অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागपूर जिल्हा

नागपूर जिल्हा

इतिहास

महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेले नागपूर हे अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले आणि मुंबई व पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 421 इतकी होती. नागपूर शहराचा भौगोलिक भूभाग देशाच्या नागरी प्रदेशातील 13 वा मोठा भूभाग आहे. अलीकडेच भारतातील सर्वात  स्वच्छ शहर म्हणून आणि दुसरे हरित शहर म्हणून नागपूरला मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने महाराष्ट्राच्या विदर्भातील व्यावसायिक आणि राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र अशीही नागपूरची ओळख आहे. विदर्भात विशेषत: नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने या शहरातून देशभरात संत्र्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो. यामुळेच संपूर्ण देशात नागपूरची ओळख संत्रा नगरी अशीही आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असल्याने तसेच दलित बौद्ध चळवळीचेही नागपूर हेच महत्त्वाचे केंद्र असल्याने राजकीयदृष्ट्यादेखील या शहराचे विशेष महत्त्व आहे.

या शहराची स्थापना गोंड राजाने केली असली, तरी भोसलेंच्या राज्यकाळात ते मराठा साम्राज्याचा भाग बनले. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 19 व्या शतकात या शहराची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारची राजधानी म्हणून नागपूरची घोषणा करण्यात आली. पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते. पुण्यानंतर महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राकरिता महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्येही नागपूरचे नाव प्राधान्याने घेतले जाते. झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.

कन्हान नदीची उपनदी असलेली नागनदी नागासारखीच वाहात असल्याने आधी या शहराचे नाग असे नाव पडले आणि या नाग नदीमुळेच नागपूर असे नाव ठेवण्यात आले. काहींच्या मते, जुन्या नागपूरमधून नागनदी वाहात असल्याने या शहराचे नाव नाग नदीवरून ठेवण्यात आले आहे आणि देशातील विविध शहरे, तालुका आणि गावांच्या नावापुढे ज्या प्रकारे पूर हे विशेषण देण्यात आले आहे, त्याचप्रकारे नाग या नावापुढे पूर असे नाव देण्यात आले. याच अनुषंगाने नागपूर महानगर पालिकेच्या सिम्बॉलवर नाग दाखविण्यात आला आहे.

या शहरात तीन हजार वर्षांआधीपासून अर्थातच इ.सनपूर्व आठव्या शतकापासून मानवी अस्तित्व असल्याचे पुरावे सापडू शकतात. दृगधामणा (म्हाडा कॉलनीजवळ) येथे असलेल्या मेहीर समाधीमुळे नागपूरच्या परिसरात स्मारकांची (मेगालिथीक) संस्कृती अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात. नागपूर शहराचा पहिला संदर्भ दहाव्या शतकात शेजारील वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आढळून आलेल्या ताम्रपटावर उल्लेखित आहे. 862 मध्ये राष्ट्रकुटचे राजे कृष्णा (तृतीय) यांच्या काळात नागपूर आणि नंदीवर्धनाच्या विसाया जिल्ह्यात असलेल्या गावात हा उल्लेख अजूनही आहे. तिसर्या शतकाच्या अखेरीस राजे वाकाटाका घराण्याचे राजे विद्याशक्ती यांनी नागपूरवर राज्य केले असल्याचे म्हटले जाते.

चोथ्या शतकात वाकाटाका साम्राज्याचे नागपूर प्रांत आणि आसपासच्या परिसरावर राज्य होते. त्यांचे गुप्ता साम्राज्यासोबत चांगले संबंध होते. वाकाटाका साम्राच्याचे राजे पृथ्वीसेन (प्रथम) नागपूरपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन (प्राचिन नाव नंदीवर्धना) असे नाव असलेल्या आपल्या राजधानीकडे वळले. वाकाटाका साम्राज्यानंतर हा प्रांत बदामीचे चालुक्य,राष्ट्रकुट यांच्या अधिकारात आले आणि त्यानंतर या प्रांतावर यादवांचे साम्राज्य आले. इ.सनपूर्व 1296 मध्ये अलाउद्दिन खिल्जीने यादव साम्राज्यावर आक्रमण केले आणि देवगिरीवर ताबा मिळविला. यानंतर 1317 मध्ये तुघलक साम्राज्य सत्तेत आले. सतराव्या शतकात मुघलांनी या प्रांतावर आपले राज्य प्रस्थापित केले. तथापि, प्रांतीय प्रशासनाची सूत्रे मध्यप्रदेशच्या छिदवाडा जिल्ह्यातील देवगड नागपूरच्या गोंड राजांकडेच होती.

देवगड नागपूर साम्राज्याचे राजकुमार बख्त बुलंद यांनी नागपूरची स्थापना केली असल्याचे ताजा इतिहास सांगतो. त्यानंतरचा देवगडचा राजा चांद सुल्तान होता. त्याने नागपूरला आपली राजधानी निश्चित केले हकेली आणि या शहराला त्याने वॉल सिटी बनविले होते. 1739 मध्ये चांद सुल्तानचे निधन झाल्यानंतर चांद सुल्तानचा अनौरस पुत्र वाली शाह हा राजा झाला आणि चांद सुल्तानची विधवा पत्नी आपली दोन मुलेे अकबर शाह आणि बुरहान शाह यांचे हित जोपासण्यासाठी बेरारचे मराठा नेते रघुजी भोसले यांना जाऊन मिळाली. 1743 नंतर मराठा राज्यकर्ते सत्तेवर येऊ लागले. रघुजी भोसले यांच्यापासून ही सुरुवात झाली. देवगड, चांदा आणि छत्तीसगड या प्रांतांवर त्यांनी 1751 पर्यंत राज्य केले.

1803 मध्ये राघोजी (द्वितीय) दुसर्या अँग्लो —मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, या युद्धात ब्रिटीशांचा विजय झाला. 1816 मध्ये राघोजी (द्वितीय) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा पारसाजी याला मुधोजी (द्वितीय) याने हद्दपार केले आणि त्याची हत्या केली. 1817 मधील मुधोजी तिस-या आन्गलो — मराठा युद्धाच्या काळाच्या काळात मुधोजी इंग्रजांविरोधात पेशव्यांना जाऊन मिळाले. पण, सध्या नागपूर शहरात असलेल्या सीताबर्डी येथील युद्धात त्यांचा पराभव झाला.

हे युद्ध भोसल्यांच्या साम्राज्यासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरले. या युद्धानंतर भोसल्यांच्या साम्राज्याला घरघर लागली आणि ब्रिटीशांनी नागपूर शहर काबिज केले. तात्पुरत्या ताजपोशीनंतर मुधोजींना हद्दपार करण्यात आले आणि ब्रिटीशांनी राघोजी (द्वितीय)चे नातू राघोजी (तृतीय) यांच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला. 1840 पर्यंत त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्तेच्या काळात या प्रांताची प्रशासकीय सूत्रे इंग्रज रेसिडेंटच्या हातात होती. राघोजी (तृतीय) यांच्या निधनानंतर 1853 मध्ये ब्रिटिशांनी नागपूरची सूत्रे आपल्या हातात घेतली.

1853 ते 1861 या काळात नागपूर, छिदवडा आणि छत्तीसगडचा समावेश असलेला नागपूर प्रांत सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरारचा भाग बनले आणि ब्रिटीश केंद्रीय सरकारमध्ये हे शहर आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणात आणण्यात आले. नागपूरला या प्रांताची राजधानी करण्यात आले. 1903 मध्ये यात बेरारचा समावेश करण्यात आला. टाटा समुहाने 1 जानेवारी 1877 मध्ये देशातील पहिली टेक्सटाईल मिल नागपूर येथे सुरू केली. सेंट्रल इंडिया स्पिनींग अॅण्ड विविंग कंपनी लिमिटेड असे या कंपनीचे नाव होते.

1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळ सुरू करण्यात आली. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेंट्रल प्रोव्हिअन्स अॅण्ड बेरार भारताचा प्रांत बनले आणि 1950 मध्ये मध्यप्रदेश या नावासह भारताचे राज्य झाले. पुन्हा एकदा या राज्याची राजधानी नागपूरलाच करण्यात आले. तथापि, 1956 मध्ये भाषिक आधारावर भारतातील राज्यांचे पुनर्गठन करण्यात आले आणि नागपूर व बेरार प्रांत बॉम्बे राज्याकडे सोपविण्यात आले. 1960 मध्ये बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.

14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आयोजित औपचारिक जाहीर मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसमवेत बोद्ध धम्म स्वीकारला आणि दलित— बोद्ध चळवळ सुरू केली. ही चळवळ आजही सक्रिय आहे. आगामी काळातही विकास आणि भरभराटीची क्षमता नागपूर शहरात आहे. नागपूरच्या प्रगती, विकास आणि भरभराटीत योगदान देणे महाराष्ट्र आणि भारत सरकारसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. 2002 मध्येच नागपूर शहराने आपल्या स्थापनेची 300 वर्षे पूर्ण केली आहेत. हा 300 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये अनेक कार्यक्रम आयोेजित करण्यात आले होते.

भूगोल

नागपूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग छीदवाडा आणि मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्याने व्यापलेला आहे आणि पूर्वेला भंडारा जिल्हा आहे. दक्षिण आणि पश्चिमेकडे अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा आहे. तर, वायव्येचा काही भाग अमरावती जिल्ह्याने व्यापलेला आहे. नागपूर जिल्ह्यात नैसर्गिक आणि मावननिर्मित तलाव आहेत. यात अंबाझरी तलाव हा सर्वात मोठा आहे. अन्य नैसर्गिक तलावांमध्ये गोरेवाडा आणि तेलंगखेडी तलावाचा समावेश आहे. सोनेगाव आणि गांधीसागर हे तलाव मनुष्यनिर्मित असून, शहरातील ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी त्यांची निर्मिती केली आहे. नाग नदी, पिली नदी आणि काही नाले हे शहराकरिता सांडपाणी वाहून नेणारे नैसर्गिक मार्ग आहेत. हिरवेगार शहर म्हणून नागपूरची ओळख आहे.

छत्तीसगडनंतर भारतातील दुसरे सर्वाधिक हिरवेगार आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूरला मान्यता देण्यात आली आहे. नागपूर शहर हे नैसर्गिक संसाधनांनंी समृद्ध आहे. कृषी क्षेत्रासोबतच सोयाबिन, जवार आणि खनीज संपत्तीचे विपूल साठे या जिल्ह्यात आहेत. सागवन आणि गवताचे सर्वात मोठे उत्पादन नागपूर जिल्ह्यात होत असते. याशिवाय, मँगनिजचे मोठे साठेही या जिल्ह्यात आहेत.

हवामान

बंगालचा उपसागर आणि अरेबिअन समुद्रापासून दूर असलेल्या भारतीय द्विपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराचे हवामान आर्द्र आणि कोरडे आहे. या शहरात वर्षातील बहुतांश काळ कोरडेच हवामान असते. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात नागपुरात 1205 मिमी इतका पाऊस पडत असतो. 14 जुलै 1994 रोजी या शहरात एकाच दिवशी 304 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. मार्च ते जून या उन्हाळ्याच्या काळात उनही तितकेच तापत असते. मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते. नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ हिवाळ्याचा असतो. हिवाळ्यात 10 अंशपर्यंत तापमान खाली येत असते. 29 मे 2012 रोजी या शहरात 48.6 अंश सेल्सिअस इतक्या महत्तम तापमानाची आणि 1937 मध्ये 3.9 अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.

नागपूर जिल्ह्यात सरासरी 1064.1 मिमी इतका सरासरी पाऊस पडत असतो. उमरेड, कुही आणि भिवापूर तहसिलीत सर्वाधिक पाऊस होतो, तर जिल्ह्यातील अन्य तहसिलींच्या तुलनेत काटोल आणि नरखेड तहसिलींमध्ये कमी पाऊस होतो.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://nagpur.nic.in/

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate