অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिद्दी, जंजिऱ्याचे

सिद्दी, जंजिऱ्याचे

सिद्दी, जंजिऱ्याचे

रायगड जिल्ह्यातील जंजिरा या भूतपूर्व संस्थानचे राज्यकर्ते-नबाब. पश्चिम किनाऱ्यावरील राजपुरी (दंडा-राजपुरी) खाडीच्या मुखाच्या पश्चिमेस सु. ०·५ किमी.वर एका अवघड गोलाकार खडकाळ बेटावर जंजिरा किल्ला चौल (उत्तर) व दाभोळ (दक्षिण) या प्राचीन बंदरांच्या मधोमध वसला आहे. त्याला मुरुड-जंजिरा असेही म्हणतात. जझीरा (बेट) या अरबी शब्दावरुन जंजिरा हे नाव रुढ झाले आहे.

परकीय प्रवाशांच्या वृत्तांतांत त्याचा सिगेरस किंवा झिगेरस बंदर असाही उल्लेख आढळतो. मराठाकालीन कागदपत्रांत क्वचित हबसाण असाही याचा उल्लेख येतो. ते ॲबिसियन किंवा अबिशियन शब्दाचे अपभ्रंश रुप असावे. या किल्ल्याच्या तटबंदीची उंची १३ ते १५ मी. असून महादरवाजा हुलमुखनामक दोन बुरुजांमध्ये आहे. त्याच्या कमानीवर अरबीत कालोल्लेखाचा कोरीव लेख आहे. कोटाच्या तटाला दोन किंवा तीन मजली २७ मीटरच्या अंतराने बांधलेले २२ बुरुज आहेत. त्यांतून माऱ्याची जागा तसेच आतील बाजूस विश्रांतीची जागा आहे. त्यात दारुगोळा ठेवण्याची सोय होती.

तटभिंतींच्या आतील बाजूस चहूबाजूंनी खंदक होता. बालेकिल्ल्यात शियापंथीय पीराचे पंचायतन स्मारक असून कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. मुळात हे कोळ्यांचे जुने श्रद्घास्थान असून त्यास रामपंचायतन म्हणतात. जवळच सिद्दी घराण्यातील पुरुषांच्या-सरदारांच्या कबरी आहेत. कोटात चार मशिदी, तलाव, मोहल्ले, वाडे वगैरेंचे अवशेष आढळतात. याशिवाय तेथील तीन देशी व सहा विदेशी तोफा हे पर्यटकांचे आकर्षण होय.

विदेशी तोफांत तीन स्वीडनच्या आणि स्पेन, नेदर्लंड्स (हॉलंड) व फ्रान्स यांची प्रत्येकी एक तोफ आहे. किल्ल्यात अनेक फार्सी शिलालेख असून १५७६-७७ च्या शिलालेखात निजामशहाच्या आज्ञेने फाहिमखानाची जंजिऱ्याचा मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि त्याने हा अभेद्य किल्ला व तटबंदी बांधली, असा उल्लेख आहे. अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा सुप्रसिद्घ किल्ला मराठे, डच, इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांनी अनेकदा हल्ले करुनही अजिंक्य राहिलेला आहे. पंधराव्या शतकाच्या मध्यास ॲबिसिनिया व पूर्व आफ्रिकेतून पश्चिम भारतात लोक येऊ लागले.

अरब-अल्-हबीश (हबश) येथून येणारे हे लोक हबशी म्हणून ओळखले जात. त्यांना सौदी असेही म्हणत. सय्यद वा सय्यदी (हजरत महंमदांचा वंशज) या नावाचा अपभ्रंश होऊन सिद्दी हा शब्द रुढ झाला असावा. हबशांना मुख्यतः गुलाम म्हणून पोर्तुगीजांनी हिंदुस्थानात आणले; तरी त्यांची निष्ठा, धैर्य व कार्यक्षमता यांमुळे बहमनी दरबारात त्यांना दर्जा लाभला. अल्पावधीत हबशी लोक हे पश्चिम भारतातील कुशल व धाडसी दर्यावर्दी आणि सैनिक म्हणून प्रसिद्घ झाले. ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ हैदराबाद (दक्षिण) या संस्थेने सिद्दी जमातीचा सर्वंकष अभ्यास व संशोधन करुन ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत काही निष्कर्ष काढले आहेत (२०११).

जंजिरा निजामशाहीच्या अखत्यारीत येण्यापूर्वीचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. येथे पूर्वी कोळ्यांची वस्ती होती. दर्यावर्दी चाचे व लुटारुंपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी या सुरक्षित बेटावर लाकडी मेढेकोट बांधला होता. बहमनी सुलतानांच्या कारकीर्दीत जुन्नरचा सुभेदार मलिक अहमद याने १४८२-८३ दरम्यान किल्ल्याला वेढा दिला; पण यश मिळाले नाही. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद या निजामशाहीच्या पहिल्या सुलतानाने १४९० मध्ये जंजिरा जिंकून कोळ्यांना ठार केले. किल्ल्याची डागडुजी करुन याकूतखान या हबशी आरमार प्रमुखाच्या तो ताब्यात दिला.

दुसऱ्या एका प्रवासवर्णनातील वृत्तांतानुसार (क्लूनची इटिनेररी) पेरिमखान नावाच्या सिद्दीने कोळ्यांना फसवून जंजीरा हस्तगत केला, असा उल्लेख मिळतो. पेरिमखान बारा वर्षे जंजिऱ्यावर होता आणि १५३८ मध्ये मरण पावला. लारकोमच्या माहितीनुसार अहमदनगरच्या बुऱ्हान निजामशहाने (१५०९— ५३) जंजिरा व दंडा-राजपुरीचा सुभा त्याचा इराणी शिया मंत्री शाह ताहिर याच्याकडे सोपविला; तथापि पेरिमखानानंतर आलेल्या बुऱ्हान या आरमार प्रमुखाने १५६७— ७१ दरम्यान हा बुलंद किल्ला बांधला असा उल्लेख मिळतो. त्याने त्यास ‘मेहरुब’ (चंद्रकोर) हे नाव दिले; मात्र तेथील उपलब्ध फार्सी शिलालेखात फाहिमखान याने १५७६-७७ दरम्यान किल्ला बांधल्याची नोंद आहे.

पुढे १६०० मध्ये अकबराने अहमदनगर जिंकले, तरी लवकरच मलिक अंबरने (१५४९— १६२६) निजामशाहीचा बराच प्रदेश परत मिळविला. १६१८ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी सिरुर (सुरुल) हा निजामशहाकडून जहागीरदार म्हणून सनद घेऊन आला व त्याने स्वतःस जंजिरा संस्थानचा पहिला नबाब म्हणून जाहीर केले. त्यावेळी दंडा-राजपुरी हे मुख्यालय असून जंजिऱ्याच्या नबाबाच्या आधिपत्याखाली सावित्री नदीपासून नागोठाण्यापर्यंतचा मुलूख होता. त्याच्या जागी १६२० मध्ये सिद्दी याकुतखान आला. त्यानंतर १६२१ मध्ये सिद्दी अंबर नबाब झाला.

मोगलांनी निजामशाही नष्ट करेपर्यंत (१६३६) दंडा-राजपुरीसह कुलाबा अहमदनगरच्या सुलतानांकडेच होता. मोगलांनी जंजिऱ्यासकट कोकणचा प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे सुपूर्त केला. त्याबरोबर सिद्दी अंबर विजापूरचा ताबेदार झाला. यावेळी जंजिरा संस्थानच्या सीमा वाढल्या होत्या. पूर्वेस रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र व उत्तरेस रोह्याच्या खाडीपर्यंत ते विस्तारले होते. त्याचा उपयोग विजापूरचा सागरी व्यापार व मक्केसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंना होऊ लागला. जंजिऱ्याच्या सिद्दी प्रमुखास आदिलशहाने वझीर किताब दिला.

वझीर सिद्दी अंबर १६४६ मध्ये मरण पावला. त्याच्या जागी सिद्दी युसुफ नबाब झाला. त्याच्या मृत्यूनंतर (१६५५) फतेहखान वझीर झाला. यापूर्वी शिवाजी महाराजांनी जंजिरा घेण्याचे प्रयत्न केले होते. पण यश आले नाही. म्हणून १६७० मध्ये महाराजांनी जंजिऱ्यास खुष्कीच्या मार्गाने तसेच समुद्रमार्गे वेढा घातला. पोर्तुगीजांनी सिद्दीस गुप्तपणे दारुगोळा पुरविला; तरी महाराजांचे सैन्यबळ पाहून सिद्दी जंजिरा त्यांच्या स्वाधीन करण्यास राजी झाला. तेव्हा सिद्दी फतेहखानाच्या हाताखालील सरदार संबळ, कासिम व खैरियत सिद्दी यांनी विरोध करुन फतेहखानास कैद केले व लढा चालू ठेवला. त्यांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारुन मदत मागितली. सुरतच्या मोगल अधिकाऱ्याने ती दिली.

औरंगजेबाने सिद्दी संबळ यास याकुतखाँ हा किताब दिला व त्यास सुरतच्या महालातून तीन लाखांची जहागीर दिली. त्यामुळे सिद्दी संबळ मोगल आरमाराचा प्रमुख झाला आणि सिद्दीचे वर्चस्व सुरतपर्यंत प्रस्थापित झाले. सिद्दी कासिम व सिद्दी खैरियत यांना अनुक्रमे मे जंजिरा आणि किनाऱ्यावरील दंडा-राजपुरी व अन्य प्रदेश देण्यात आले, त्यामुळे यावेळीही महाराजांना यश लाभले नाही. त्यानंतरही शिवाजी महाराजांनी १६७१, १६७३ व १६७६ मध्ये इंग्रज, पोर्तुगीज यांच्याबरोबर तह करुन जंजिरा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७६ मध्ये संबळ व कासिम यांत वैर निर्माण झाले. तेव्हा कासिमने नौदलप्रमुख पद मिळविले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) छत्रपती संभाजींनी जंजिरा घेण्याचा निकराचा प्रयत्न केला (१६८२); पण त्यांनाही ते जमले नाही.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) रायगडसह अनेक किल्ले मोगलांच्या हाती आले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. १६९४ ते ९८ पर्यंत कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे त्याने सर्व किल्ले परत घेतले गेले.

कान्होजीच्या मोहिमेचे मुख्य ध्येय संभाजींच्या हत्येनंतरच्या संघर्षात सिद्दीने बळकावलेला मराठा प्रदेश पुन्हा मिळविणे हे होते. सिद्दी आणि पोर्तुगीजांनी आंग्रेच्या विरोधात मुघलांशी सलोखा केला; परंतु कान्होजीने या त्रयींचा पराभव केला. औरंगजेबाने सिद्दीने केलेल्या मदतीपोटी त्याला मराठ्यांची कोकणातील सर्व ठाणी दिली. मराठ्यांचे रायगड, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्गासह अनेक किल्ले त्याच्या ताब्यात आले होते. सिद्दी घराण्यातील सिद्दी सात हा गोवलकोट व अंजनवेल किल्ल्यांवर मुख्य प्रशासक होता. महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत रामचंद्रपंतांनी सिद्दीवर हल्ला केला (१७०१); परंतु यश आले नाही.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate