অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

याल्टा

याल्टा

याल्टा

यूरोपीय रशियातील युक्रेन सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या क्रिमिया ओब्लास्टमधील काळ्या समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर आणि सुप्रसिद्ध आरोग्यस्थान.

लोकसंख्या ८४,००० (१९८३ अंदाज). हे सेव्हॅस्टोपोलच्या पूर्वेस ५५ किमी.वर असून क्रिमियन पर्वतराजी व काळा समुद्र यांदरम्यान एक नैसर्गिक रंगमंडलसदृश द्रोणीत वसलेले आहे.

सोव्हिएट रिव्हिएरास्थित व भूमध्य समुद्रीय हवामानसंपन्न याल्टा हे १४८० पासनू आरोग्यस्थान म्हणून विख्यात होते. सांप्रत ते कामगारांचे आरोग्यकेंद्र म्हणूनही ओळखले जाते. १८३८ मध्ये याल्टाला शहराचा दर्जा मिळाला.

नुकूल हवामान, सौम्य हिवाळे व समुद्र आणि पर्वतराजी यांदरम्यानचे रमणीय निसर्गसौंदर्य यांमुळे याल्टा हे रशियातील सर्वाधिक लोकप्रिय विश्रामस्थान व आरोग्यस्थान बनले असून येथे अनेक हॉटेले व आरोग्यधामे आहेत; अंतॉन चेकॉव्ह (१८६०१९०४) या विख्यात रशियन कथाकार-नाटककाराच्या सूचनेवरून १९०० साली बांधण्यात आलेले आरोग्यधामही येथेच आहे.

याशिवाय शहरात रंगमंदिर, संग्रहालये, विशेष शैक्षणिक व संशोधनविषयक संस्था तसेच महाविद्यालये आहेत. येथे मद्यनिर्मिती, फळे डबाबंदीकरण, तंबाखू-प्रक्रिया इत्यादींचे उद्योग चालतात.

काळ्या समुद्रावरील बंदरांतून जाणाऱ्या प्रवासी जहाजांना तर याल्टा हे इंधन व अन्य आवश्यक माल भरण्याचे, दुरुस्तीचे तसेच माल उतरविण्याचे-चढविण्याचे महत्त्वाचे थांब्याचे बंदर म्हणून जवळचे वाटते.

याल्टामधून मद्य, तंबाखू, द्राक्षे व फळफळावळ यांची निर्यात केली जाते. सींफ्यिरॉपल शहराशी याल्टा हे सडकेने जोडलेले आहे.

दुसऱ्या महायुद्धाकाळात दोस्त राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद या शहरात भरली होती [⟶ याल्टा परिषद].


गद्रे, वि. रा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate