অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘सावाना’चे अनोखे वस्तूसंग्रहालय

‘सावाना’चे अनोखे वस्तूसंग्रहालय

पावणेदोनशे वर्षाचा इतिहास असलेले सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) वाचकांसाठी पंढरी ठरली आहे. वाचनालय म्हटले की आपण पुस्तकांपुरताच विचार करतो. मात्र नाशिकशी नाळ जोडायला लावणाऱ्या दुर्मिळ अशा वस्तुंच्या संग्रहासाठीही सावानाने मोलाची कामगिरी केली आहे. प्रत्येक नाशिककरानं सावानाचे वस्तुसंग्रहालयातील दिव्य सोहळा अनुभवायलाच हवा. सावानाच्या इमारतीसमोरील पाषाणातील दोन मूर्ती आपल्याला संग्रहालयाकडे खेचून नेतात.

दुर्मिळ नकाशे, मूर्ती, चित्र, काष्ठशिल्प, शस्त्र, नाणी, शिलालेख अन् ऐतिहासिक वस्तूंनी सावानाच वस्तूसंग्रहालय गजबजलेलं आहे. संग्रहालयाची सुरुवात नाशिकच्या दुर्मिळ चित्रांतून होते. शहरातील दिग्गज चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचा पहिल्या हॉल मोहरलेला आहे. याच हॉलमध्ये दुर्मिळ नकाशाचेही दर्शन होते. शंभर दीडशे वर्षांपूर्वीचे नाशिक कसे होते हे यातून अनुभवायला मिळते.

दुसऱ्या हॉलमध्ये प्रवेश करताना डाव्या हाताला भिंतीवर नाशिक रागमाला या पेशवाईतील ऐतिहासिक चित्र डोळ्यांमध्ये सोन्याची रांगोळी काढतात. तर उजव्या हाताला प्राचीन खेळ, वस्तू व धातू व पाषाणातील शिल्पांचा आविष्कार अनुभवायला मिळतो. बुद्धमूर्ती समोरून तर हलवतच नाही. थोडं पुढे गेल्यावर नाणी संग्रह, शिलालेख व इतिहास गाजविणाऱ्या शस्त्रांची मांडणी केलेली शोकेस आपल्याला खिळवून ठेवतात. काष्ठशिल्पातील दरवाजा आपल्याला तिसऱ्या हॉलकडे घेऊन जातो. खरं तर हा तिसऱ्या हॉलचा प्रवेशद्वार नाही मात्र तसा भास नक्की होतो.

रागमालेचा आविष्कार अनुभवत आपण तिसऱ्या हॉलमध्ये दाखल होतो. येथे देवनगरी अवतरल्याचा भास होतो. दुर्गा, सरस्वती, ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश असे सारेच देवांच्या लहान मोठ्या मूर्ती आपल्याला खिळवून ठेवतात. तर ज्येष्ठ रामभाई बटाविया यांनी कंबोडिया, नेपाळ, श्रीलंकेसह विविध देश आणि वाराणसी, अलाहाबाद, अमृतसर, श्रीनगर, बेंगळूरू, सिमला, हरिद्वार, हृषीकेश अशा असंख्य शहरांतून जमविलेल्या आणि जीवापाड जपलेल्या १६१ मूर्तीचा सोहळा सावाना संग्रहालयाला दान केला.

हा छंद अनुभवताना डोळ्यांची पारणे फिटतात. नटराज, हनुमान, डाकिणी, विष्णू-लक्ष्मी, खंडोबा-म्हाळसा, महिषासुरमर्दिनी, दुर्गा, मुरलीधर, उमामहेश्वर आलिंगन मूर्ती, वीरभद्र, गंगा, भूदेवी, शंकराचे तांडवनृत्य अशा अनेक विविध धातूच्या मूर्ती आपल्याला जागचे हलू देत नाहीत. आपल्या संस्कृतीवर प्रकाश टाकणारे सुरई, सुरमादाणी, भांडी, नाजूक कलाकूसर असलेले अडकित्ते, वजरी, लामणदिवे, उत्खननात मिळालेल्या पुरातत्त्वीय वस्तू हे सर्वकाही थक्क करायला लावते. सावानाचे संग्रहालय सायंकाळी ४ ते ८ या वेळेत खुले असते. सुटीमध्ये पालकांनी चिमुकल्यांसह हा खजिना नक्की पहायला हवा.

लेखक : रमेश पडवळ

 

 

अंतिम सुधारित : 9/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate