অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मन्‍रोव्हिया

मन्‍रोव्हिया

मन्‍रोव्हिया

पश्चिम आफ्रिकेतील लायबीरिया प्रजासत्ताकाची राजधानी, देशातील सर्वात मोठे बंदर आणि प्रमुख व्पारी शहर. लोकसंख्या ३,०६,४६० (१९८१ अंदाज). सेंट पॉल नदीमुखाच्या दक्षिणेस माँट् सरॅडो भूशिरावर हे वसले असून ते देशाचे प्रशासकीय, संदेशवहनविषयक तसेच वित्तीय केंद्र आहे.

मन्‍रोव्हियाची १८८२ मध्ये करण्यात आली. अमेरिकेच्या संयुक्तसंस्थानांतून आफ्रिकेत पाठविण्यात आलेल्या गुलामांची वसाहत करण्याकरिता अमेरिकन कॉलोनायझेशन सोसायटी ने मन्‍रोव्हियाची निवड केली. या सोसायटीचे एकेकाळी अध्यक्षपद भूषविणारे पाचवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्‍रो (कार. १८१७-२५) यांच्या सन्मानार्थ सबंध वसाहतीला प्रथम मन्‍रोव्हिया असे नाव देण्यात आले.

१८२४ मध्ये सबंध वसाहतीचे लायबीरिया नामांतर झाल्यावर, गुलामांच्या प्रत्यक्ष वसाहतस्थळाला मन्‍रोव्हिया असे नाव पडले. दुसर्‍या महायुद्धकाळात अमेरिकन बुशरॉड बेटांवरील मन्‍रोव्हियाच्या खोल बंदराचा उपयोग आपल्या पाणबुडी-तळासाठी केला होता. या खोल बंदराचा वापर १९४८ पासून बोटवाहतुकीकरिता चालू करण्यात आला.

मन्‍रोव्हिया हे आधुनिक नगर असून येथे सर्वदेशीय लोकांचा आढळ दिसून येतो. शहरात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या नव्या भव्य इमारती आहेत. शहराचा माबां पॉइंट हा भाग निवासी क्षेत्र म्हणून ओळखला जात असून त्याचाविस्तार होत आहे. याच भागातील युनायटेड नेशन्स ड्राइव्ह मध्ये बहुतेक परदेशी वकिलातींच्या इमारती आहेत. लायबीरियास स्थानांतर केलेल्या अमेरिकन निग्रोंचे वंशज सांप्रत शहराच्या राजकीय,आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत आघाडीवर दिसतात.

शहरातील दुमजली लाकडी घरांवर अमेरिकेच्या संयुक्त दक्षिणी राज्यांत वा प्रदेशात दिसून येणार्‍या वास्तू व इमारती यांची स्थापत्यशास्त्रीय छाप जाणवते, त्याचबरोबर मातीच्या भिंती आणि शाकारलेली छपरे यांनी युक्त घरे आसमंतीय ग्रामीण आफ्रिकी प्रदेशाची आठवण करून देतात.

मन्‍रोव्हिया बंदर लोहमार्गांनी बोमी हिल्स व बाँग मौंटन्समधील समृद्ध लोहधातुकांच्या खाणींशी जोडण्यात आले आहे. मन्‍रोव्हियाच्या नव्या खुल्या बंदराची उभारणी १९४८ मध्ये अमेरिकेच्या अर्थसाहाय्याने करण्यात आली. रबर, लोहधातुक, खोबरे व खोबरेल तेल, सोने, वनपदार्थ, टॅपिओका यांची या बंदरातून निर्यात करण्यात येते.

शहरात कौले, विटा, साबण, फर्निचर सामान, रंग, सिमेंट, परिष्कृतखनिज तेल, अन्नपदार्थ, औषधे इत्यादींचे निर्मितिउद्योग असले, तरी शहराची अर्थव्यवस्था अमेरिकेला निर्यात केल्या जाणार्‍या रबरावर निर्भर आहे. शहरात जेम्स स्प्रिग्ज पाइन विमानतळ असून शहराच्या पूर्व-आग्नेयीस ४३ किमी. वर रॉवर्ट् स फील्ड येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

लायबीरियाचे शैक्षणिक केंद्र म्हणून मन्‍रोव्हियाला महत्व असून तेथे अनेक विद्यालये, लायबीरिया विद्यापीठ (स्था.१८३६, सनदप्राप्ती १९५० मध्ये), कॉलेज ऑफ वेस्ट आफ्रिका, बॅप्टिस्टांनी स्थापिलेले मन्‍रोव्हिया महाविद्यालय, सेंट पॅट्रिक्स कॅथलिक महाविद्यालय वगैरे शिक्षणसंस्थाचा समावेश होतो.

शहरातील अनेक भव्य वास्तूंमध्ये कॅपिटॉल (१९५८), नगरभवन, न्यायमंदिर (टेंपल ऑफ जस्टिस) वगैरे प्रेक्षणीय आहेत. एक शासकीय व दोन मिशन रूग्णालये, जॉन एफ्. केनेडी मिमॉरिअल हॉस्पिटल इत्यादींद्वारा वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतात.

 

गद्रे, वि. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate