অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नायगारा धबधबा

नायगारा धबधबा

नायगारा धबधबा : उ. अमेरिका खंडातील प्रेक्षणीय व अपूर्व देखाव्यांपैकी एक जगप्रसिद्ध धबधबा. हा कॅनडा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सरहद्दीवर आणि ईअरी व आँटॅरिओ या सरोवरांना जोडणाऱ्या नायगारा नदीवर आहे. गोट बेटामुळे या धबधब्याचे दोन भाग झाले आहेत. कॅनडाकडील धबधब्यास ‘कॅनडियन फॉल्स’ किंवा ‘हॉर्सशू फॉल्स’ (उंची ४८ मी., लांबी ७९२·५ मी.) व अमेरिकेकडील धबधब्यास ‘नायगारा फॉल्स’ किंवा ‘अमेरिकन फॉल्स’ (उंची ५१ मी., रुंदी ३०५ मी.) असे म्हणतात. अमेरिकेत किंवा कॅनडात यूरोपीय लोकांच्या वसाहती होण्याच्या आधीपासून अनेक इंडियन जमातींना हा धबधबा चांगला माहीत होता. प्रथम फादर हेनेपिन याने १६७८ व १६८३ मध्ये या धबधब्यास भेट देऊन प्रथम याचे वर्णन लिहिले. एकूण पाण्याच्या फक्त ६% पाणी अमेरिकन फॉल्सवरून वाहते. बाकीचे पाणी कॅनडातील नालाकृती धबधब्यावरून वाहते.

वाहते पाणी गाळरहित असल्यामुळे धबधब्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. कॅनडाच्या बाजूकडील क्कीन व्हिक्टोरिया पार्कपासून आणि अमेरिकन फॉल्सजवळील प्रॉस्पेक्ट पॉइंटपासून धबधब्यांचे सौंदर्य फारच आकर्षक दिसते. रात्रीच्या वेळी धबधब्याचे पाणी जेथे खाली पडते, तेथे रंगीबेरंगी प्रकाशांची सोय करण्यात आल्याने व आजूबाजूला मोठमोठी उद्याने असल्याने, येथे प्रवाशांची फार वर्दळ असते. १९४१ मध्ये नायगारा नदीवर ‘रेन्‌बो ब्रिज’ नावाचा पूल बांधण्यात आला असून त्यावरून धबधब्याचे सौंदर्य चांगले पाहता येते. धबधब्यास पुरेसा पाणीपुरवठा व्हावा आणि त्याचा देखावा कायम टिकावा म्हणून कॅनडा व अमेरिका या देशांमध्ये १९५० साली एक करार झाला. त्यानुसार पर्यटक हंगामात दर सेकंदास कमीत कमी ३,००० घ. मी. पाणी आणि इतर वेळी दर सेकंदास कमीत कमी १,५००० घ. मी. पाणी सोडले जाते.

बाकीच्या पाण्यापासून मोठ्या प्रमाणात जलविद्युत् निर्माण केली जाते. तसेच अमेरिकन फॉल्सला पुरेसे पाणी मिळावे म्हणून त्यास कालव्याने पाणीपुरवठा केला जातो. नालाकृती धबधबा वर्षाला १·५२४ मी. या वेगाने मागे सरकत आहे. अमेरिकेतील धबधब्यामुळेही खालच्या खडकांवर मोठा परिणाम होत असून १९६९ मध्ये नदी काही काळ दुसरीकडे वळवून त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.

पंचमहासरोवर जलमार्गात हा धबधबा ही एक अडचणच आहे. ती धबधबा टाळून जाणाऱ्या वेलंड कालव्याने दूर केली आहे. या धबधब्यांशी संबंधित असलेले ऐतिहासिक आणि प्राकृतिक – इतिहास साहित्य न्यूयॉर्क राज्यातील नायगारा फॉल्स शहराच्या नायगारा फॉल्स म्यूझीयममध्ये आहे.

 

लेखक: य. रा. कांबळे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate