অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हुगो फोन मोल

हुगो फोन मोल

हुगो फोन मोल : (८ एप्रिल १८०५–१ एप्रिल १८७२). जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ. वनस्पतिशारीर व कोशिकेची (पेशीची) संरचना यांविषयीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म स्टरगार्ट येथे व पदवीपर्यंतचे (१८२८) शिक्षण ट्यूबिंगेन येथे झाले. म्यूनिक येथे अध्ययन केल्यानंतर १८३२ साली ते बर्न येथे शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले. १८३५ ते मृत्यूपावेतो ते ट्यूबिंगेन येथे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते.

कोशिकेतील संपूर्ण जीवद्रव्यासाठी जे. ई. पुरकिन्ये यांनी सुचविलेली ‘ प्रोटोप्लाझम ’ ही संज्ञा मोल यांनी रूढ केली आणि रिक्तिकायुक्त कोशिकेमधील जीवद्रव्याच्या अस्तरासाठी प्रायमॉर्डीअल यूट्रिकल (आद्याशय) ही संज्ञा सुचविली. सर्व वनस्पती व प्राणी कोशिकांचे बनलेले असून आधीच्या कोशिकांचे विभाजन होऊन नवीन कोशिका बनतात, हा कोशिकेविषयीचा सिद्धांत प्रस्थापित होण्यास त्यांच्या कार्याची पुष्कळ मदत झाली. कोशिका त्रिभाजनामध्ये जीवद्रव्याचे होणारे वर्तन आणि कॉन्फर्वा ग्लोमोरॅटा या सागरी शैवलाचे होणारे कोशिकाविभाजन यांचे वर्णन त्यांनी केले होते. कोशिकावरणाची जाडी स्तराधानाने (थरावर थर बसून) होते, हे त्यांचे मत अजूनही मानले जाते. उच्च वनस्पतींच्या शरीरविषयक संशोधनातील त्यांचा वाटा महत्त्वाचा असून पाम वृक्ष (ताड, माड इ.), सायकॅडे सायकॅडेलीझ, वृक्षी नेचे, आयसॉएटिस, निरनिराळ्या प्रकटबीज व आवृत्तबीज वनस्पतींची खोडे वगैरेंच्या संरचनेचे वर्णन त्यांनी केले होत.

वाहिन्या व दृढ कोशिका यांची उत्पत्ती व विकास कोशिकांपासूनच होतो; तसेच कोशिकावरणात काही ठिकाणी जाडी न वाढल्यामुळे काशिकांवरील खाचा निर्माण होतात, असे त्यांनी दाखविले होते कोशिका. अपित्वचा, उपत्वचा, त्वक्षानिर्मिती त्वक्षा आणि त्वग्रंध्रांची त्वग्रंध्रे संरचना व विकास यांविषयी महत्त्वाची माहिती त्यांनी मिळविली होती. Grundzuge der Anotomie und Physiologie der Vegetablischen Zelle (१८५१) या त्यांच्या जर्मन ग्रंथाचे प्रिन्सिपल्स ऑफ ॲनॉटमी अँड फिजिऑलॉजी ऑफ द व्हिजिटेबल सेल हे भाषांतर १८५२ साली प्रसिद्ध झाले. तत्पूर्वी त्यांचे महत्त्वाचे लेख Vermischte Schriften botanischen Inhalts (१८४५; इं. शी. मिसेलेनियस बॉटॅनिकल रायटिंग्ज) या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले होते. ते ट्यूबिंगेन येथे मृत्यू पावले.

 

लेखक  - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate