या) कोशिकीय (पेशीय) संरचनेचा अभ्यास केला. रासायनिक विश्लेषण व सूक्ष्मदर्शकीय निरीक्षणांच्या आधारे त्यांनी रोगग्रस्त ऊतकांचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांचे) परीक्षणही केले. अशा तऱ्हेने विकृतिवैज्ञानिक ऊतकविज्ञान या शाखेचा पाया घातला गेला. पहाणे, ऐकणे व बोलणे यांविषयीच्या त्यांच्या संशोधनातून प्रायोगिक शरीरक्रियाविज्ञानाचा उदय झाला, तर यांविषयीच्या प्रयोगांमुळे मानसशास्त्रीय संशोधनाला चालना मिळाली.

इ. स १८३३ नंतर त्यांनी नीच दर्जाच्या सागरी प्राण्यांचे (उदा, सायक्लोस्टोमॅटो व कॉँड्रिक्थीज), तसेच एकायनोडर्नाटा, रेडिओ-लॅरिया व फोरॅमिनीफेरा गटांतील प्राण्याचे संशोधन केले. यासाठी त्यांनी भूमध्य व उत्तर समुद्राच्या अनेक मोहिमांत भाग घेतला. १८४० नंतर त्यांनी तुलनात्मक शारीर व प्राणिविज्ञान यांवर लक्ष केंद्रीत केले. प्राण्यांचे व जीवाश्मांचे (जीवांच्या शिळारूप झालेल्या अवशेषांचे) नमुने गोळा केले व त्यांची वर्गवारी केली. त्यांनी उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे), मासे, गाणारे पक्षी व सरीसृप (सरपटणारे) या प्राण्यांचे वर्गीकरण केले.

यांशिवाय त्यांनी पुढील अनेक विषयांवरही संशोधन केले : प्राण्यांच्या शरीरक्रिया, हालचाली व संरचना, जीवन प्रक्रिया, रक्त व लसीका  लसीका तंत्र यांचे संघटन; क्लथनाची (रक्त साखळण्याची) प्रक्रिया; दृक् पटलावरील प्रतिमेची निर्मिती; बेडकाच्या लसीका हृदयाची संरचना; मध्यकर्णातील ध्वनीचे प्रसारण; मातेच्या पोटातील गर्भाचे श्वसन; सोरोस्पर्मिअॅसिस रोग; आत्मा वगैरे. १८२७, १८४०, १८४७ व सु १८५७ साली त्यांना विषण्णतेने ग्रासल्याने ते बराच काळ संशोधन करू शकले नाहीत.

रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक, अॅकॅदेमी देस सायन्सेसचे प्रिक्स क्यूव्ह्‌ये पदक, पूसियन अॅकॅडेमी सायन्सेसचे सदस्यत्त्व इ. सन्मान त्यांना मिळाले. त्यांनी २०० पेक्षा जास्त संशोधनपर लेख व पुस्तके लिहिली असून त्यांपैकी Handbuch der Physiologie des menschen (१८३१; इं. अनु. हँडबुक ऑफ ह्यूमन फिजीऑलॉजी, १८४२) हे त्यांचे पुस्तक सु. ४० वर्षे प्रमाणभूत पाठ्यपुस्तक म्हणून वापरले गेले. यांशिवाय म्युलर्स आर्काइव्ह हे जर्नल त्यांनी १८३४ साली स्थापन केले होते. म्यूलर बर्लिन येथे मृत्यू पावले.

 

लेखक - अ. ना. ठाकूर / ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate