অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंट लॉरेन्स

सेंट लॉरेन्स

सेंट लॉरेन्स

उत्तर अमेरिका खंडातील एक महत्त्वाची तसेच कॅनडातील मॅकेंझीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. आँटॅरिओ सरोवर ते सेंट लॉरेन्स आखातातील अँटिकॉस्टी बेट यांदरम्यानचा १,२८७ किमी. लांबीचा प्रवाह सेंट लॉरेन्स नदीचा मुख्य प्रवाह समजला जातो. असे असले तरी, मिनेसोटा राज्यातील (असंसं.)

सेंट लूइस नदीच्या उगमापासून पंचमहासरोवरांमार्गे कॅबट खाडीपर्यंतच्या प्रवाहाचा (लांबी सु. ४,००० किमी.) समावेश सेंट लॉरेन्समध्येच केला जातो.

मुख्य प्रवाहामुळे पंचमहासरोवरे अटलांटिक महासागराशी जोडली गेली आहेत. उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागातील ही एक मोठी नदीप्रणाली असून तिच्यात सुपीरियर, मिशिगन, ह्यूरन, ईअरी व आँटॅरिओ ही पंचमहासरोवरे, त्यांना जोडणाऱ्या नद्या आणि मुख्य सेंट लॉरेन्स नदीप्रवाह यांचा समावेश होतो. नदीचे जलवाहन क्षेत्र सु. १४,२४,००० चौ.किमी. आहे.

सेंट लॉरेन्स नदी व पंचमहासरोवरे यांची निर्मिती एका रुंद भूसांरचनिक खळग्यात, एकाच हिमनदीच्या घर्षणकार्यातून झालेली आहे. प्लाइस्टोसीन कालखंडाच्या (हिमयुगाच्या) अखेरीस हिमनदीचे वितळणे सुरू होऊन तेथील खोलगट भागात पाणी साचत जाऊन पंचमहासरोवरांची निर्मिती झाली आहे. शेकडो वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेकडे आलेले यूरोपीय समन्वेषक, फरचे व्यापारी आणि वसाहतकऱ्यांना हाच पहिला जलमार्ग सापडला होता.

यूरोपीय या प्रदेशात येण्यापूर्वी या नदीखोऱ्यात अल्गाँक्वियन व आराउकानियन इंडियन लोकांचे वास्तव्य होते. फ्रेंच समन्वेषक झाक कार्त्ये हा १५३५ मध्ये या नदीखोऱ्यात प्रथम आला होता. त्याने येथील उपसागराला सेंट लॉरेन्स आखात हे नाव दिले. तो या नदीमार्गे माँट्रिऑलपर्यंत गेला. परंतु त्यापुढील प्रवाहातील द्रुतवाहांमुळे त्याला तेथेच थांबावे लागले. त्यालाच सेंट लॉरेन्स नदीचा शोधक मानले जाते. त्याकाळी सेंट लॉरेन्सला ‘कॅनडाची माता’ असे संबोधले जाई. त्यानंतर सु. १०० वर्षांनी तिला ‘सेंट लॉरेन्स ’ असे संबोधले जाऊ लागले. फ्रेंचांनी या नदीच्या काठावर क्वीबेक, ट्रवा रीव्ह्यॅर, माँट्रिऑल इ. ठिकाणी वसाहतींची स्थापना केली (इ. स. १६००). त्यानंतर सप्तवार्षिक (१७५६—६३) युद्धाद्वारे ग्रेट ब्रिटनने फ्रान्सकडून सेंट लॉरेन्सचा ताबा घेतला.

सेंट लॉरेन्स नदीप्रवाहाचे आँटॅरिओ सरोवर ते माँट्रिऑल यांदरम्यानचा वरचा भाग, माँट्रिऑल ते क्वीबेक मधील मध्य भाग आणि क्वीबेकच्या पुढील खालचा भाग असे तीन टप्पे केले जातात. वरच्या व मधल्या भागांत काही ठिकाणी प्रवाहाची रुंदी सु. २ किमी. आढळते. काही ठिकाणी ही रुंदी वाढली असून तेथील पात्रात सेंट फ्रॅन्सिस व सेंट लूइस यांसारखी सरोवरे निर्माण झाली आहेत. वरच्या भागातील बरेचसे पात्र द्रुतवाहयुक्त आहे.

मधल्या टप्प्यातील पात्रात सेंट पीटर सरोवराची निर्मिती झाली आहे. खालच्या पात्रात क्वीबेकजवळ नदीपात्राची रुंदी १६ किमी. असून सेंट लॉरेन्स आखातातील अँटिकॉस्टी बेटाच्या पश्चिम टोकाजवळ ती १४५ किमी.पर्यंत वाढलेली आढळते. नदीच्या मुखाशी १,५५,००० चौ.किमी. क्षेत्राचे सेंट लॉरेन्स आखात असून ते उत्तर अमेरिका खंडाच्या अंतर्गत भागाकडे जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

दीच्या सुरुवातीचा सु. दोन तृतीयांश प्रवाहमार्ग (आँटॅरिओ सरोवर ते कॉर्नवॉल) कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्या सरहद्दीवरून तर उर्वरित प्रवाह पूर्णपणे कॅनडातील क्वीबेक प्रांतातून वाहतो. आँटॅरिओ सरोवरापासून ६४ किमी.पर्यंतच्या नदीप्रवाहमार्गात थाउजंड आयलंड्स हा सु. १,७०० बेटांचा समूह आहे.

ओटावा, सॅगने, रिशल्यू व मॅनिक्वागन (कॅनडा) ह्या सेंट लॉरेन्सच्या प्रमुख उपनद्या असून त्यातील ओटावा ही नदी माँट्रिऑलच्या पश्चिमेस सेंट लॉरेन्सला मिळते. सेंट लॉरेन्समधून प्रतिसेकंद सु. १४,००० घ. मी. इतके पाणी आखाताकडे वाहून नेले जाते. सागरी लाटांचा प्रभाव पश्चिमेस ट्रवा रीव्ह्यॅरपर्यंत जाणवतो. या लाटांमुळे नदीतील पाण्याची पातळी ६ मी.पर्यंत वाढते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate