অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मॉरिशस

मॉरिशस

हिंदी महासागरातील द्वीपसमूहांचा बनलेला देश. यामध्ये मॉरिशस बेट, रोड्रीगेस बेट, आगालेगा बेटे, सेंट ब्रांडन द्वीपसमूह (कार्गाडोस कराजोस शोल्स) यांचा समावेश होतो. मॉरिशस हे यांतील सर्वांत मोठे व प्रमुख बेट असून त्यावरूनच देशाला मॉरिशस असे नाव पडले आहे. हे बेट मादगास्करच्या पूर्वेस ८०० किमी. तसेच आफ्रिकेच्या सर्वांत जवळच्या किनारी प्रदेशापासून २,००० किमी, अंतरावर आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९३% क्षेत्रफळ व एकूण लोकसंख्येपैकी ९७% लोकसंख्या एकट्या मॉरिशस बेटाची आहे.

अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १९° ५० ते २०° दक्षिण व ५७° ते ५७° ४८ पूर्व यांदरम्यान आहे. मॉरिशस बेटाच्या साधारण पूर्वेस ५६० किमी. अंतरावर रोड्रीगेस बेट व उत्तरेस ९६० किमी. वर दोन आगालेगा बेटे आहेत, तसेच सेंट ब्रांडन द्वीपसमूहसुद्धा मॉरिशसच्या उत्तरेसच आहे. देशाची लोकसंख्या ९,६९,१९१ होती (१९८३ अंदाज). एकूण क्षेत्रफळ २,०४० चौ. किमी. असून त्यापैकी मॉरिशस बेटाचे १,८६५ चौ. किमी., रोड्रीगेस बेटाचे १०४ चौ. किमी. व बाकीच्या बेटांचे ७१ चौ. किमी. आहे. मॉरिशस बेटाची दक्षिणोत्तर लांबी ६१ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ४७ किमी. असून किनाऱ्याची एकूण लांबी २१७ किमी. आहे.

मॉरिशसच्या ईशान्येस १,९०० किमी. अंतरावर असलेल्या द्येगो गार्सीआ बेटे या ब्रिटिशांच्या सागरपार प्रांतावर तसेच वायव्येस ५५० किमी. वरील फ्रेंचाच्या आधिपत्याखालील ट्रॉम्लँ बेटावर मॉरिशसने आपला हक्क सांगितला आहे. द्येगो गार्सीआवरील मॉरिशसने सांगितलेल्या या हक्काला जुलै १९८० मधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी’ (ओएयू) च्या शिखर परिषदेत मान्यता देण्यात आली. मॉरिशस बेटावरील पोर्ट लूई (लोकसंख्या १,४९,९००–१९८३ अंदाज) ही राजधानी आहे.

भूवर्णन

मॉरिशस हे प्रामुख्याने ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेले बेट असून सभोवताली प्रवाळशैलभित्तींची निर्मिती झालेली आहे. बेटाचा उत्तर भाग मैदानी व मध्यवर्ती भाग पठारी आहे.

मैदानी प्रदेशाकडून मध्यवर्ती पठारी भागाकडे ६७० मी. पर्यंत उंची वाढत गेलेली आढळते. या पठारी प्रदेशावर लहानलहान पर्वतरांगा व एकाकी टेकड्या असून ते मुख्यतः ज्वालामुखी क्रियेचे अवशेष आहेत. बेटाचा दक्षिण भाग पर्वतीय असून नैर्ऋत्य भागातील पिटोन द ला पेटीट रीव्हीएरे नवार हे देशातील सर्वोच्च (८२६ मी.) शिखर आहे.

रोड्रीगेस हेसुद्धा ज्वालामुखी बेटच आहे. सेंट ब्रांडन द्वीपसमूहात प्रवाळशैलभित्ती व शोलयुक्त लहानलहान द्वीपक आहेत. मॉरिशस बेटावर प्रमुख सहा मृदाप्रकार आढळतात. त्यांपैकी बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा अधिक सुपीक व शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

मॉरिशस बेटावरून अनेक लहानलहान नदीप्रवाह खोल दऱ्यांतून वाहताना आढळतात. त्यांपैकी ग्रँड रिव्हर साउथ ईस्ट ही सर्वांत लांब (३९ किमी.) नदी आहे.

पावसाळ्यात हे प्रवाह तुडुंब भरून वाहतात. पठारी भागात ग्रँड बासींन व मारे ऑक्स व्हाकोआस ही दोन उल्लेखनीय सरोवरे आहेत. त्यांपैकी मारे ऑक्स व्हाकोआस हे पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने विशेष उपयुक्त आहे. याशिवाय इतर चार मोठ्या जलाशयांचा जलसिंचनासाठी उपयोग केला जातो.

हवामान

मॉरिशसचे हवामान समशीतोष्ण कटिबंधीय सागरी आणि आर्द्र प्रकारचे आहे. समुद्रसपाटीवर तापमान १८° ते ३०° से. यांदरम्यान, तर अंतर्गत भागातील ४६० मी. उंचीवर ते १३° ते २६° से. च्या दरम्यान असते. नोव्हेंबर ते एप्रिल उन्हाळा, तर मे ते ऑक्टोबर हिवाळा ऋतू असतो.

उन्हाळ्यातील सरासरी तापमान २४° से. व हिवाळ्यातील सरासरी तापमान २०° से. असते. आग्नेय व्यापारी वाऱ्यांच्या टापूत हा देश येतो. उन्हाळ्यात वाहणारे आग्नेय व्यापारी वारे बेटाच्या मध्यवर्ती पठारी प्रदेशावर व त्याच्या वातसन्मुख उतारावर भरपूर पाऊस देतात. वार्षिक सरासरी पर्जन्यमान पश्चिम किनाऱ्यावर ९० सेंमी., आग्नेय किनाऱ्यावर १५० सेंमी., तर मध्यवर्ती पठारी भागात ते ५०० सेंमी. आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या काळात दररोज पावसाच्या सरी कोसळतात. उन्हाळ्यात येथे अधूनमधून उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे निर्माण होऊन त्यांपासूनही मॉरिशस बेटावर पर्जन्यवृष्टी होते.

वनस्पती व प्राणी

देशात सु. ६०० वनस्पती प्रकार आढळतात. पूर्वी येथे घनदाट वर्षारण्ये होती. जास्त उंचीचे प्रदेश शेवाळयुक्त अरण्यांनी व किनारी प्रदेश ताडाच्या वनांनी आच्छादलेले होते.

तथापि पूर्वीचे फारच थोडे वनस्पती प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. वनसंवर्धनाच्या दृष्टीने १७७० मध्ये पांप्लमूस येथे एका वनस्पती उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या बेटांवर आढळणाऱ्या वनस्पतींची लागवड अलीकडे येथे स्थायिक झालेल्या लोकांनी केलेली आहे.

पूर्वी आढळणारे बरेचसे प्राणी आता नामशेष झाले असल्याचे दिसते. यूरोपीय वसाहतकऱ्यांनी आपल्याबरोबर कुत्रा, मांजर, उंदीर, माकड, रानडुक्कर, सांबर, हरिण, मुंगूस हे प्राणी येथे आणले. १८६५ च्या दरम्यान डासांबरोबर तेथे मलेरियाचे आगमन होऊन त्याचा प्रभाव साधारण शतकभर टिकला.

डोडो हा पक्षी मूळ ठिकाणचा असला, तरी तो आता येथून जवळजवळ नामशेष झालेला आढळतो. बोलिरिआ मल्टीकॉरिनॅट व कासारीआ डुसुमेरी जातींचे बोआ सर्प ह्या येथील सापाच्या मुख्य जाती आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था

दीर्घ काळापर्यंत मनुष्यवस्ती नसलेले हे बेट प्रथम अरब, स्वाहिली व मलायी खलाशांनी आणि त्यानंतर पोर्तुगीज व इतर यूरोपीय खलाशांनी पाहिलेले होते. अरब किंवा स्वाहिली यांना दहाव्या शतकापासून किंवा त्यापूर्वीपासूनही हे बेट माहीत होते. १५१० च्या सुमारास पोर्तुगीजांनी या बेटाला भेट दिली होती.

तथापि १५९८ मध्ये ॲडमिरल व्यीब्रांट व्हान वॉरविज्क याच्या नेतृत्वाखाली डच लोक या बेटावर येईपर्यंत कुणाचेच या बेटाशी विशेष संबंध प्रस्थापित झाले नव्हते. तोपर्यंत तेथे मनुष्यवस्तीही नव्हती.

नॅसॉचा राज्यप्रमुख प्रिन्स मॉरिस याच्या नावावरून डचांनी या बेटाला मॉरिशस हे नाव दिले. डचांनी १६३८ ते १६५८ व १६६४ ते १७१० या काळात या बेटावर वसाहती स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर मात्र त्यांनी आपले प्रयत्न सोडून दिले व काही काळ हे चाचेगिरीचे केंद्र बनले. १७१५ मध्ये फ्रेंचांनी हे आपल्या आधिपत्याखाली आणून १७२१ मध्ये त्यांनी रियून्योंवरून वसाहतकऱ्यांना या बेटावर वसाहतीसाठी पाठविले. तसेच त्यांनी या बेटाला ‘एल् दे फ्रान्स’ असे नाव दिले.

१७२१ ते १७६७ पर्यंत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने या बेटाचा राज्यकारभार पाहिला. या काळात येथील वसाहतीचा विकास अगदी मंदगतीने होत होता.

दरम्यान पोर्ट लूईची स्थापना केली व भारतातील ब्रिटिशांवर हल्ला करण्याचा तळ म्हणून त्याचा वापर केला. तथापि १७५६ ते १७६३ या सात वर्षांच्या युद्धकाळात ब्रिटिशांविरुद्ध कारवाई करण्यासाठी या तळाचा वापर करण्याचे फ्रेंचांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

१७६७ मध्ये फ्रेंच शासनाने या बेटाचा राज्यकारभार हाती घेतला. फ्रेंच राज्यक्रांतीचा काही काळ वगळता फ्रेंच शासनाने ४३ वर्षांपर्यंत येथील कारभार पाहिला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate