অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बोर्निओ

बोर्निओ

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट. क्षेत्रफळ ७,४३,३३० चौ.किमी. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४ द. ते ७५०’ उ. व १०९ ३५’ पू. ते ११९ १०’ पू. असा आहे. नैर्ऋत्य-ईशान्य कमाल लांबी १,३३६ किमी. व कमाल रुंदी ९६५ किमी. ग्रेट सूंदा द्वीपसमूहातील साधारणपणे पंचकोनाकृती दिसणाऱ्या या बेटाच्या वायव्येस दक्षिण चिनी समुद्र, ईशान्येस सूलू समुद्र, पूर्वेस उ. भागात सेलेबीझ समुद्र व दक्षिण भागात माकॅसर सामुद्रधुनी; दक्षिणेस जावा समुद्र आणि पश्चिमेस कारीमाता सामुद्रधुनी आहे.

राजकीय दृष्ट्या सारावाक, साबा, ब्रूनाई व कालीमांतान (बोर्निओ) असे या बेटाचे चार विभाग पडत असून त्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे : क्षेत्र. १२,१४,००० चौ. किमी., लोक. ११,७३,९०६ (१९७८ अंदाज); ८०,५२० चौ. किमी., ६,५५,२९५ (१९७०); ५,८०० चौ.किमी., २,०१,२६० (१९७८ अंदाज); ५,५०,२०३ चौ.किमी., ५१,५२,१६६ (१९७१). यांपैकी उत्तर बोर्निओतील सारावाक व साबा ही मलेशियाची राज्ये आहेत. ब्रूनाई हा ब्रिटिशांकित प्रांत, तर दक्षिणेकडील कालीमांतान हा इंडोनेशियाचा एक भाग आहे. कालीमातांनचे पश्चिम, मध्य, दक्षिण व पूर्व असे चार प्रशासकीय विभाग पडत असून बेटाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७०% क्षेत्र कालीमांतान प्रदेशाने व्यापले आहे.

भूवर्णन

बोर्निओचा बराचसा भाग डोंगराळ आहे. बेटावरील प्रमुख पर्वतश्रेणी नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने पसरली असून तीमुळे बेटाची मलेशियन व इंडोनेशियन अशी राजकीय प्रदेशविभागणी झाली आहे. या पर्वतप्रदेशांची उंची ६१० मी.पासून १,९०५ मी. पर्यंत वाढलेली आढळते. या पर्वतरांगांत मलर, स्कफानर, इरॅण व तामाबो या पर्वतरांगा असून उत्तरेकडील साबामधील मौंट किनाबालू (४,१०१ मी.) हे बेटावरील सर्वोच्च शिखर आहे; तर स्कफानर पर्वतातील राजा (२,२७८ मी.) हे कालीमांतानमधील सर्वात उंच शिखर आहे. मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशाशिवाय किनारपट्टीवर मैदानी व दलदलीचे भाग आढळतात. कालीमांतानच्या दक्षिण किनाऱ्यावर तर दलदलींचा सलग असा पट्टा आहे.

भूस्तरीय दृष्ट्या बोर्नियो बेट म्हणजे सूंदा सागरमंचामधील सर्वांत मोठा भूमीचा तुकडा आहे. किनाबालू पर्वताचे शंक्वाकृती शिखर स्फटिकामय असून ब्रूनाईच्या किनाऱ्यावर प्राथमिक स्वरूपाचे स्तरित खडक आढळतात. उद्रेकातून निर्माण झालेल्या अग्निजन्य खडकांच्या भोवती रेती, पांकेल व चुनखडक आढळतात. डच भूशास्त्रज्ञांनी याला ‘डॅनाऊ मालिका’ असे नाव दिलेले आहे.

ज्वालामुखीजन्य सुपीक जमिनीचा प्रदेश वगळता बेटावरील जमीन नापीक आहे. नद्यांच्या खोऱ्यांत कणाश्म, नीस, शीस्ट इ. स्फटिकमय खडकांची विपुलता आहे. तृतीयक व मध्यजीव कालखंडांत तयार झालेल्या या खडकांत मँगॅनीज, लोखंड, कथिल, पारा, बॉक्साइट, जिप्सम, तांबे, मोनाझाइट, अँटिमनी, सोने, हिरे, गंधक इत्यादींची खनिजे आणि दगडी कोळसा व खनिज तेल सापडते. परंतु वेगवेगळे कर, वाहतूक खर्च व स्पर्धा यांमुळे उत्पादन कमी आढळते. येथे सापडणाऱ्या हिऱ्यांमुळेच इंडोनेशियन लोक व बेटाला ‘कालीमांतान’ म्हणजे ‘हिऱ्यांची नदी’ असे म्हणतात. बोर्निओतील हिऱ्यांची पिवळसर छटा असून आफ्रिकेतील हिऱ्यांपेक्षा येथील हिरे कमी प्रतीचे आहेत.

द्या

कापूआस (लांबी १,१४० किमी.), राजांग (५६० कमी.), बारीतो, बाराम, माहाकाम, कायान या बेटावरील प्रमुख नद्या असून मध्यभागी असलेली मुख्य पर्वतराजी हे बहुतेक नद्यांच्या पाणलोटाचे क्षेत्र आहे. बऱ्याच नद्यांच्या पात्रांत द्रुतवाह व धबधबे असून नद्यांच्या मुखांशी स्थलांतर करणारे वाळूचे दांडे असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने त्या पूर्णपणे उपयोगी ठरत नाहीत. राजांग नदीचा २७० किमी. प्रवाह जलवाहतुकीस उपयोगी असून बऱ्याच नद्यांमधून सु. १६० किमी.पर्यंत जलवाहतूक चालू शकते.

हवामान

बोर्निओचे हवामान विषुववृत्तीय, उष्ण व दमट प्रकारचे आढळते. नोव्हेंबर ते एप्रिल यांदरम्यान येथे मान्सून (लँडास) ऋतू असतो व उरलेला काळा काहीसा कोरड्या उन्हाळ्याचा (टेडोह) असतो. बेटावरील तपमान २१ ते ३५ से. असून तपमानाची वार्षिक सरासरी २७ से. आहे. पर्जन्यमान सु. २५० ते ५३३ सेंमी. असून वार्षिक सरासरी पर्जन्य ३८० सेंमी. पडतो. बहुतेक पाऊस नोव्हेंबर ते एप्रिल या मोसमी वाऱ्यांच्या काळात पडतो.

अंतर्गत भागत उंचीनुसार पर्जन्यमान वाढत जाते.

वनस्पती व प्राणी

येथे उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षारण्ये (सेल्व्हाज) आढळतात. किनाऱ्यावरील दलदलींच्या प्रदेशात कच्छ वनश्री, तर कमी पावसाच्या प्रदेशात उंच गवत व झुडपे आढळतात. येथील जंगलांमध्ये कापूर, चंदन, साग, साल, शिसवी, ओक, चेस्टनट इत्यादी वृक्षप्रकार पहावयास मिळतात. जंगलांतून देवधूप, कापूर, खैर, वेत, कातडी कमावण्याची साल इ. उत्पादने मिळविली जातात. येथील रबर उत्पादनही महत्वाचे आहे.

जंगलांमध्ये सु. ५०० प्रकारचे पक्षी व सु. २०० प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळतात. सापांच्या १५० जाती असून त्यांपैकी २५ जाती विषारी आहेत. येथील जंगले म्हणजे हॉर्नबिल् पक्ष्यांचे माहेरघरच समजले जाते. ओरँगउटान, गिबन जातीची माकडे, हरिण, गेंडा, अस्वल, चित्ता, रानडुक्कर, हत्ती, रानमांजर, रानरेडे, वाघ इ. प्राण्यांचा जंगलांत संचार असतो. मोर, गरुड, पोपट व शोभिवंत फुलपाखरे जंगलांत सर्वत्र असतात. पाण्यात मगरी, सुसरी, कासवे सापडतात. तसेच ८० प्रकारचे मासे नद्यासमुद्रांतून आढळतात


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate