অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिओनीड हुर्विक्झ

लिओनीड हुर्विक्झ

लिओनीड हुर्विक्झ: (२१ ऑगस्ट १९१७–२४ जून २००८). पोलिश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व गणितज्ञ. अर्थशास्त्रातील ‘मेकॅनिझम डिझाइन थिअरी’ या संदर्भातील संशोधनाबद्दल एरिकमॅस्किन व रॉजर मायरसन यांच्या सोबत हुर्विक्झला नोबेल पारि-तोषिकाने सन्मानित करण्यात आले (२००७). अर्थशास्त्र, समाजशास्त्र व राज्यशास्त्रामधील अपेक्षित फल-निष्पत्ती, विविध घटकांना मिळ-णाऱ्या प्रेरणा व त्यांसाठीची तांत्रिक व्यवस्था या संकल्पना त्याने आपल्या संशोधनाद्वारे मांडल्या. त्याने तयार केलेल्या प्रतिकृतींच्या (मॉडेल्स) आधारे व्यक्ती व संस्था, व्यापार, बाजारपेठा यांतील परस्परनातेसंबंधांचे विश्लेषण करणे शक्य झाले. हुर्विक्झचा जन्म मॉस्को (रशिया) येथे एका ज्यू कुटुंबात झाला.त्याचे कुटुंब मूळचे पोलंडचे; परंतु पहिल्या जागतिक महायुद्धकाळात विस्थापित झालेल्या रशियन राजवटीमधील वॉर्सा (पोलंड) या शहराततो वास्तव्यास होता.

हुर्विक्झने वॉर्सा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली (१९३८). नंतर त्याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्ययन केले. त्यानंतर जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथील ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज येथे मुख्यत्वे अर्थशास्त्राचा अभ्यास केला. पुढे त्याने अमेरिकेच्या मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये संशोधक सहायक म्हणून काम केले. तेथे त्याला प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पॉल सॅम्युएल्सन याचे मार्गदर्शन लाभले. तत्पूर्वी त्याने शिकागो विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात संख्याशास्त्राचे अध्यापन केले. पुढे तो मिनेसोटा विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाला (१९५१) आणि प्राध्यापक म्हणून निवृत्त झाला (१९८८). तिथेच तो गुणश्री प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. या काळात अभ्यागत व्याख्याता म्हणून त्याने स्टॅनफर्ड, बंगलोर, हार्व्हर्ड, कॅलिफोर्निया वगैरे विद्यापीठांतून व्याख्याने दिली.

हुर्विक्झला अर्थशास्त्राबरोबरच भाषाशास्त्र, शिल्पशास्त्र, रसायनशास्त्र, हवामानशास्त्र, संगीत इ. विषयांतही रस होता. गणिती व सांख्यिकीअर्थशास्त्राच्या आधारे व्यावसायिक पेढ्यांसाठी काही प्रतिकृती त्याने तयार केल्या. गणिती अर्थशास्त्र, संरचना (मेकॅनिझम) व संरचनात्मक आराखडा (डिझाइन) या संदर्भातील आर्थिक सिद्धान्त मांडणारा तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखला जाई. आर्थिक प्रतिकृतीचा भांडवल- शाही, साम्यवाद या व्यवस्थांचे विश्लेषण करण्यास कसा उपयोग करून घेता येईल आणि समाजातील व्यक्तींना त्याचा फायदा कसा होईल, यांचे विवेचन त्याने केले. त्याने विकसित केलेल्या प्रेरणा (इन्सेंटिव्ह्ज) योग्यता सिद्धान्ताने सुनियोजित अर्थव्यवस्था का अपयशी ठरते व व्यक्तींना प्रेरणा दिल्यास निर्णयप्रक्रियेमध्ये कसा फरक पडतो, हे सप्रमाण सिद्ध केले. त्याची ‘मेकॅनिझम डिझाइन थिअरी’ खरेदीदार व विक्रेते यांमधील दरी स्पष्ट करते. आदर्श परिस्थितीत बाजारपेठेतील वस्तूंच्या किमतीविषयी दोन्ही पक्षांना समान माहिती मिळते; परंतु प्रत्यक्ष व्यवहारात खरेदीदाराला यात तफावत आढळते आणि विक्रेत्याच्या किमतीविषयीचा अंदाज येत नाही. यामुळे हुर्विक्झच्या मेकॅनिझमचे गुणसूत्र महत्त्वाचे ठरते.

हुर्विक्झला नोबेलव्यतिरिक्त अनेक मानसन्मान लाभले असून त्यांपैकी इकॉनॉमेट्रिक सोसायटीचे सदस्यत्व (१९४७) व अध्यक्षपद (१९६९), अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्यत्व (१९६५), अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे सदस्यत्व (१९७७), नॅशनल मेडल ऑफ सायन्स (१९९०) इ. महत्त्वाचे होत. तसेच त्याला नॉर्थवेस्टर्न (१९८०), बार्सेलोना (१९८९), शिकागो (१९९३), कैरो (१९९३), वॉर्सा स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (१९९४) व बीलफिल्ड (२००४) अशा सहा विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदवी दिली.

हुर्विक्झने अनेक नियतकालिकांतून संशोधनपर स्फुटलेख लिहिले असून त्याच्या ग्रंथांपैकी थिअरी ऑफ इन्फर्मेशन सेन्ट्रलायझेशन (१९६९), द डिझाइन मेकॅनिझम फॉर रिसोर्स अलोकेशन (१९७३), व्हाट इज द कोर्स थेरम (१९९५), डिझायनिंग इकॉनॉमिक मेकॅनिझम (२००६) आदी महत्त्वाचे व मान्यवर होत.

हुर्विक्झचे अमेरिकेतील मिनीअ‍ॅपोलिस (मिनेसोटा) येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

 

लेखक - जयवंत चौधरी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate