অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्रीट

क्रीट

भूमध्य समुद्रातील ग्रीसचे सर्वांत मोठे बेट व यूरोपातील प्राचीन समृद्ध संस्कृतीचे एक स्थळ. क्षेत्रफळ ८,३३१ चौ.किमी.; लोकसंख्या ४,८३,२५८ (१९६१). हे ग्रीसच्या आग्नेयीस सु. १३० किमी. व आफ्रिकेच्या उत्तरेस २५६ किमी.वर असून इजीअन समुद्राच्या दक्षिण टोकाशी आहे. पूर्वपश्चिम २५५ किमी. लांब व दक्षिणोत्तर ११–५६ किमी. रुंद पसरलेल्या या बेटामध्ये डोंगरांच्या रांगा पसरल्या असून मध्यभागातील आयडा (२,४१७ मी.) हे सर्वांत उंच शिखऱ आहे. उत्तरेकडील किनारा दंतुर असून त्यामध्ये अनेक आखाते बनली आहेत. क्रीटचे हवामान सौम्य व भूमध्यसामुद्रिक आहे. उन्हाळ्यात हवा कोरडी असते व हिवाळ्यात पाऊस पडतो. बेटावरील बहुतेक जंगले नष्ट झाली असून नदीखोरी सुपीक आहेत. ऑलिव्ह, द्राक्षे, नारिंगे, लिंबू, बदाम, अक्रोड, बटाटे, भाजीपाला ही येथील मुख्य पिके होत. शेतीबरोबरच पशुपालन हाही महत्त्वाचा उद्योग आहे. थोड्यफार प्रमाणात येथे जिप्सम, चुनखडी, लोहधातुक व हलका कोळसा सापडतो. कँडिया हे सर्वांत मोठे शहर असून राजधानीचे ठिकाण आहे. कानीया, रेथिम्नॉन ही येथील इतर महत्त्वाची शहरे होत.

इ. स. पू. ३१०० ते इ. स. पू. १४०० च्या दरम्यान येथे एक समृद्ध संस्कृती नांदत होती. होमरच्या ओडिसीमध्ये १०० नगरांचा उल्लेख असून क्रीटच्या सुवर्णयुगाचे त्यात वर्णन केले आहे. त्याच्या अनुरोधाने प्रथम श्‍लीमनने व पुढे १९०० मध्ये ⇨आर्थर एव्हान्झ ने येथे उत्खनन केले. ह्यानंतर इतर यूरोपीय संशोधकांनीही पुढे संशोधन चालू ठेवले आहे. एव्हान्झच्या मते इ. स. पू. ३५०० मध्ये येथे मानवी वस्ती होती, तर कार्बन १४ पद्धतीप्रमाणे असे आढळले आहे, की इ. स. पू. ६१०० मध्ये येथे मानवी वस्ती होती. ह्या पहिल्या नवाश्मयुगीन संस्कृतीतील लोक मुख्यत्वे शेती व शिकार हे व्यावसाय करीत. त्यांच्याजवळ दगडी कुऱ्हाडी, जाती, पाटा-वरवंटा वगैरे दगडी उपकरणे व हत्यारे होती. प्रथम त्यांची वस्ती स्थिर नव्हती, परंतु पुढे नॉसस  हे शहर सुधारत जाऊन, तिथे विटांच्या व दगडांच्या इमारती बांधण्यात आल्या. ह्या काळातील काही चुलखडे, घराचे आराखडे व मृत्तिकाशिल्पे उत्खननात उपलब्ध झाली आहेत. ह्या सुमारास फायस्टॉससारखी इतर शहरे निर्माण झाली. मात्र ब्राँझयुगात (इ. स. पू. ३०००–१४००) आशिया मायरनरमधून काही लोक क्रीटमध्ये आले व एक नवीन सुसंस्कृत समाज उदयास आला. इ. स. पू. १००० च्या आसपास तांबे व ब्राँझ ह्यांचा वापर हा समाज करीत असे. क्रीटमधील राजकीय सत्तेचा आणि संस्कृतिक वैभवाचा शेवट इ. स. पू. १४०० मध्ये झाला व याला ग्रीसमधून येणारे अॅकियन वा डोरियन लोक कारणीभूत झाले असावेत. येथील मिनोज नावाचा राजा ग्रीक पुराणकथांत प्रसिद्ध आहे, परंतु त्याचे अस्तित्व इतिहासज्ञांना मान्य नाही. त्यांच्या मते हे राजघराण्याचे किंवा राजपदाचे नाव असावे. क्रीट हे बेट युरोप, आफ्रिका आणि आशिया ह्या तिन्ही खंडांना जवळ असल्याने येथील लोकांना ह्या सर्वांशी व्यापार करणे सोयीचे गेले आणि या व्यापारावरच त्यांना संपत्ती प्राप्त झाली. त्यातूनच पुढे नॉसस, एयीया, ट्राएडा, फायस्टॉस अशांसारखी शहरे उत्पन्न झाली. यांतील नॉसस हे महत्त्वाचे व राजधानीचे शहर होय. येथील अवशेषांत मोठे राजप्रासाद, हवेल्या, प्रेक्षागृहे इ. वास्तू आढळल्या असून राजप्रासादांच्या भिंतींवर अत्यंत लालित्यपूर्ण चित्रे रेखाटलेली आहेत. क्रीटमधील रोजच्या वापरातील प्रत्येक वस्तू जास्तीत जास्त कलापूर्ण करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. मृत्पात्रे वैविध्यपूर्ण असून त्यांवर प्राण्यांच्या आकृत्या व देवादिकांचे आकार आढळतात. बहुतेक मृत्पात्रे रंगविलेली असून नक्षीने चितारलेली आढळतात. त्यांवरील चकचकीतपणा आणि नाजुकता ह्यांमुळे ती अद्वितीयच म्हणावी लागतील. येथील शिल्प गौण आहे. बहुतेक मूर्ती एकाच आकाराच्या आहेत. मात्र नागदेवांच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मृत्स्नाशिल्प व चित्रकला ह्यांबाबतीत क्रीट हे जगातील प्राचीन  संस्कृतींत सर्वश्रेष्ठ ठरते. आतापर्यंत हाती आलेल्या उपलब्ध मजकुरात ह्या काळातील राजकीय इतिहासावर काहीच प्रकाश पडत नाही. (चित्रपत्र ४३).

संदर्भ : 1. Matz, Friedrich, Crete and Early Greece, London, 1962.

2. Palmer, L. R.; Boardman, John, On the Knossos Tablets, London, 1963.

3. Reverdin, Olivier; Hoegler, R. G. Crete in Colour, London, 1961.

लेखक : म.श्री.माटे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/30/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate