অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांगली संस्थान

सांगली संस्थान

सांगली संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई इलाख्यातील दक्षिण महाराष्ट्रातील एक भूतपूर्व प्रसिद्घ संस्थान. या संस्थानात त्यावेळचा मिरज प्रांत, शिरहट्टी, शाहपूर, मंगळवेढे, तेरदाळ व कुची हे तालुके आणि २४४ खेडी होती. हा प्रदेश मुंबई इलाख्याच्या चार जिल्ह्यांत विखुरलेला व उत्तरेस भीमा नदीपासून दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत पसरलेला होता. संस्थानचे एकूण क्षेत्रफळ सु. २,८८० चौ. किमी. आणि लोकसंख्या २,९३,४९८ होती (१९४१). वार्षिक उत्पन्न सरासरी १९ लाख रूपये होते. सामीलनाम्याच्या वेळी उत्पन्नात किंचित वाढ झाली होती. संस्थान १९४८ मध्ये त्यावेळच्या मुंबई इलाख्यात विलीन झाले आणि नंतर ते प्रथम मुंबई राज्यात व पुढे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आले.

संस्थानाचा मूळ पुरूष हरिभट (हरिभट्ट बीन बाल्लम भट्ट) हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवड गावचे मूळ रहिवासी असून पटवर्धन होत. इचलकरंजीकर घराण्याचे संस्थापक नारो महादेव जोशी यांनी त्यांस उपाध्याय (पुजारी) म्हणून नेमले होते. त्यांस सात मुलगे होते. पैकी प्रसिद्घीस आलेले गोविंद, रामचंद्र व त्रिंबक हे तीन मुलगे होते. त्रिंबक हा अक्कलकोटच्या राजदरबारी सेवक होता. हरिभटांच्या गोविंदराव या मुलास पहिल्या बाजीरावाने इंद्रोजी कदम याच्या पागेची फडणविशी दिली आणि पुढे इंद्रोजीच्या मृत्यूनंतर ती पागा गोविंदरावाकडे आली.

गोविंदरावाने पेशव्यांना कर्नाटकातील स्वाऱ्यांत बहुमोल मदत केली. गोविंदरावाच्या गोपाळराव या मुलाने पुढे बाळाजी बाजीरावांच्या दक्षिण मोहिमेत (१७५९) सावनूरच्या नबाबाचा मुलूख पादाक्रांत केला. त्यावेळी पेशव्यांनी त्यातील काही भाग (जहागीर) पटवर्धनांना दिला. पहिल्या माधवराव पेशव्यांच्या (कार. १७६१– ७२) वेळी त्याच्या अनेक कामगिऱ्यांचा विचार करून पेशव्यांनी मिरजेचा किल्ला आणि सभोवतालचा प्रांत गोविंदराव व त्याचे पुतणे परशुरामभाऊ आणि नीळकंठ या तिघांच्या नावे करून आठ हजार घोडेस्वार ठेवण्यासाठी त्यांस २५ लाखांचा (रू. २५,४१,९००) सरंजाम करून दिला (१७६१). पटवर्धनांनी माधवरावांस रघुनाथरावांविरूद्घच्या कलहात संपूर्ण साहाय्य केले. या काळातच गोविंदरावाचा मुलगा पांडुरंग याच्याकडे सरंजाम आला. पांडुरंगरावास हरिहरराव, चिंतामणराव व विठ्ठलराव असे तीन मुलगे होते. पांडुरंगरावाच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा हरिहरराव अल्पशा आजाराने मरण पावला (१७८२).

परशुरामभाऊ हे त्याचे चुलत भाऊ; पण त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्याकडे नेतृत्व आले. परशुरामभाऊंनी ६ फेब्रुवारी १७८३ रोजी पांडुरंगरावाचा दुसरा मुलगा चिंतामणराव यांसाठी पुणे दरबाराकडून सरंजाम, जहागीर मिळविली. दोन्हींची देखभाल भाऊंनी केली. चिंतामणराव ऊर्फ आप्पासाहेबांनी टिपू सुलतानविरूद्घच्या मराठे, निजाम व इंग्रज यांच्या संयुक्त मोहिमेत उत्तम कामगिरी बजावली. तसेच खर्ड्याच्या लढाईत (१७९५) महत्त्वाची भूमिका पार पाडली. पटवर्धन घराण्याचा कोल्हापूरच्या छत्रपतींशी अनेक वर्षे संघर्ष चालू होता. त्यांनी तासगाव येथील भाऊंचा राजवाडा जाळून पटवर्धनांचा काही प्रदेश बळकावला. तेव्हा कुणाचीही लष्करी मदत न घेता, परशुरामभाऊंनी छत्रपतींच्या सैन्यावर हल्ला केला.

पट्टणकोडी (चिकोडी तालुका, बेळगाव जिल्हा) येथे तुंबळ युद्घ होऊन परशुरामभाऊ मरण पावले (१६सप्टेंबर १७९९). पटवर्धनांनी धोंड्या वाघाचा पुरा मोड करण्यासाठी इंग्रजांना मोठी मदत केली (१८००). पुढे पटवर्धन घराण्यात अंतःकलहाला सुरूवात झाली (१८०१) आणि सरंजामाची विभागणी झाली, तेव्हा गंगाधरराव मिरजेच्या किल्ल्यात एकांतात राहू लागले. पुढे हितचिंतक, स्नेही वगैरेंनी प्रयत्न करून पुणे दरबारातून तोडगा काढून गंगाधरराव या चुलत्याकडून चिंतामणरावांस योग्य हिस्सा मिळवून दिला (१८०८) आणि चिंतामणराव सांगली या लहान गावात किल्ला बांधून राहावयास गेले (१८०८). त्यांनी सांगली या स्वतंत्र संस्थानची स्थापना केली आणि १८१८ ते १८९१ पर्यंत संस्थानचा कारभार चालविला. संस्थान इंग्रजांस वार्षिक खंडणी (तैनात जाबता) देत नसे त्याऐवजी संस्थानने ईस्ट इंडिया कंपनीस १८२१ मध्ये रू. १,३५,००० उत्पन्नाचा प्रदेश कायमस्वरूपी दिला होता व तसा करार १५ मे १८१९ रोजी झाला होता आणि संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक संस्थान बनले. चिंतामणरावांचे प्रथमपासून बहुतेक सर्व इंग्रज गव्हर्नरांशी मित्रत्वाचे संबंध होते.

विशेषतः मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने त्यांना संस्थानच्या शैक्षणिक सुविधांकडे लक्ष पुरविण्यास सांगितले आणि त्यांना पंचोपाख्यान हे पहिले मराठी पुस्तक दिले (१८२२). शिवाय विदुरनीती (१८२३) आणि सिंहासन बत्तीशी (१८२५) यांच्याही छापील प्रती दिल्या.

चिंतामणरावांनी इंग्रजांना ठग लोकांचा बीमोड करण्यासाठी मदत केली तसेच कित्तूर येथील बंडाचा म्होरक्या राया संगोळी याचा मोड करण्यासाठी आपला सेनापती नीलकंठराव यास फौज देऊन इंग्रजांच्या मदतीस पाठविले (१८३०). शिवाय कोल्हापूर संस्थानातील सामानगडचे बंड शमविण्यासाठी इंग्रजांना सहकार्य केले (१८४४). या त्यांच्या कार्याबद्दल ब्रिटीशांनी त्यांस तलवार बक्षीस दिली. या लष्करी कामगिरी बरोबर चिंतामणरावांनी संस्थानचा सर्वांगीण विकास केला. कपालगड डोंगरातील सोन्याच्या खाणी खणण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

तांब्या-पितळेची भांडी, रेशीम उद्योग आणि स्थानिक धंद्यांना उत्तेजन दिले तसेच भिवा सुतार या कलाकाराकडून संगमरवरी गणपतीची मूर्ती त्यांनी बनवून घेतली व गणपतीचे सुरेख मंदिर बांधले. विष्णुदास भावे या मराठी नाटककारास त्यांनी उत्तेजन दिले.

चिंतामणरावांच्या हयातीतच त्यांचा मुलगा गणपतराव मरण पावला (१८२६). तेव्हा त्यांच्या सूनेने विनायकराव भाऊसाहेब या मुलास दत्तक घेतले. त्यास इंग्रजांनी १८३४ मध्ये मान्यता दिली; परंतु चिंतामणरावास दुसरा मुलगा धुंडिराव १८३८ मध्ये झाला. तो चिंतामणरावांनंतर १८५१ मध्ये सांगलीच्या गादीवर बसला. त्याने ब्रिटीशांना १८५७ च्या उठावात बहुमोल मदत केली; मात्र त्यास संतती नव्हती म्हणून ब्रिटीशांच्या अनुमतीने विनायकराव या पूर्वीच्या दत्तकाचा नातू विनायकराव भाऊसाहेब यास दत्तक घेतले. त्याचे नाव चिंतामणराव ऊर्फ आप्पासाहेब ठेवण्यात आले (२ जून १९१०). हेच संस्थानचे अखेरचे अधिकृत संस्थानिक होत.

 

पहा : पटवर्धन घराणे.

संदर्भ :Parasnis, D. B. The Sangli State, Bombay, १९१७.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate