অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झोंबार्ट, व्हेर्नर

झोंबार्ट, व्हेर्नर

(१९ जानेवारी १८६३–१३ मे १९४१). प्रख्यात जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ. एर्मस्लेबन येथे जन्म. वडील जमीनदार व उद्योगपती होते. त्याचे शिक्षण पीसा व बर्लिन विद्यापीठांत झाले. कायदा, अर्थशास्त्र, इतिहास व तत्त्वज्ञान हे त्याच्या व्यासंगाचे विषय होते. १८८८ मध्ये त्याला बर्लिन विद्यापीठाची पीएच्. डी. मिळाली. ‘ब्रेमेन चेंबर ऑफ कॉमर्स’चा तो सदस्य होता. ब्रेस्लौच्या विद्यापीठात (१८९०–१९०६) व ‘बर्लिन कॉलेज ऑफ कॉमर्स’ येथे त्याने अध्यापन केले. १९१८ पासून तो बर्लिन विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक होता.

झोंबार्टच्या प्रारंभीच्या लिखाणात मार्क्सवादाचा पुरस्कार आढळतो. पुढेपुढे मात्र त्याने विरोधी भूमिका घेतली. कित्येकदा तर एखाद्या सामाजिक-आर्थिक प्रश्नाकडे मार्क्सवादी दृष्टिकोणातून पहावयास सुरूवात करून त्याचा शेवट विरोधी भूमिकेत केल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक चळवळी व समाजवाद यांवरील त्याच्या Sozialismus und soziale Bewegung im 19. Jahrhundert (१८९६; इं. भा. सोशॅलिझम अँड द सोशल मूव्हमेंट, १९०९) या पुस्तिकेच्या पहिल्या नऊ आवृत्त्या मार्क्सप्रणीत समाजवादास पोषक आहेत, तर दहावी आवृत्ती मार्क्सविरोधी आहे. झोंबार्टचे भांडवलशाहीच्या इतिहासाविषयीचे लिखाण महत्त्वपूर्ण मानले जाते. या दृष्टीने त्याची Der moderne Kapitalismus (१९०२–२७; इं. शी. मॉडर्न कॅपिटॅलिझम) व Die Juden und das Wirtschaftsleben (१९११; इं. भा. द ज्यूज अँड मॉडर्न कॅपिटॅलिझम, १९१३ आणि १९५१) ही पुस्तके उल्लेखनीय आहेत. भांडवलशाही व्यवस्थेच्या विकासामध्ये नागरीकरण, जलद औद्यौगिकीकरण इ. प्रत्याक्ष घडणाऱ्या प्रक्रियांपेक्षाही तो भांडवलवादी वृत्ती अधिक महत्त्वाची मानतो. सामाजिक परिस्थितीपेक्षा मूल्यांवर अधिक भर देतो. झोंबार्टला खूप लोकप्रियता लाभली; तथापि त्याला अनुयायी नव्हते वा त्याचा पंथही झाला नाही. सिद्धांतनिर्मितीचा त्याचा प्रयत्न असूनही त्या दृष्टीने तो स्वतः फारसे करू शकला नाही. त्याच्याच शब्दात त्याचे वर्णन करावयाचे झाल्यास, ‘त्याच्या सिद्धांतांपेक्षा तो स्वतःच अधिक ख्याती पावला’, असे करता येईल. बर्लिन येथे त्याचे निधन झाले.

 

 

संदर्भ : 1. Barnes, H. E. Ed. An Introduction to the History of Sociology, Chicago, 1948.

2. Plotnik, M. J. Werner Sombart and His Type of Economics, New York, 1937.

लेखक -  सुधा काळदाते

स्त्रोत - मराठी विशेकोश

 

 

अंतिम सुधारित : 8/25/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate