অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आइसलँड

आइसलँड

(लीद्वेल्दिद ईस्लांत). उत्तर अटलांटिकमध्ये यूरोपच्या वायव्येस असलेले बेट व प्रजासत्ताक राष्ट्र. अक्षांश ६३२४' ते ६६३३' उ. उत्तरेकडील व दक्षिणेकडील बेटे धरून ६३१९' उ. ते ६७१०' उ. व रेखांश १३३०' ते २४३२' प. पूर्वपश्चिम लांबी सु. ४८० किमी., दक्षिणोत्तर रुंदी सु. ३०० किमी. क्षेत्रफळ १,०३,१०० चौ.किमी. व लोकसंख्या २,०७,१७४ (१९७१). हे ग्रीनलंडच्या आग्नेयीस सु. १९० किमी. व स्कॉटलंडच्या वायव्येस ८०० किमी. दूर आहे.

भूवर्णन

आइसलँड हे ज्वालामुखीक्रियेने उत्पन्न झालेले बेट असून हिमयुगातील घडामोडींचे अनेक अवशेष येथे आढळतात. नैर्ऋत्य किनाऱ्यालगतचा व काही दऱ्याखोऱ्यांचा थोडासा प्रदेश वगळला, तर बाकीचा सर्व प्रदेश पर्वतमय व पठारी आहे. याची सरासरी उंची ७००—८०० मी. आहे.

सु. बारा टक्के भाग हिमनद्या व हिमक्षेत्राने व्याप्त असून आग्नेयीकडील वात्‍नायकूत्ल हिमक्षेत्र सर्वांत मोठे (७,५४७ चौ.किमी. आहे.) ह्‌वानादाल्सह्‌नूकर (२,११९ मी.) हे आइससलँडमधील सर्वांत उंच शिखर येथेच आहे. आइसलँडचा अकरा टक्के प्रदेश लाव्हारसाच्या उद्रेकाने बनलेला असून सध्या येथील जिवंत ज्वालामुखींची संख्या शंभरांवर आहे. १७८३ चा स्काप्तारचा, १९१८ चा कटलाचा (९७० मी.), १९३४ चा ह्‌वानादाल्सह्‌नूंकरचा आणि १९४७ चा व १९७० चा हेक्लाचा (१,४४७ मी.) हे ज्वालामुखी उद्रेक फार विनाशक ठरले.

गरम पाण्याचे फवारे व झरे, सरोवरे, लहान मोठे धबधबे अनेक ठिकाणी आढळतात. हिमक्षेत्र आणि अंतर्गत ओसाड पठारी प्रदेश यांमुळे आइसलँडचा ७५% भाग लोकवस्तीस प्रतिकूल आहे. किनारपट्टी सु. ५,९७० किमी., दंतुर पण खडकाळ, अनेक फिओर्डनी व उपसागरांनी युक्त आहे. आइसलँडमधील नद्या लहान, वाहतुकीस निरुपयोगी असल्या तरी त्या विद्युत्‌शक्ति-उत्पादनास उपयुक्त आहेत.

त्तर ध्रुववृत्ताजवळ असूनही गल्फ प्रवाहामुळे आइसलँडचे तपमान हिवाळ्यातही फार खाली जात नाही. हिवाळा मोठा व उन्हाळा अल्प मुदतीचा असतो ⇨रेक्याव्हीक या राजधानीच्या शहरी तपमान–१से. ते ११से. पर्यंत असते. मात्र आइसलँडचे हवामान एकंदरीत चंचल व नित्य बदलणारे असते. धुके, वारे व पाऊस ही येथील नित्याची बाब आहे; परंतु विजांचा कडकडाट येथे फारसा अनुभवास येत नाही किंवा वावटळीही होत नाहीत. वर्षाकाठी सरासरी सु. ८५ सेंमी. पाऊस पडतो. काही भागांत मात्र पाऊस पुष्कळच कमी आहे. इगदी उत्तरेकडील बेटांवर ‘मध्यरात्रीचा सूर्य’ दिसतो.

आइसलँडमध्ये मोठ्या वनस्पतींचे दुर्भिक्षच आहे. शेवाळ, गवत व खुरटी झुडपे ही येथील प्रमुख वनस्पती असून अ‍ॅश, अ‍ॅस्पेन, बर्च आणि विलो ही झाडे काही ठिकाणी आढळतात. वन्य फुलांच्या सु. ४०० जाती येथे आढळल्या आहेत.

पाळीव जनावरांत मेंढरे व बकऱ्या, घोडे, गायी हे मुख्य प्राणी असून पशुपालन हा येथील सोळा टक्के लोकांचा व्यवसाय आहे. वन्य प्राण्यांत खोकड येथील मूळचा असून १८ व्या शतकापासून रेनडियर येथे आणला गेला आहे. सोनेरी प्लव्हर, कर्ल्यू, बदक, किरा, हंस, गीज हे येथील प्रमुख पक्षी. टार्मिगन व आयडर डक हे पक्षी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. आइसलँडच्या नद्यांत सॅमन व समुद्रात कॉड, हॅडॉक, हॅलिबट, हेरिंग इ. मासे भरपूर आहेत. देवमासाही पुष्कळ आहे.

इतिहास

प्राचीन काळी ग्रीक व रोमन लोकांना आइसलँडची माहिती असली, तरी नवव्या शतकापर्यंतचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. नॉर्वेचा इंगोल्फर आरनॉरसन याने ८७४ मध्ये रेक्याव्हीक येथे प्रथम वस्ती केली. यानंतर येथे नॉर्वे, स्कॉटलंड, आयर्लंड, ऑर्कनी, शेटलंड व हेब्रिडीझमधून आलेल्या लोकांनी वसाहती केल्या.

व्हायकिंग राजांच्या एकतंत्री अंमलाचा कटू अनुभव घेतलेल्या वसाहतवाल्यांनी ९३० मध्ये आइसलँडमध्ये उमरावशाहीसद्दशलोकशासन स्थापण्याचा प्रयत्‍न केला. त्यांनी सर्व वसाहतींचे ३६ गटांत विभाजन केले व त्यावर, ‘गोडारां’च्या म्हणजे नायकांच्या नेमणुका केल्या.

वर्षातून दोन आठवडे थींगव्हेट्लिर येथे सर्व जमाती-प्रमुखांची परिषद भरे. या मेळाव्याला 'आल्थिंग' म्हणत. आजही आइसलँडमधील संसदेला 'आल्थिंग' म्हणतात. आल्थिंगला कायदे करण्याचे व न्यायदानाचे अधिकार होते.

याच काळात एरिक द रेडच्या नेतृत्वाखाली ग्रीनलंडची वसाहत व त्याचा मुलगा लेव्ह एरिकसन याने लावलेला अमेरिकेचा शोध ह्या प्रमुख घटना घडल्या. यांचे वर्णन आइसलँडच्या सागा ह्या साहित्यप्रकारांत मिळते.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate