অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

याप बेटे

याप बेटे

याप बेटावरील लोकविलक्षण दगडी चलनयाप बेटे : पश्चिम पॅसिफिक महासागरातील कॅरोलाइन बेटांपैकी पश्चिमेकडील द्वीपसमूह. अ. सं. सं. च्या मायक्रोनीशिया या विश्वस्त प्रदेशातील ही बेटे (क्षेत्रफळ १०० चौ. किमी.) ९०३०’ उ. अक्षांश व १३८० ८’ पू. रेखांशावर आहेत.

या द्वीपसमूहात याप (रूल), टोमील, मॅप व रुमुंग या प्रमुख चार व इतर लहानलहान १० बेटांचा समावेश होतो. त्यांतील याप हे सर्वांत मोठे (१६ किमी. लांब व ५ किमी. रुंद) बेट असून (लोकसंख्या ८,१७२; १९८०) हा द्वीपसमूह २६ किमी. लांबीच्या प्रवाळमालिकेने वेढलेला आहे. कोलोन्या (याप टाउन) हे येथील प्रमुख व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे.

भूवैज्ञानिक दृष्ट्या इतर कॅरोलाइन बेटांपेक्षा वेगळी असलेली ही बेटे रूपांतरित खडकांपासून बनलेली आहेत. याप हे प्रमुख बेट मूळचे ज्वालामुखीजन्य असून त्याच्या मध्यभागी टेकड्यांची रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे.

रांगेतील टाबिवोल हे या बेटांवरील सर्वोच्च (१८७ मी.) शिखर असून हा प्रदेश घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. द्वीपसमूहावरील मासिक सरासरी तापमान २८° से. असून येथे वार्षिक सरासरी ३१० सेंमी. पाऊस पडतो. जून ते डिसेंबर या काळात उष्णप्रदेशीय वादळी वारे वाहतात.

पोर्तुगीजांनी १५२६ मध्ये या बेटांचा प्रथम शोध लावला, त्यानंतर १६८६ मध्ये ही बेटे स्पॅनिशांनी ताब्यात घेतली. १८९९ मध्ये इतर कॅरोलाइन बेटांबरोबरच ही बेटेही जर्मनांना विकण्यात आली.

दरम्यानच्या काळात अमेरिकन व्यापारी डेव्हिड ओकीफ याने येथे प्रचलित असलेल्या दगडांच्या नाण्यांच्या मोबदल्यात खोबऱ्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू केला. जर्मनांनी या बेटांचे प्रशासनाच्या सोयीसाठी १० भाग पाडले. त्यांनी येथे पाण्याखालून केबली संदेशवहनाची यंत्रणा उभारून पॅसिफिक महासागरावरील संदेशवहनाचे हे एक प्रमुख केंद्र बनविले.

१९१४ मध्ये ही बेटे जपानच्या ताब्यात गेली. केबली सागरी संदेशवहन यंत्रणेमुळे या काळात या बेटांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले होते. १९१९ मध्ये राष्ट्रसंघाने या व इतर काही बेटांवरील जपानची सत्ता मान्य केली. याच काळात अमेरिका व जपान यांच्यातील संघर्षाला केबली संदेशवहनाच्या हक्कांचे प्रमुख कारण झाले; परंतु १९२१ मध्ये वॉशिंग्टन परिषदेत हा वाद मिटविण्यात आला.

दुसऱ्या महायुद्धकाळात येथे जपानचे हवाई व नाविक तळ होते. या युद्धात जपानचा पराभव करून अमेरिकेने ही बेटे आपल्या ताब्यात घेतली (१९४५). बेटावरील कोलोन्वा हे उत्तम व्यापारी बंदर व केबली संदेशवहन केंद्र म्हणून प्रसिद्ध असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

येथील मूळचे लोक मेलानीशियनांशी मिळतेजुळते असून, त्यांची स्थानिक भाषाही मेलानीशियन भाषेशी निगडित आहे. यापी लोक विनिमयाचे साधन म्हणून दगडांची नाणी वापरतात. या बेटाच्या नैर्ऋत्येस सु. ३६० किमी. वरील पालाऊ बेटावरील एका विशिष्ट कॅल्साइट प्रकारच्या दगडापासून ही नाणी बनविली जातात.

दगडाच्या लाद्या कापून त्याला मध्यभागी मोठे वेज पाडण्यात येते. साधारणपणे ३० सेंमी. व्यासाच्या गोल चपट्या व सपाट दगडाची किंमत एका चांदीच्या डॉलरएवढी, तर ३.६५ मी. व्यासाच्या दगडाची किंमत १,००० डॉलर इतकी मानली जाते. अलीकडच्या काळात मात्र अमेरिकी डॉलरचा वापर सुरू झाला आहे.

नारळ हे येथील प्रमुख उत्पादन असून येथून सुक्या खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. याशिवाय केळी, पॉलिनीशियन चेस्टनट, आर्वी, सुरण, रताळी, मिरी, लवंगा,तंबाखू यांचेही उत्पादन होते. गुरे व कुक्कुटपालन, मासेमारी हे व्यवसाय केले जातात. बेटांवर अगदी थोड्या प्रमाणात बॉक्साइट व फॉस्फेट यांचे साठे आहेत.

 

क्षीरसागर, सुधा; चौंडे, मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate