অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिआँ व्हीक्तॉरऑग्यस्त बू र्झ्वा

लिआँ व्हीक्तॉरऑग्यस्त बू र्झ्वा

लिआँ व्हीक्तॉरऑग्यस्त बू र्झ्वा : (२९ मे १८५१-२९ सप्टेंबर १९२५). फ्रान्सचा पंतप्रधान (१८९५-९६) व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. जन्म पॅरिस येथे. कायदेविषयक शिक्षण घेऊन तो सनदी सेवेत रुजू झाला (१८७६) त्यानंतर काही वर्षातच तो सिन प्रांतातील पोलिस प्रमुख (प्रिफेक्ट) झाला (१८८७). पुढे तो संसदेवर निवडून आला (१८८८) आणि विविध खात्यांचा मंत्री म्हणूनही त्याने काम केले. १ नोव्हेंबर १८९५-२१ एप्रिल १८९६ या कालावधीत तो पंतप्रधान होता. पुढे तो नव्याने उदयास आलेल्या रॅडिकल पक्षाचा अध्यक्ष झाला आणि सिनेटचा अध्यक्ष होण्याचा मानही त्यास मिळाला (१९२०-२३). त्याने आपल्या पंतप्रधानकीच्या अल्प मुदतीत आयकर, निवृत्तिवेतन, सामाजिक सुरक्षा, विमायोजना इ. बाबतीत पुरोगामी धोरणाचा पुरस्कार केला. द हेग येथील दोन्ही जागतिक शांतता परिषदांत (१८९९ व १९०७) त्याने फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पुरस्कार केला. १९०३ मध्ये त्याची द हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाचा स्थायी सदस्य म्हणून नियुक्ती झाली. ॲल्वसिरस (स्पेन) येथील परिषदेत पुढाकार घेऊन त्याने मोरोक्कोच्या स्वातंत्र्याबद्दलचा करारनामा घडवून आणला (१९०६).

राष्ट्रसंघाच्या आद्य पुरस्कर्त्यांपैकी तो एक मानला जातो. राष्ट्रसंघाच्या जाहीरनाम्याचा मसुदाही त्यानेच तयार केला होता आणि पुढे राष्ट्रसंघात फ्रेंच प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करण्याचा मानही त्यास मिळाला. फ्रान्स आणि इतर यूरोपीय राष्ट्रे यांत सामंजस्य निर्माण व्हावे यासाठी तो सदैव प्रयत्नशील होता. फ्रान्स शासनाने राष्ट्रसंघातील समितीचे अध्यक्षपद त्यास दिली. १९१९ मध्ये पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेतही त्याने फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले आणि जागतिक शांततेचा पुरस्कार केला. या त्याच्या कार्याद्दल १९२० चे शांततेचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने १९२३ मध्ये राष्ट्रसंघातील आपल्या पदाचा राजीनामा दिला. पॅरिसजवळील एपेअर्ने येथे तो निधन पावला.

Solidarite (१८९६) हा त्याचा उल्लेखनीय ग्रंथ. या ग्रंथात त्याने भांडवलशाहीतील आत्यंतिक व्यक्तिवाद व समाजवादातील आत्यंतिक समष्टिवाद यांतील मध्यममार्ग म्हणून वर्गीय एकात्मतेचे समर्थन केले. आंतरराष्ट्रीय संघटनांचे निर्णय कार्यवाहीत आणण्याकरिता एक आंतरराष्ट्रीय सेनादल असावे, अशीही सूचना त्याने केली होती.

 

संदर्भ : 1.Chapman, Guy, The Third Republic of France, London, 1962.

2. Lipsky, Mortimer, Quest for Peace : the Story of the Nobel Award. Cranbury (N.J.), 1966.

लेखक - रुक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate