অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

या, बघा, आनंदी व्हा...

महाराष्ट्र देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असून हा प्रदेश 17 टक्के वनांनी नटलेला आहे. आपल्या राज्यात तब्बल 57 अभयारण्ये आणि ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. येथे सदाहरित, निम सदाहरीत, उष्ण कटिबंधीय पानगळीची, शुष्क पानगळीची, खारफुटीची अशी अनेक प्रकारची वने आहेत. विदर्भात प्रचंड डरकाळी फोडणारे देखणे रुबाबदार वाघ, मराठवाड्यात लांब ढांगा टाकत उड्या मारणारे चिंकारा, काळवीट, धिप्पाड माळढोक पक्षी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारचे सरीसृप, औषधी वनस्पती, अनोखे सागरी जीव सापडतात.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

पश्चिम घाटातील महत्त्वपूर्ण जैवविविधता असलेला हा व्याघ्र प्रकल्प चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्य मिळून तयार झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातून वारणा, कोयना नद्या वाहतात कोयना आणि चांदोली धरण याच नद्यांवर बांधले आहेत. येथे तब्बल 1500 प्रजापतीच्या वनस्पती आहेत. त्यात 300 वनौषधी प्रजाती आहेत. कारवी, निर्गुडी, अडुळसा, शिकेकाई, रानचमेली, सर्पगन्धा, धायटी, ज्याची आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात मोठी मागणी आहे अशी नरक्या ही वनस्पती येथे आहे. येथे वाघासह 36 प्रजातीचे प्राणी आहेत. राज्य प्राणी शेकरूसुद्धा आढळते. हे निमसदाहरित आणि मिश्र पानगळीचे जंगल आहे. येथे पक्षी प्रजाती 230 आहेत. त्यातही निलगिरी वूड पिजन हा दुर्मिळ पक्षी आणि नदीसुरयची वीण होते. 125 प्रजातीची विविधरंगी फुलपाखरे आहेत. भारतातील सर्वात मोठे सदर्न बर्ड विंग आणि सर्वात लहान ग्रास ज्वेल ही फुलपाखरे इथे आढळतात. इथे शिवसागर जलाशय, वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, ओझर्डे धबधबा, कास पठार, चाळकेवाडी पठार, झोळबी पठार बघण्यासारखे आहे.

जायचे कसे ?

कोयनानगर - कोल्हापूर 130 किमी, कराड- 56 किमी, सातारा 90 किमी, पाटण 20किमी, चिपळूण 45 किमी, चांदोली- मुंबई 380 किमी, पुणे 210 किमी, सांगली 98 किमी, कोल्हापूर 80 किमी, रेल्वे स्टेशन - सांगली 98 किमी, मिरज जंक्शन 110किमी, कोल्हापूर 80 किमी, कराड 60 किमी, विमानतळ- पुणे 210 किमी, कधी जावे-नोव्हेबर ते मार्च.

ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प


ताडोबा राष्ट्रीय उद्यान (116.55 चौ.किमी), अंधारी अभयारण्य (508.85 चौ. किमी ) मिळून (625.40 चौ.किमी) चे हे व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला तारू या आदिवासींच्या देवावरून हे नाव मिळाले. तर, अंधारी अभयारण्याला घनदाट अंधाऱ्या जंगलातून वाहणाऱ्या अंधारी नदीवरून. येथे वृक्षांच्या 141 प्रजाती आहेत. इथले सर्वात मोठं आकर्षण अर्थातच वाघ आहे. शिवाय 280 हून अधिक पक्षी प्रजाती आहेत. 70 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. या प्रकल्पाच्या सीमेवर रामदेगी आहे. पावसाळ्यात इथे सुंदर धबधबे, निर्झर वाहत असतात. पराक्रमी गोंडराणी हिराईने बांधलेले चंद्रपूरची कुलदेवता माता महाकालीचे मंदिर आहे. अचलेश्वर मंदिर, राणी हिराईने बांधलेली तिचा पती राजा बिरशहा याची भव्य समाधी मोगलकालीन शैलीची आठवण करून देते. भद्रावती तालुक्यात बौद्ध काळातील विजासन लेणी, जैनधर्माचे पार्श्वनाथ मंदिर, जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ला हे सारे बघण्यासारखे आहे.

 

जायचे कसे ?

हवाई मार्ग - नागपूर विमानतळ 155 किमी. रेल्वे मार्ग -चंद्रपूर रेल्वे स्टेशन 45 किमी. रस्ता चंद्रपूर बसस्थानक 45 किमी. 
कधी बघावे ?- तसे वर्षभर. पण, फेब्रुवारी ते मे वन्यजीव दर्शनाची संधी अधिक असते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान


मुंबईसारख्या महानगरातील हिरवाई म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. इथे बिबट आढळतात. इथल जंगल मुंबईला पाणी पुरवते म्हणून मौल्यवान आहे. इथे 27 प्रजातीचे पक्षी आणि 35 प्रकारचे सस्तन प्राणी असून 78 प्रजातीचे सरीसृप आहेत. तसेच 170 प्रजातीची फुलपाखरे आहेत.

जायचे कसे?

हवाई मार्ग- मुंबई विमानतळ 15 किमी.रेल्वे - मुंबई ते बोरेवली 30 किमी., रस्ता - मुंबई -अहमदाबाद महामार्गवर बोरीवली बस स्थानक

भामरागड अभयारण्य

 


गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड अभयारण्य 104.38 चौ.किमी क्षेत्रफळ आहे. पर्णकोटा, पामूलगौतम नद्या इथून वाहतात. दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीचे जंगल असून सागवान मुख्य प्रजाती आहे. तसे इथे 69 प्रकारचे वृक्ष, 15 प्रकारची झुडपे, 73 वनस्पती, 47 प्रकारचे गवत, 41 लतावर्गीय वनस्पती आहेत. एकेकाळी हे ऐतिहासिक शिकार क्षेत्र होते. याच जिल्ह्यात चपराळा अभयारण्य आहे. 134.78 चौ.किमी हे अभयारण्य 25 फेब्रुवारी 1986 मध्ये जाहीर करण्यात आले. वर्धा-वेनगंगा नदीचा संगम चपराळा या गावाजवळ होतो. इथून ती प्राणहिता नावाने पुढे वाहत जाते. तेलंगणा राज्याजवळ हे अभयारण्य आहे. ताडोबा-अंधारी व्याघ प्रकल्प आणि छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्रप्रकल्प यातील वन्यजीवाचा कोरिडोअर म्हणून हे अभयारण्य ओळखले जाते. इथून पुढे सिरोंचा तालुक्यात प्राणहिता अभयारण्य आहे. मंचेरीयलपासून 35 किमी दक्षिण पठारावरील वैशिष्टपूर्ण प्रागेतिहासिक भोगोलिक रचनेमुळे येथे पक्षी, प्राण्यांची विविधता आहे. डायनोसोर आणि प्रागेतिहासिक काळातील वृक्षांचे अवशेष (फासिल्स) सापडले आहेत.

136 चौ. किमीचे हे अभयारण्य आहे. येथे नीलगाय, अस्वल, वाघ, बिबट, रानमांजर, ताडमांजर,हुदाळे (इंडियन ऑटर्स) दिसतात. या शिवाय अहेरी - भामरागड मार्गावर ग्लोरी ऑफ आलापल्ली हे अजब ठिकाण आहे. या भागातील गगनचुंबी महाकाय वृक्ष बघून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. इथल्या सागवान, कळंब, हल्दूच्या वृक्षाला मिठी मारण्यासाठी पाच - सहा जणांचे रिंगण करावे लागते. इथून जवळ कमलापूर हत्ती क्यांप आहे. आष्टीजवळ कोनसरी हे शेकरू या खारीचे वीणीचे ठिकाण आहे. कोलामार्का हे रानम्हशीचे संरक्षित क्षेत्र सिरोंचा तालुक्यात आहे. मध्यभारतीय शुद्ध प्रजातीच्या 50 रानम्हशीपैकी 15 ते 20 इथे आहेत. जेर्डनचा कोर्सर हा दुर्मीळ पक्षी इथे आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पही याच जिल्ह्यात आहे. कालेश्वर, सोमनूर, व्यंकटापूर ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

जायचे कसे?

हवाई मार्ग- नागपूर विमानतळ, रेल्वे मार्ग - बल्लारपूर रेल्वे स्टेशन आष्टी येथून 60 किमी आहे. रस्ता - बल्लारपूर, गडचिरोली, चंद्रपूर येथून बस उपलब्ध. 

देऊळगाव - रहेकुरी अभयारण्य


अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काळविटांसाठी ओळखले जाणारे 1980 मध्ये फक्त 15 काळविटांपासून सुरू झालेले हे अभयारण्य आता 400 काळवीट सांभाळते. याचे क्षेत्रफळ 217.30 हेक्टर आहे.

जायचे कसे?

हवाई मार्ग - पुणे विमानतळ 165 किमी, रेल्वे अहमदनगर 55 किमी, रस्ता - अहमदनगर 55 किमी


लेखक - मिलिंद उमरे

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate