অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हाल नदी

व्हाल नदी

व्हाल नदी

दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील एक नदी. ऑरेंज नदीची ही सर्वांत लांब उपनदी असून तिची लांबी १,२१० किमी. आहे. ट्रान्सव्हाल प्रांताच्या आग्नेय भागातील उंचवट्याच्या प्रदेशात स्टेर्कफाँतेन बीकनच्या जवळ १,८३६ मी. उंचीवर या नदीचा उगम होतो. उगमानंतर नागमोडी वळणंनी पण सर्वसाधारणपणे नैर्ऋत्य दिशेने ती वाहात जाते.

या नदीमुळे ट्रान्सव्हाल व ऑरेंज फ्री स्टेट यांच्यातील सरहद्द निर्माण झालेली आहे. केप प्रांताच्या उत्तर भागात डग्लसच्या ईशान्येस ती ऑरेंज नदीला मिळते. क्लिपविल्जफेट व रीट या व्हाल नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. व्हालच्या मुख्य तीन शीर्षप्रवाहांपैकी विल्ज ही सर्वांत मोठी उपनदी आहे.

ईलान्स ही विल्जची मुख्य उपनदी ड्रेकन्सबर्ग पर्वतातील माँटोसूर्सजवळ उगम पावते. विल्जमधील पाण्याचे सरासरी प्रमाण जवळजवळ क्लिप व व्हालच्या वरच्या टप्प्यातील पाण्याएवढे असते.

व्हाल नदीला दक्षिण आफ्रिकेतील औद्योगिक प्रदेशाची प्राणरेखा संबोधले जाते. विटवॉटर्झरँड कटकाजवळून वाहणाऱ्या या नदीच्या उत्तर तीरावरील फरीनिखिंग व्हँडरबीजलपार्क (ट्रान्सव्हाल) हे जुने औद्योगिक संकुल आहे; तर दक्षिण तीरावर सॅसलबर्ग (ऑरेंज फ्री स्टेट) हे रसायन उद्योगाचे आधुनिक केंद्र आहे.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाणी पुरवठ्याचा प्रश्न उत्तरोत्तर तीव्र होत गेला. १९२३ मध्ये परीसजवळ या नदीवर उत्प्रवाह धरण बांधून जलाशयाची निर्मिती करण्यात आली. त्यातून प्रतिदिनी ९,१००० लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होऊ लागला. पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करून १९३४ मध्ये व्हाल-विल्ज-क्लिप यांच्या संगमाच्या खालच्या बाजूस फरीनिखिंगच्या आग्नेयेस व्हाल धरणाच्या बांधकामास प्रारंभ झाला.

हे देशातील सर्वांत मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २·४ महापद्म घनमीटर आहे. जलाशयाचे क्षेत्र ३०० चौ.किमी. आहे. ब्ल्यूमहॉफ येथेही व्हाल नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाण्याचा वापर जलसिंचनासाठीही केला जातो.

व्हाल व हार्टझ नद्यांच्या संगमाजवळ व्हालहार्टझ हे महत्त्वपूर्ण धरण बांधण्यात आलेले आहे. व्हाल खोऱ्यातील उद्योगधंद्यांच्या पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे १९७० नंतर आण्खी एका धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. याशिवाय व्हाल नदीच्या उपनद्यांवरही धरणे बांधण्यात आलेली आहेत. मात्र अतिरिक्त बाष्पीभवनामुळे पाणीपुरवठ्यावर मर्यादा पडल्या आहेत.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate