অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिक्यांग नदी

सिक्यांग नदी

सिक्यांग नदी

शी-जीआंग; सी नदी; वेस्ट रिव्हर (पश्चिम नदी). दक्षिण चीनमधील सर्वांत लांब नदी. लांबी १,९५७ किमी. चीनमधील युनान उच्चभूमी प्रदेशात उगम पावल्यानंतर सामान्यपणे पूर्वेस वाहत जाऊन ती दक्षिण चिनी समुद्राला मिळते. हुंगश्वे व यू हे सिक्यांगचे प्रमुख शीर्षप्रवाह आहेत. जगामध्ये ही नदी सिक्यांग म्हणून ओळखली जात असली, तरी प्रत्यक्षात तिला वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी नावे आहेत.

मुख्यतः वूजोपासूनच्या पुढील प्रवाहमार्गाला शी नदी म्हणून ओळखले जाते. चीनमधील ह्वांग हो (पीम नदी), यांगत्सी या प्रमुख नद्यांच्या तुलनेत ही नदी लांबीने कमी असली तरी यांगत्सी खालोखाल तिच्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण असते. ह्वांग हो व यांगत्सी नद्यांना उत्तर व मध्य चीनमध्ये जे महत्त्व आहे, तेच महत्त्व सिक्यांग नदीला दक्षिण चीनमध्ये आहे. सिक्यांग नदी ४,४८,००० चौ. किमी. क्षेत्राचे जलवहन करते.

सिक्यांग नदीचे निम्म्यापेक्षा अधिक खोरे पर्वतीय असून त्या प्रदेशाची उंची सु. ५०० ते ३,००० मी. दरम्यान आहे, तसेच सु. ४० टक्क्यांपेक्षा अधिक खोरे सु. १०० ते ५०० मी. उंची दरम्यानच्या डोंगराळ प्रदेशाने व्यापले आहे. सखल भागातील त्रिभुज प्रदेशाने एकूण खोऱ्याच्या केवळ ५ टक्के क्षेत्रच व्यापले आहे. नदीखोऱ्यातील काही प्रदेश चुनखडी असल्याने तेथे कार्स्ट भूमिस्वरुपे निर्माण झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या भूपृष्ठाखालून वाहतात. नदीपात्रात अनेक ठिकाणी घळ्या व द्रुतवाह निर्माण झाले आहेत.

सिक्यांगला अनेक महत्त्वपूर्ण उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी उजव्या तीरावर येऊन मिळणारी शीआंग (यू) ही प्रमुख उपनदी युनानमध्ये उगम पावून मुख्य नदीला जवळपास समांतर वाहत जाते. नानिंगजवळ शीआंग नदीला ली नदी येऊन मिळते. लीऊ व ग्वे या सिक्यांगच्या डाव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत. वूजो शहरावरील नदीखोऱ्यातील विविध उपनद्या पर्वतीय व डोंगराळ प्रदेशातून वाहतात. वूजोच्या पुढे ती ग्वांगटुंग प्रांतात प्रवेश करते. मुखाजवळचा त्रिभुज प्रदेश शी किमांग (पश्चिम नदी), बे किमांग (उत्तर नदी) व डुंग किमांग (पूर्व नदी) या तीन प्रमुख नद्यांनी निर्माण केलेला आहे.

सिक्यांगच्या त्रिभुज प्रदेशातील पहिला प्रमुख फाटा माकाऊ शहराच्या पश्चिमेकडून, तर यूकियांग नावाचा दुसरा प्रमुख फाटा माकाऊच्या पूर्वेकडून दक्षिण चिनी समुद्राला मिळतात. मॉन्सून काळात नदीला भरपूर पाणी असते, तर हिवाळ्यात पाणी कमी होते. प्रवाहमार्गात आढळणारे द्रुतवाह व उथळ पात्र यांमुळे अंतर्गत जलवाहतुकीवर निर्बंध येतात. सिक्यांगच्या मुखापासून वूजोपर्यंतचा प्रवाह अंतर्गत जलवाहतुकीस उपयुक्त ठरतो. सिक्यांग खोऱ्यातील पर्वतीय प्रदेशात पाइन, फर, कापूर, बांबू इ. वृक्षांची वने आहेत.

सिक्यांग खोऱ्यात तांदूळ, गहू, मका, ज्वारी, भुईमुग, द्विदल धान्ये, ताग, तंबाखू, ऊस, फळे ही पिके घेतली जातात. प्रवाहमार्गात मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. सिक्यांगचा त्रिभुज प्रदेश हा चीनमधील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. कुंगचुऑन, जीएनचिआंग, लाइपीन, ग्वेईपिंग, तेंगशीन, वूजो, कँटन, काउतून ही प्रमुख नगरे आहेत. हाँगकाँग हे सुप्रसिद्घ बेट या नदीच्या त्रिभुज प्रदेशातील मुखासमोरच आहे.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate