অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-एक)

महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

औरंगाबाद

वेरुळ लेणी

वेरुळ येथे प्राचीन काळात कोरलेली 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन अशी एकूण 34 लेणी आहेत. ही लेणी साधारणत: इ.स.च्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी या ठिकाणी एकत्र पहावयास मिळतात. वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर हे वेरुळ लेण्यांपासून जवळच असून हे एक प्राचीन शंकर मंदिर आहे.

कसे पोहोचाल ?

औरंगाबाद येथे रेल्वेने अथवा बसने पोहोचता येते. शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ येथे जाण्यासाठी महामंडळाच्या आणि खासगी बसेस उपलब्ध असतात.

अजिंठा लेणी

जगविख्यात बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी ही जगामध्ये भारताला आंतरराष्ट्रीय पर्यटनाची ठळक ओळख करून देणारी महत्त्वपूर्ण लेणी शिल्प. वाघूर नदीच्या परिसराशेजारी असलेल्या अजिंठा लेणीसमूहामध्ये एकूण 29 लेणी आहेत. ही लेणी नदी पात्रापासून 15-30 मीटर (40-100 फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामध्ये कोरलेल्या आहेत. अजिंठा लेण्यात तथागत गौतम बुद्ध यांच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणारी शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो. अशीही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरलेले आहे. चित्रशिल्पकलेचा नितांत सुंदर अनुभव देणाऱ्या या लेण्यांमधून त्या काळी वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयास मिळतात.

कसे पोहोचाल?

औरंगाबाद येथे रेल्वेने अथवा बसने पोहोचता येते. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यापासून 100 ते 110 कि.मी. अंतरावर आहे. अजिंठा येथे जाण्यासाठी महामंडळाच्या आणि खासगी बसेस उपलब्ध असतात.

जालना

श्री क्षेत्र राजूर


जालना जिल्ह्यातील राजुर (गणपती) हे अत्यंत जागृत गणपतीचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात मोरगाव, चिंचवड व राजूर ही श्रीगणेशाची तीन पूर्णपीठे आहेत. राजूर या गावाची नोंद अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आहे.

कसे पोहोचाल?

जिल्हा मुख्यालयापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

तीर्थक्षेत्र जांबसमर्थ

समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांबसमर्थ. हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आहे. दरवर्षी जांबसमर्थ येथे रामनवमीला भव्य यात्रा भरते.

कसे पोहोचाल?

जांब समर्थ हे ठिकाण जालना शहरापासून 80 किमी एवढ्या अंतरावर आहे. जालना येथून बसची सुविधा आहे. जवळचे रेल्वेस्थानक जालना तर विमानतळ औरंगाबाद हे आहे.

बीड

वैजनाथ (ज्योतिर्लिंग) मंदिर


‘जवा आगळं काशी’ म्हणजे काशीपेक्षाही जवभर श्रेष्ठ अशी ख्याती असलेले ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ. परळी येथील वैजनाथाचे (ज्योतिर्लिंग) मंदिर भारतातील स्वयंभू बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते परळी शहरात आहे.

कसे पोहोचाल

नांदेड - पुणे रेल्वेमार्गावर परळी हे ठिकाण आहे. येथे बसने व रेल्वेने जाता येईल. जवळचे रेल्वेस्टेशन परळी आहे. परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर येथूनही परळीसाठी बसने जाता येईल.

नायगाव अभयारण्य

पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे मयूर अभयारण्य आहे. या अभयारण्यामध्ये मोरांचे थवे पाहावयास मिळतात. मोरांबरोबरच तरस, लांडगे, खोकड, रानमांजर, निलगायी, हरीण, काळवीट इ. प्राणीही नजरेस पडतात. या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला लागून असलेल्या गावकऱ्यांची आणि मोरांची झालेली मैत्री.
उन्हाळ्यात मोरांची तहान भागवण्याचे आणि त्यांची भूक भागवण्याचे काम गावकरी मोठ्या उत्साहाने करतात.

कसे पोहोचाल?

नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे असून बीड पासून या अभयारण्याचे क्षेत्र बीड-पाटोदा-अहमदनगर या मार्गावर 20 कि.मी च्या अंतरावर आहे. या रस्त्यावर एस.टी बस सेवा तसेच खासगी वाहनांनी येथे पोहोचता येईल.

परभणी

हजरत सय्यद शाह तुराबुल हक दर्गा



हजरत सय्यद शाह तुराबुल हक (रहे) यांचा अनेक वर्षाची परंपरा असणारा उरुस 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होतो. असंख्य भाविक सय्यद शाह तुराबुल हक यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांना श्रद्धेने तुरतपीर बाबा म्हणूनही ओळखतात. सय्यद शाह तुराबुल हक (रहे) हे सुफी पंथाचे मुस्लीम साधू समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य मानले जातात. त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथाचे उर्दूत भाषांतर केले आहे. मनाच्या श्लोकांना उर्दूत ‘मनसमझावन’ असे नाव देण्यात आले आहे.
कसे पोहोचाल?

परभणी शहरापासून हे ठिकाण तीन किमी अंतरावर आहे. येथून बस तसेच खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.

जवळचे रेल्वेस्थानक परभणी.
विमानतळ - औरंगाबाद.

चारठाणा-यादवकालीन शिल्पकला

जिंतूरपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले चारठाणा अथवा चारुक्षेत्र हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. चारठाणा या संपूर्ण दगडी बांधणीच्या यादवकालीन शिल्पकलेने नटलेल्या गावास हेमाडपंथी स्थापत्यकलेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील झुलता स्तंभ पर्यटकांना आकर्षित करतो. हा स्तंभ गावाचे वैभव आहे.

कसे पोहोचाल?

परभणी शहरापासून साधारणत: 62 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. परभणी येथून चारठाणसाठी एसटीची व्यवस्था आहे. जवळचे रेल्वेस्थानक सेलू. विमानतळ - औरंगाबाद.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate