অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बफालो

बफालो

बफालो

अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील ईअरी परगण्याचे मुख्य ठिकाण व प्रमुख बंदर. लोकसंख्या ४,३८,६२० (१९७४ अंदाज). हे ईअरी सरोवराच्या पूर्व टोकावर, नायगारा नदीकाठी व नायगारा फॉल्स शहराच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. वर वसले आहे. हॉलंड लँड कंपनीचा एजंट जोसेफ एलिकॉट याने कंपनीसाठी म्हणून १८०३ मध्ये न्यू ॲम्स्टरडॅम नावाने या शहराची स्थापना केली. तत्पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यात असताना ते फोर्ट नायगारा या नावाने ओळखले जाई. १८१२ मधील ब्रिटिशांशी झालेल्या युद्धात हे अमेरिकेचे लष्करी केंद्र होते.

१८१३ मध्ये ब्रिटिशांकडून या शहराची बरीच जाळपोळ करण्यात आली, तरी १८१६ पर्यंत त्याची पुनर्रचना होऊन ते ईअरी परगण्याचे मुख्य ठिकाण करण्यात आले. यादवी युद्धापूर्वीच्या काळात निग्रो गुलामांना कॅनडात पाठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भुयारी रेल्वेमार्गावरील हे अमेरिकेचे अंतिम स्थानक होते. फ्रेंच लोक येथील नायगारा नदीला बेल फ्लेव्ह(सुंदर नदी) असे म्हणत. त्याचाच इंडियनांनी बूफ-फ्लो व पुढे बफालो असा अपभ्रंश केला असावा. १८३२ मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला.

नायगारा फॉल्स येथून मिळणारी पुरेशी जलविद्युत् शक्ती, वाहतूक व दळणवळणाच्या सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता यांमुळे शहराचा औद्योगिक विकास वेगाने झाला. वाफेवर चालणाऱ्या जगातील पहिल्या धान्य उत्थापकाची जोसेफ डार्ट याने येथेच उभारणी केली (१८४३).

लोखंड-पोलाद, पीठ गिरण्या, विद्युत् रासायनिक व विद्युत् धातुकर्म हे येथील प्रमुख उद्योग असून वाहतुकीची साधने, प्लॅस्टिके, रंग, छपाई, जहाज बांधणी, मांस डबाबंद करणे, रेल्वे डबे तयार करणे इ. उद्योगधंदेही येथे मोठ्या प्रमाणावर चालतात. या बंदरात धान्य, कोळसा, चुनखडक, लोहखनिज, लाकूड, खनिज तेल, मोटारगाड्या इ. मालाची चढउतार होते. कॅनडाशी होणाऱ्या एकूण व्यापाराच्या २५% व्यापार येथूनच होतो.

शैक्षणिक दृष्ट्याही बफालो महत्वाचे आहे. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयार्क (१८४६), स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज (१८६७) तसेच अणुकेंद्रीय, वैद्यकीय व अवकाशीय संशोधन संस्था येथे आहेत. ऑल्‌ब्राइटनॉक्स कलावीथी, वैज्ञानिक व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, क्लेनहॅन संगीत भवन, एरेना चित्रपटनिर्मितिगृह इ. सांस्कृतिक केंद्रे, प्राणिसंग्रहोद्यान व अनेक विहारोद्याने येथे आहेत.

मेरिकेचे दोन माजी अध्यक्ष मिलार्ड फिल्मोअर आणि ग्रोव्हर क्लीव्हलंड हे बफालो येथीलच होते. राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्‌ली यांचा खून या शहरी झाला (१९०१). अध्यक्ष थीओडोर रूझवेल्ट यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ह्याच शहरी घेतली होती.


चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate