অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डॉन नदी

डॉन नदी

व्होल्गा - डॉन कालवा

डॉन नदी

 

 

 

 

(तातार, डून; प्राचीन टॅनीअस). यूरोपीय रशियातील एक मोठी महत्त्वाची नदी. लांबी १,८७० किमी.; जलवाहनक्षेत्र सु. ४,२२,००० चौ. किमी. तिच्यावरील मोठ्या प्रकल्पांमुळे, तिच्या प्रदेशात होणाऱ्या डॉनशांपेन या मद्यामुळे आणि तिच्या मुखाजवळच्या प्रदेशातील अवखळ, लढाऊ व स्वतंत्र वृत्तीच्या डॉन-कोसॅक लोकांमुळे ती विख्यात आहे.

मध्य रशियाच्या डोंगराळ भागांत, नॉव्हमस्कॉफ्‌स्क शहराजवळ शांत जलाशयात ती उगम पावते आणि ॲझॉव्ह समुद्राच्या टॅगनरॉग आखातास जाऊन मिळते. तिचे खोरे पूर्वेस व्होल्गा व पश्चिमेस नीपर यांच्या खोऱ्यांदरम्यान आहे. तिचा उगम समुद्रसपाटीपासून फक्त १९० मी. उंचीवर असल्यामुळे ती अत्यंत संथ वाहते.

ती टूल, लायपेक, व्हॉरोनेश, व्होल्गोग्राड आणि रॉस्टॉव्ह या विभागांतून प्रथम जंगलस्टेप व नंतर रशियाच्या सुप्रसिद्ध स्टेप प्रदेशातून वाहत जाते. तिला उजवीकडून मुख्यतः क्रासिव्हाया, मेचा, सस्ना चॉर्नाइया काल्यीट्व्ह, चीर, डोनेट्स व डावीकडून व्हॉरोनेश, खप्यॉर, मिड्व्हेद्यित्स, हॉव्हल्या, साल, मानिच या उपनद्या मिळतात. ती प्रथम सामान्यतः दक्षिणेकडे वाहते. मग चॉर्नाइया काल्यीट्व्हच्या संगमापासून मुखाजवळच्या ईलव्हल्याच्या संगमापर्यंत ती पूर्वेकडे एक प्रचंड वळण घेते.

या वळणाच्या माथ्यावर विस्तीर्ण त्सीमल्यान्स्क जलाशय सुरू होतो. त्याला कलाच (कलाच ना डॉनू) शहराजवळ महत्त्वाचा व्होल्गा–डॉन कालवा मिळतो. हा कालवा व ईलव्हल्या यांदरम्यान व्होल्गा नदी डॉनपासून अवघी सु. ८० किमी. इतकी जवळून जाते. वळणाच्या सुरूवातीपर्यंतच्या वरच्या भागात अरुंद खोऱ्यातून वाहताना डॉनच्या उजव्या किनाऱ्यावरील चुनखडकात व खडूखडकात कोरल्या गेलेल्या घळया आणि त्यांपलीकडे ऊर्मिल मैदाने व डाव्या तीरावरील पूरमैदानात नदी मधून मधून रुंद होऊन बनलेली छोटी छोटी सरोवरे दिसतात. पाणी १० मी. खोल होत जाते आणि पात्र सु. २०० ते ४०० मी. रुंद होत जाते. त्सीमल्यान्स्क जलाशयापर्यंतच्या भागात खोरे सु. ६·५ किमी. रुंद होऊन पूरमैदाने, अनेक सरोवरे व आता कोरडे पडलेले पूर्वीचे प्रवाहमार्ग दिसतात.

काठ अधिक चढे होत जातात व तेथे चुनखडक, खडू आणि वालुकाश्म दिसतात. पाण्याची किमान खोली सु. १६ मी. व पात्राची रुंदी १०० मी. ते ४०० मी. होते. यापुढील खालच्या भागात १९५२ ते १९५५ यांदरम्यान निर्माण केलेल्या २५६ किमी. लांब, ३८ किमी.पर्यंत रुंद व सरासरी ८·८ मी. खोल त्सीमल्यान्स्क जलाशयाचा मोठा प्रभाव आहे. अगदी खालच्या भागात खोरे १९ ते ३० किमी. रुंद असून त्यात अतिविस्तृत पूरमैदान आहे.

येथे डॉनचे पात्र २० मी. खोलीच्या वेणीप्रवाहांनी बनलेले आहे. हा स्टेपचा उघडा, विस्तृत प्रदेश होय. डॉनच्या खोऱ्याचा उत्तरेकडील सु. १२% प्रदेश अरण्यव्याप्त असून तेथे करड्या रंगाची अरण्यमृदा आढळते; बाकीचा सर्व प्रदेश सुपीक, समृद्ध, काळ्या मृदेने भरलेला आहे.

डॉन खोऱ्याचे हवामान सौम्य खंडांतर्गत आहे. जानेवारीचे सरासरी तपमान –८° से. ते ११° से. जुलैचे १९° से. ते २२° से. असते. वार्षिक सरासरी पाऊस उत्तरेकडे ५६·५ सेंमी.पासून दक्षिणेकडे ३५ ते ३७·५ सेंमी. पर्यंत कमी होत जातो.

अरण्यप्रदेशानंतर डॉन बहुतेक वृक्षहीन प्रदेशातूनच वाहते. तिच्या खोऱ्यात गहू, बार्ली, ओट, बीट, बटाटे, मका, तंबाखू, कापूस इ. पिके तेसच पेअर, पीच, द्राक्षे, लिंबूजातीची फळे, डाळिंबे, अंजीर इ. फळे व तऱ्हेतऱ्हेचा भाजीपाला होतो. गुरे, शेळ्यामेंढ्या, घोडे, डुकरे, कोंबडी इ. प्राण्याचे कळप पाळून दूध, चीज, मांस, अंडी, कातडी इ. पदार्थांचे मोठे उत्पादन केले जाते. डॉनमध्ये विशेषतः खालच्या भागात मासे भरपूर सापडतात.

खोऱ्याच्या वरच्या भागात डबकी, तलाव व सरोवरे यांमुळे सिंचनास मदत होते. तसेच तेथे मत्स्यसंवर्धन संचयही होतात. खालच्या टप्प्यात त्सीमल्यान्स्क जलाशयापासून निघणारा मुख्य डॉन कालवा व त्याच्या लोअर डॉन, अपर साल, प्रॉलिटारिएट इ. शाखांनी विस्तृत प्रदेशात सिंचाई होते.

डॉन मुखापासून १,३५५ किमी. जॉर्जीडेझपर्यंत व वसंतात १,५९० किमी. ख्‌ल्येव्हनयापर्यंत उथळडूब नौकांना सुलभ आहे. त्सीमल्यान्स्क जलाशयामुळे आणि व्होल्गा-डॉन कालव्यामुळे तिचे जलमार्ग म्हणून महत्त्व खूपच वाढलेले आहे. तिच्यातून व्होल्गाच्या वरच्या भागातील लाकूड, डोनेट्स खोऱ्यातील कोळसा व डॉन खोऱ्यातील उत्पादने यांची वाहतूक होते. मात्र सु. नोव्हेंबर मध्य ते एप्रिल मध्यापर्यंत डॉन गोठलेली असते.

निरनिराळ्या भागांत या काळातील १००–१२५ दिवस सोडून ती बर्फमुक्त व वाहतुकीस योग्य असते. डॉनला एप्रिल-मेनंतर बर्फ वितळून एकदा आणि सप्टेंबरनंतर एकदा असे दोनदा पूर येतात. त्सीमल्यान्स्क जलाशयामुळे तिच्या वार्षिक प्रवाहाचे नियंत्रण होते. डॉनवरील मोठी बंदरे म्हणजे कलाच (कलाच ना डॉनू), त्सीमल्यान्स्क व रॉस्टॉव्ह (रॉस्टॉव्ह ना डॉनू) ही होत.

 

यार्दी, ह. व्यं.; कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate