অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वान्झी

स्वान्झी : नृत्य करतानाचे दृश्यस्वान्झी

ग्रेट ब्रिटनच्या वेल्स विभागातील दक्षिण ग्लॅमरगन परगण्यातील ऐतिहासिक, औद्योगिक शहर व बंदर. ते ब्रिस्टल खाडीवर ट्वे नदीमुखाशी वसले आहे. लोकसंख्या २,३९,००० (२०११).

दक्षिण वेल्स हा ग्रेट ब्रिटनमधील प्रमुख कोळसा आणि धातू उत्पादक प्रदेश असून स्वान्झी हे या प्रदेशातील महत्त्वाचे केंद्र आहे.

बाराव्या शतकात येथे नॉर्मन हेन्री डी न्यूबर्ग याने किल्ला बांधला होता; मात्र वेल्समधील बंडखोर ओवाइन ग्लिनडूर याने त्याचा विध्वंस केला. अठराव्या शतकात परिसरातील कोळसा खाणींमुळे कोळसा उत्पादक व निर्यातक म्हणून स्वान्झीला महत्त्व प्राप्त झाले. नंतर येथे तांबे प्रक्रिया उद्योगाचा विकास झाला.

१७९८ मध्ये येथे जडवाहतूकीस योग्य असा कालवा व रेल्वेमार्ग यांची बांधणी झाल्यामुळे येथील धातूउद्योगास अधिक गती मिळाली. जस्त, कथिल, अ‍ॅल्युमिनियम यांसारख्या अलोह धातूवर प्रक्रिया करून त्यापासून उद्योगांस आवश्यक पत्रे तयार करण्याचे कारखाने येथे उभे राहिले. एकोणिसाव्या

शतकाच्या पूर्वार्धात येथील कोळसा व धातू उद्योग हे उर्जितावस्थेस पोहोचले; परंतु १९८० नंतरच्या बदलत्या जागतिक अर्थकारणांमुळे ह्या उद्योगांत नाट्यमय रीत्या घट झाली. अलिकडे येथील औद्योगिक संरचनेत बदल झाले असून धातू उद्योगाच्या जागी मोटारवाहन उद्योग, अभियांत्रिकी उत्पादन, प्लॅस्टिक उत्पादन, डबाबंद अन्नपदार्थ प्रक्रिया उत्पादन इत्यादींचे उद्योग वाढीस लागले आहेत. स्वान्झी खोर्‍यातील लॅनड्रसी येथे एक तेलशुद्धीकरण कारखाना असून या कारखान्यात मिलफर्ड हेवन येथून पाईपलाइनद्वारा तेलाची आयात केली जाते आणि प्रक्रिया केलेले तेल जवळच बागलान येथील पेट्रोरसायन उद्योगासाठी पुरविले जाते.

हे शहर आता ग्रेट ब्रिटनमधील एक प्रमुख सेवाकेंद्र म्हणून प्रसिद्धीस आले आहे. १९६९ मध्ये यास चार्ल्स् ऑफ वेल्सकडून शहराचा दर्जा मिळाला. येथे उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून त्यांमधून धातू-विज्ञान व अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. अटलांटिक महासागरातील उष्ण प्रवाह व त्यांवरून सतत येणारे दमट पश्चिमी वारे यांमुळे येथील हवामान वर्षभर उबदार व दमट असते.

रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ साउथ वेल्स संग्रहालय, ग्रीन विवियन आर्ट गॅलरी, स्वान्झी संग्रहालय, डायलन टॉमस सेंटर, अलेझांड्रिया हाउस, स्वान्झी किल्ला ही येथील महत्त्वाची स्थळे आहेत.

 

भटकर जगतानंद

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate