অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फॉकलंड बेटे

फॉकलंड बेटे

ब्रिटिशांच्या ताब्यात असलेली द. अटलांटिक महासागरातील बेटे. क्षेत्रफळ १२,१७३ चौ. किमी. लोकसंख्या १,८०५ (१९७७). ही द. अमेरिकेच्या दक्षिण टोकाच्या पूर्वेस ४८० किमी. मॅगेलन सामुद्रधुनीच्या पूर्वेस ५१° द. ते ५३° द. अक्षांश व ५७° प. ते ६२° प. रेखांश यांदरम्यान आहेत.

ईशान्य-नैर्ऋत्य दिशेत असणाऱ्या फॉकलंड या अरुंद सामुद्रधुनीने अलग झालेल्या पूर्व फॉकलंड (क्षेत्रफळ ६,६०५ चौ. किमी.) व पश्चिम फॉकलंड (४,५३२ चौ. किमी.) या दोन प्रमुख बेटांशिवाय इतर लहानमोठ्या अशा २०० बेटांचा समावेश त्यांत होतो. यांशिवाय फॉकलंड बेटांच्या पूर्वेस १,३५० ते १,९५० किमी.वर असणाऱ्या साउथ जॉर्जिया बेट, साउथ सँडविच बेटे तसेच शाग व क्‍लार्क रॉक्स बेटांचा प्रशासकीय दृष्ट्या फॉकलंड बेटांतच समावेश होतो. पूर्व फॉकलंड बेटावरील स्टॅन्ली [लोकसंख्या १,००० (१९७७)] ही त्यांची राजधानी आहे.

भूवर्णन

बेटांचा भूभाग बव्हंशी ओसाड, तुरळक दलदलींचा व डोंगराळ आहे. या बेटांच्या उत्तरेकडील भूभागास वळ्या पडलेल्या आढळतात. श्वाझल व ब्रेंटन या सामुद्रधुन्यांमुळे पूर्व फॉकलंड बेटाचे दोन समान भाग झाले आहेत. त्याच्या उत्तरेकडे पूर्व-पश्चिम अशी विक्‌हॅम डोंगररांग असून बेटावरील सर्वोच्च शिखर अझबर्न (६८४ मी.) तेथेच आहे.

पश्चिम फॉकलंड बेटावर फॉकलंड सामुद्रधुनीशी समांतर अशी हॉर्नबी ही डोंगररांग असून या बेटांवरील मौंट ॲडम (७०६ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. बेटांवरील नद्या लहान असून त्यांच्या खोऱ्यांत पीट प्रकारची मृदा आढळते. या बेटांचा किनारा दंतुर आहे.

टसक गवत : पेंग्विन पक्ष्यांचे वसतिस्थान, फॉकलंड बेटे.

येथील हवामान पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम झालेला असून स्टॅन्ली येथे त्यांचा ताशी वेग २५ किमी.पेक्षा जास्त आढळतो. येथे जानेवारीत ९° से. तर जुलैत ३° से. तपमान आढळते. या बेटांवर वर्षभर पाऊस पडत असला, तरी त्याचे कमाल प्रमाण डिसेंबर-जानेवारीत व किमान प्रमाण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आढळते. वार्षिक सरासरी पर्जन्य ६३·५ सेंमी. आहे.

वर्षातील सु. ५० दिवस सौम्य प्रमाणात बर्फवृष्टी होते. येथे वृक्षराजी आढळत नाही. तथापि अटलांटिक हीद, पांढरे गवत व लाल क्रोबेरी इ. प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. नदीखोऱ्यांतील पीट मृदेत लिली या फुलझाडाचे विविध प्रकार आणि समुद्रकिनारी व काही लहान बेटांवर टसक नावाचे गवत आढळते. येथे प्राणिजीवन फारसे अस्तित्वात नसले. तरी सु. साठ प्रकारचे पक्षी आढळतात. त्यांपैकी पेंग्विन व ॲल्‍बट्रॉस हे प्रमुख होत.

इतिहास व राज्यव्यवस्था

फॉकलंड बेटांच्या आद्य संशोधकांबद्दल मतभेद आहेत; परंतु जॉन डेव्हिस (१५५० – १६०५) या ब्रिटिश समन्वेषकाने १५९२ मध्ये त्यांचा शोध लावला असे मानतात. १६९० मध्ये जॉन स्ट्राँग या ब्रिटिश अधिकाऱ्याने येथील सामुद्रधुनीस ल्यूशियस कॅरी फॉकलंड (१६१० ? – १६४३?) या नौदल अधिकाऱ्यांचे नाव दिले. तेच पुढे या बेटांस पडले. फ्रेंच मार्गनिर्देशक ल्वी आंत्वान दे बूगँव्हील (१७२९-१८११) याने १७६४ मध्ये पूर्व फॉकलंड बेटावर ‘पोर्ट लुईस’ ही वसाहत स्थापन केली; तर पश्चिम फॉकलंड बेटावर ब्रिटिशांनी १७६५ मध्ये आपली वसाहत उभारली. तीच पुढे एगमाँट या नावाने ओळखली जाऊ लागली.

फ्रेंचांनी आपली येथील वसाहत १७६६ मध्ये स्पेनला दिली व तिचे ‘सोलेदाद’ असे नामांतर करण्यात आले. स्पॅनिशांनी ब्रिटिशांना येथून १७७० मध्ये पिटाळून लावले. त्यांनी ब्रिटिशांना एगमाँट किल्‍ला व बंदर दिल्यानंतर ब्रिटिश-स्पॅनिश संघर्षाचा शेवट झाला. पुढे अर्जेंटिनात स्पॅनिशांच्या विरुद्ध उठाव झाला व परिणामतः स्पॅनिशांना फॉकलंड बेटांवरील आपला हक्‍क सोडावा लागला (१८०६). १८२० मध्ये त्यांनी ही बेटे पुन्हा ताब्यात घेतली.

१८३३ मध्ये ब्रिटिशांनी स्पॅनिशांचा पराभव करून येथे आपली सत्ता स्थापन केली. १८४४ मध्ये सोलेदादहून स्टॅन्ली येथे राजधानी हलविण्यात आली. १८९२ मध्ये या बेटांस वसाहतीचा दर्जा मिळाला. पहिल्या महायुद्धात या बेटांवर ब्रिटिश-जर्मन नाविक चकमकी उडाल्या. सध्या या बेटांवर ब्रिटीशांचा अंमल असला, तरी अर्जेंटिनाही त्यांवर आपला हक्‍क सांगत आहे. त्यांनी या बेटांस ‘ईस्लास माल्व्हीनास’ हे नाव दिले. आहे. अर्जेंटिनाने १९४६ मध्ये संयुक्त राष्ट्रांत हा प्रश्न उपस्थित केला होता. सध्या ब्रिटिश सरकारने नियुक्त केलेला राज्यपाल हा कार्यकारी मंडळ व विधिमंडळ यांच्या साहाय्याने या बेटांचा कारभार पाहतो.

आर्थिक व सामाजिक स्थिती

येथील अर्थव्यवस्था मेंढपाळी व्यवसायावर अवलंबून आहे. मेंढ्यांपासून दरवर्षी सु. २१,५४,५६२ किग्रॅ. लोकर उत्पादन होते. याशिवाय मद्ये, स्पिरिट, तंबाखू यांवरील जकात व मुद्रांक विक्री या उत्पन्नाच्या इतर बाबी आहेत. येथे १९७७ मध्ये ६,४८,३७६ मेंढ्या; ८,८५० गुरे; २,५३० घोडे असे पशुधन होते. ‘फॉकलंड आयलंड्‌स कंपनी’ने (१८५१) या बेटांच्या आर्थिक विकासास चांगलीच मदत केली आहे. अन्नधान्यांचे उत्पादन अत्यंत अल्प असून काही भागांत ओट, बार्ली, बटाटे ही पिके घेतली जातात.

लोकर तसेच व्हेल, सील माशांचे तेल यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. अन्नधान्ये, इमारती लाकूड, कापड, कोळसा इ. आयात केली जातात. दळणवळणाच्या सोयी पुरेशा नाहीत. अर्जेंटिनाच्या हवाईदलामार्फत कोमोदोरो रिव्हादाव्हिया ते स्टॅन्ली अशी साप्ताहिक हवाई वाहतूक चालते. देशांतर्गत हवाई वाहतुकीचे स्टॅन्ली येथे केंद्र आहे. फॉकलंड आयलंड्‌स कंपनीमार्फत वर्षातून चार-पाच वेळा सागरी वाहतूक केली जाते. नभोवाणी व दूरध्वनी यांची सोय असून स्टॅन्ली येथे नभोवाणी केंद्र आहे. १९७७ मध्ये ५९१ रेडिओ परवानाधारक होते. या बेटांवर स्टॅन्ली, डार्विन यांसारखी मोजकीच बंदरे आहेत. फॉकलंड पौंड हे येथील चलन असून ऑक्टोबर १९७८ मध्ये फॉकलंड पौंड = १०० पौंड स्टर्लिंग = २०९·९० अमेरिकन डॉलर असा विनिमय दर होता.

येथील लोकसंख्या १९७० मध्ये १,९०३ होती. त्यांपैकी ७९% लोकांचा जन्म याच बेटांवर झालेला होता. त्यांतील ९८% लोकांना ब्रिटिश नागरिकत्व आहे. इंग्‍लंडमधील चर्चशी संबंधित ६५% लोक आहेत; तर २३% लोक प्रॉटेस्टंट पंथीय व ११% रोमन कॅथलिक आहेत. स्थूलमानाने येथील समाजजीवनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा आहे.

येथे एक कामगार संघटना असून वार्धक्य-वेतन, मुलांसाठी भत्ते व कामगारांना नुकसानभरपाई इ. कल्याणकारी तरतुदी केलेल्या आढळतात. ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण आहे. स्टॅन्ली येथे दोन विद्यालये व डार्विन येथे वसतिगृह-विद्यालय असून यांशिवाय इतर पाच ठिकाणी विद्यालये आहेत. ग्रामीण भागांत फिरत्या शिक्षकांमार्फत शिक्षण दिले जाते. १९७६ मध्ये येथे ३३१ विद्यार्थी होते व ३१ विद्यार्थी परदेशांत शिक्षण घेत होते. येथे दैनिके नाहीत; मात्र एक मासिक निघते. द गॅझेटसरकारतर्फे प्रकाशित होते. येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध असून स्टॅन्ली येथील रुग्णालयात ३२ खाटांची सोय आहे. फुटबॉल, क्रिकेट, गोल्फ हे खेळ लोकप्रिय आहेत. स्टॅन्ली हे राजधानीचे शहर उत्तम बंदर असून ते व्हेल माशांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. समृद्ध पक्षिजीवन व ट्राउट माशांची शिकार ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत.

 

डिसूझा, आ. रे.; गाडे, ना. स.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate