অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अलेक्झांड्रिया

अलेक्झांड्रिया

अलेक्झांड्रिया

ईजिप्तचे प्रमुख बंदर व उन्हाळी राजधानी. लोकसंख्या २०,३२,००० (१९७० अंदाज). ३११२' उ. अक्षांश, २९५४' पू. रेखांश. हे कैरोच्या वायव्येस २०६ किमी., नाईलच्या एका फाट्याच्या मुखाशी, मार्यूत सरोवर आणि भूमध्य समुद्र यांमधील भूशिरावर वसलेले आहे. इ.स.पू. ३३२ मध्ये अलेक्झांडरने हे स्थापले.

ईजिप्तच्या टॉलेमी राजांची राजधानी (इ.स.पू. ३०४ ते इ.स.पू. ३०) असताना हे कार्थेजपेक्षा व्यापारी महत्त्वाचे व पाश्चात्त्य जगातील सर्वांत मोठे शहर आणि ग्रीक व ज्यू संस्कृतींचे तसेच विद्वत्तेचे केंद्र होते. येथील विद्यापीठात खगोलशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टार्कस, गणिती यूक्लिड व शारीरविज्ञ हीरॉफिलस यांसारखे विद्वान होते. येथील दोन राजग्रंथालयांत ४,९०,००० पपायरस गुंडाळ्या (पुस्तके) होत्या. येथील संग्रहालयही समृद्ध होते. आज उपलब्ध असलेले जुन्या कराराचे सेप्ट्यूजिंट नावाने प्रसिद्ध असलेले अ‍ॅलेक्झांड्रियन ग्रीक भाषेतील भाषांतर या काळात येथेच झाले. इ.स.पू. ४७ मध्ये ज्यूलियस सीझरने हे घेतले.

इ.स.पू. ३० मध्ये ऑक्टेव्हिअन (ऑगस्टस) याने अ‍ॅलेक्झांड्रियात प्रवेश केला, तेव्हापासून ते रोमन साम्राज्यात मोडू लागले व रोमच्या खालोखाल वैभवशाली बनले. त्या वेळी येथे तीन लक्ष स्वतंत्र नागरिक आणि त्याहीपेक्षा अधिक गुलाम होते. बायझंटिन साम्राज्यात ते ख्रिस्ती अभ्यासाचे केंद्र झाले. ६४२ मध्ये ते अरबांनी घेतले. त्यापूर्वी अंशतः सीझरच्या स्वारीत, मग ऑरीलियसच्या अंमलात व शेवटी ३९१ मध्ये थीओडोशियसच्या कारकिर्दीत तेथील ग्रंथालये नष्ट झाली होती; शहराचे नाविक महत्त्व ओसरले होते. अरबांनी राजधानी कैरोला नेली.

नाईलचा कालवा गाळाने भरून आल्यामुळे चौदाव्या शतकात अ‍ॅलेक्झांड्रियाचे महत्त्व अगदीच कमी झाले आणि १७९८ मध्ये नेपोलियनने ते घेतले तेव्हा ते एक लहानसे गाव राहिले होते. याच्या जवळच्या आबुकीरच्या उपसागरातच नेल्सनने नेपोलियनच्या आरमाराचा पाडाव केला. १८१९ मध्ये नाईलच्या महमुदीया कालव्याचे काम सुरू झाल्यावर याला पुन्हा ऊर्जितावस्था आली.

शहराजवळच्या बऱ्याच भागाला पाणीपुरवठा होऊ लागला. नाईलचा बराच व्यापार येथून होऊ लागला. आज फेरॉस येथील काही अवशेष, पाँपेईचा स्तंभ व प्राचीन ख्रिस्ती भुयारी कबरस्ताने एवढेच प्राचीन अवशेष शिल्लक आहेत. १८७१ पासून आधुनिक शहर विकसित झाले.

सुप्रसिद्ध ईजिप्शियन कापूस येथूनच निर्यात होतो. ईजिप्तचा ८० टक्के निर्यातव्यापार येथून होतो. कापूस पिंजणे, त्याचे गठ्ठे बांधणे, कातडी कमावणे, सरकीचे तेल काढणे, धातुकाम, कागद, साबण, आगपेट्या, पादत्राणे, पायमोजे, सिगारेट, बीअर इत्यादींचे कारखाने येथे आहेत.

नैर्ऋत्येस चुनखडीच्या खाणी व मिठागरे आहेत. पूर्वेकडील पूर्वीचे बंदर सध्या फक्त मासेमारीच्या उपयोगाचे आहे. आधुनिक बंदर पश्चिमेस आहे. कैरोशी व नाईलच्या त्रिभुज प्रदेशातील महत्त्वाच्या स्थळांशी हे शहर सडकांनी व लोहमार्गांनी जोडलेले आहे. दक्षिणेस दिखैइला व उत्तरेस आबुकीर हे विमानतळ आहेत. येथील विस्तीर्ण उद्याने व रमणीय पुलिने आकर्षक आहेत. येथे फरूक विद्यापीठ आहे; तेथे प्राचीन वस्तूंचा व ग्रंथांचा मोठा संग्रह आहे. (चित्रपत्र)

कुमठेकर, ज. व.

अलेक्झांड्रिया : ईजिप्तमधील प्रमुख बंदर.

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate