অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सहारा

सहारा

जगातील सर्वांत मोठे उष्ण कटिबंधीय वाळवंट. अरबी भाषेतील ‘ सहारा ’ म्हणजे ‘ वाळवंट ’ यावरून या प्रदेशाला हे नाव पडले आहे. उत्तर गोलार्धातील या वाळवंटाने उत्तर आफिकेचा विस्तृत प्रदेश व्यापलेला आहे.पश्र्चिमेस अटलांटिक महासागरापासून पूर्वेस तांबडया समुद्रापर्यंत, तसेच उत्तरेस अ‍ॅटलास पर्वत व भूमध्य समुद्रापासून दक्षिणेस सॅव्हाना किंवा सूदान प्रदेशापर्यंत याचा विस्तार असून तो पूर्व-पश्र्चिम ५,६३० किमी. तर उत्तर-दक्षिण १,९३० किमी.पेक्षा अधिक आहे. क्षेत्रफळ सु. ७७,००,००० चौ. किमी.

सांप्रत दक्षिणेस १५°’ उ. अक्षवृत्तापर्यंत सहाराचा विस्तार असून तो दक्षिणेस हळूहळू वाढत असल्याचे आढळून आले आहे. मोरोक्को, अल्जीरिया,टयुनिशिया, लिबिया, ईजिप्त, मॉरिटेनिया, माली, नायजर, चॅड व सूदान इत्यादी देशांत सहाराचा विस्तार झालेला आहे. सहाराला वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. नाईल नदी व तांबडा समुद्र यांदरम्यानचे पूर्व वाळवंट व न्यूबियन वाळवंट तर ईजिप्त-लिबिया यांच्या सरहद्द प्रदेशातील लिबियन वाळवंट म्हणून ओळखले जाते.

भूरचना

विस्तृत वालुकामय प्रदेश, पर्वतीय प्रदेश, विस्तीर्ण खडकाळ पठारे व मैदाने, रेतीयुक्त मैदाने व वालुकागिरी, उथळ व हंगामी जलमय द्रोणी, खोलगट भागातील विस्तृत द्रोणी प्रदेश ही सहारातील प्रमुख भूरूपे आहेत. नाईलच्या खोऱ्यातील कृषिक्षेत्र व मरूदयानांमुळे हे ओसाड वाळवंट खंडित झालेले आहे.

दक्षिण भागात उत्तरेकडील सहारा वाळवंट व दक्षिणेकडील आर्द्र सॅव्हाना प्रदेश यांदरम्यानचा साहेल हा संकमणात्मक प्रदेश आहे. संपूर्ण सहाराचा विचार केला तर बहुतांश भाग कमी उंचीचा पठारी असून मध्यवर्ती भाग पर्वतीय व उंचवटयाचा आहे. सहारा प्रदेशाची सरासरी उंची ३०० ते ४०० मी. दरम्यान आहे. मध्य सहारात अहॅग्गर व तिबेस्ती हे प्रमुख पर्वतीय प्रदेश असून त्यांची निर्मिती ज्वालामुखी क्रियेतून झालेली आहे.

ह्या ओसाड ओबडधोबड पर्वतीय प्रदेशांचे वारा व पाणी यांमुळे बरेच खनन झालेले आहे. यातील काही शिखरांची उंची सस.पासून ३,००० ते ३,५०० मी.पर्यंत आढळते. अहॅग्गर पर्वत अल्जीरियाच्या दक्षिण भागात असून त्यातील तहात शिखराची उंची २,९१८ मी. आहे. अहॅग्गरच्या दक्षिणेस असलेले एअर व आद्रार दे झीफोरा हे पर्वतीय भाग म्हणजे अहॅग्गरचेच विस्तारित भाग आहेत. एअर पर्वताची उंची एकदम कमी होत जाऊन तो तेनेरे या सपाट व वालुकामय मैदानात विलीन होतो. अहॅग्गरच्या ईशान्येस असलेला उंचवटयांचा प्रदेश तासिली-एन-अज्जेर नावाने ओळखला जातो. चॅडच्या उत्तर भागात असलेल्या तिबेस्ती पर्वतात उंच शिखरे आहेत. त्यांतील मौंट एमीकूसी ( उंची ३,४१५ मी.) हे सहारातील सर्वोच्च शिखर आहे.

दक्षिण मोरोक्को ते ईजिप्त यांदरम्यानच्या उत्तर सहारा प्रदेशात स्थलांतरित वालुकागिरी ( अर्ग ), रेतियुक्त मैदाने ( रेग ) व वाऱ्याच्या झीज कार्यामुळे उघडया पडलेल्या तलशिलांचा प्रदेश ( हामाडा ) आढळतो. अर्ग हा सहारामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळणारा भूविशेष आहे. सहाराच्या एकूण क्षेत्रफळाच्या एक दशांशपेक्षा अधिक क्षेत्र अर्गने व्यापले आहे. काही ठिकाणी अर्गची उंची १८० मी.पर्यंत आढळते. केशाकर्षण व बाष्पीभवन क्रियेमुळे भूपृष्ठावर क्षार जमा होतात.

वारा व रेती यांच्या घर्षण कार्यामुळे या क्षारयुक्त भागावर गिलावा केल्यासारखे वाळटी वंकिंवा खडकाळ मैदान दिसते त्याला ‘ रेग ’ म्हणतात. वाऱ्यामुळे यातील वाळू व बारीक घटक वाहून गेलेले असतात. रेगने सहाराचे बरेच क्षेत्र व्यापले आहे. दक्षिण सहाराचा प्रदेश कमी उंचीच्या पठारांनी व विस्तृत मैदानांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात अतिशय तुरळक प्रमाणात खजुराचे वृक्ष आढळतात.

श्र्चिम सहारा सखल, मंद उताराचा, वालुकागिरी व रेतीयुक्त मैदानांचा असून अधूनमधून त्यात कमी उंचीचे हामाडा व टेकडया आढळतात. तानेझ्रूफ्त हा त्यातील सर्वांत विस्तृत व भूरूपविरहित प्रदेश असून तो सहारातील सर्वांत निर्जन व ओसाड भागांपैकी एक आहे. एल् जाऊफ, अर्ग शेष व अर्ग ईगिडी ही पश्र्चिम भागातील वाळवंटे आहेत.

पश्र्चिम सहारातील फारच थोडा भाग सस.पासून ३०० मी.पेक्षा अधिक उंचीचा आहे. अगदी पश्र्चिमेचा भाग तर १५० मी.पेक्षाही कमी उंचीचा आहे. उत्तर सहारामध्ये ग्रेट ईस्टर्न व ग्रेट वेस्टर्न अर्ग हे अतिशय ओसाड वालुकामय भाग आहेत. पूर्व सहाराचा बहुतांश भाग लिबिया वाळवंटाने (१३,००,००० चौ. किमी.) व्यापलेला आहे. त्यात वालुकागिरी व उघडे पडलेले खडक ही भूरूपे आढळतात. अगदी ईशान्य भागात ईजिप्तमध्ये  ‘ क्वॉटारा डिप्रेशन ’ हा सस.पासून १३३ मी. खोलीचा प्रदेश आहे. आफ्रिका खंडातील हा दुसरा सर्वाधिक खोलीचा भाग आहे.

नाईल व नायजर वगळता सहारातून वाहणाऱ्या अन्य मोठया व कायमस्वरूपी नदया नाहीत. अ‍ॅटलास पर्वताच्या पूर्व पायथ्याजवळ सस.पेक्षाही खोल असलेल्या द्रोणींमध्ये अधूनमधून वाहणारी खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत, त्यांना ‘ शॉट ’ म्हणतात. अ‍ॅटलास पर्वताकडून सहारा प्रदेशाकडे वाहत येणाऱ्या खंडित प्रवाह भागात आर्टेशियन विहिरी व झृयांच्या प्रदेशात मरूदयाने आढळतात. विहिरी किंवा झरे हे या प्रदेशातील पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. मोठया पावसानंतर अल्पकाळ वाहणाऱ्या येथील नदयांना ‘ वाडी ’ म्हणतात. त्यांच्या संख्या पुष्कळ आहे.

हवामान

सहाराचे हवामान उष्ण व कोरडे असते. अती शुष्कता हे येथील हवामानाचे वैशिष्टय आहे. जगातील सर्वांत उष्ण प्रदेशांमध्ये सहाराचा समावेश होतो. सांप्रत सहारा वाळवंट दोन प्रकारच्या हवामानांच्या विभागांत मोडते. उत्तरेकडे उपोष्ण कटिबंधीय शुष्क वाळवंटी प्रदेश आहे. दक्षिण सहारात स्थिर, खंडीय उपोष्ण कटिबंधीय वायुराशी व अस्थिर, दक्षिणी उष्ण कटिबंधीय सागरी वायुराशी यांच्यातील आंतरक्रियांमुळे उष्ण कटिबंधीय कोरडे हवामान निर्माण झाले आहे.

कोरडी हवा व मेघाच्छादनाचा अभाव यांमुळे सूर्यास्तानंतर लगेचच तापमानात एकदम घट होते. त्यामुळे दैनिक तापमानकक्षा नेहमीच सु. २८° से. असते. उन्हाळ्यात सरासरी तापमान सतत ३८° से.पेक्षा अधिक राहते. जगातील सर्वाधिक म्हणजे ५८° से. इतक्या अधिकृत तापमानाची नोंद सप्टेंबर १९२२ मध्ये लिबियातील अल् अझीझीयाह येथे झाली आहे. उत्तर सहारापेक्षा दक्षिण सहारात तापमानकक्षा कमी असते.

हिवाळ्यात सरासरी तापमान १०° ते १६° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते. सहारातील केवळ काही पर्वतीय प्रदेश वगळता कोठेही वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३ सेंमी.पेक्षा अधिक असत नाही.

उत्तर सहारात बहुतांश वृष्टी हिवाळ्यात होते. मध्य सहाराचे वार्षिक सरासरी वृष्टिमान २.५ सेंमी. असून बाहेरच्या बाजूस हे प्रमाण १२.५ सेंमी.पेक्षा अधिक वाढलेले आढळते. पूर्वेकडील व पश्र्चिमेकडील विस्तृत प्रदेशात वर्षाला केवळ २ ते ५ सेंमी. पाऊस पडतो. काही प्रदेशात तर कित्येक वर्षांपासून पाऊसच पडलेला नसतो. मात्र कधीतरी येणाऱ्या एखादया मुसळधार पावसात १३ सेंमी.पेक्षा अधिक पाऊस पडून जातो. पर्वताचे माथे कधीकधी हिमाच्छादित बनतात. उत्तर सहारात वसंत ऋतूत उष्ण, धूळयुक्त दक्षिणी वारे वाहतात तर दक्षिण सहारात हिवाळ्यात धूळयुक्त ईशान्य वारे वाहतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate