অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अज्ञातवासातील महाजनपूर

अज्ञातवासातील महाजनपूर

वेशीवरच्या पाऊलखुणा : अज्ञातवासातील महाजनपूर

‘एक गाव तीन तुकडे’ किती विचित्र वाटतं ना? एका गावाचे तीन तुकडे कसे होऊ शकतात. हद्द या अर्थाने होतीलही, पण नावानेही कसे तुकडे होई शकतात. असाच मनात घोंघावणारा प्रश्न मात्र तेथील गावकऱ्यांना कधी पडला नाही. ते अजूनही गुण्यागोविंदाने गावसंसार करताना दिसतात. पण, असं काय घडलं की, या एका गावाचे तीन तुकडे झाले अन् एक वैभवशाली इतिहास हरवून बसला, याचे उत्तर हाती लागत नाही. याच इतिहासाच्या न सापडणाऱ्या पाऊलखुणा मात्र गाव भटकताना अस्वस्थ करतात अन् आहे त्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन झाले तर भविष्यात याचा उलगडा व्हायला मदत होईल, असे वाटायला लागते.

ऐतिहासिकदृष्ट्या अज्ञातवासात हरविलेल्या गावाचा प्रवास हा अस्वस्थ करणारा असतो. तेवढाच तो आपल्यातील इतिहासाबद्दलचा अज्ञात जिव्हाळा समोर आणायलाही मदत करतो. हातात असलेल्या एखाद्या गोष्टीपेक्षा हरवलेल्या एखाद्या गोष्टीचे जास्त आकर्षण असते, हा मनुष्य स्वभाव असल्याने अज्ञात पैलूंच्या शोधात अशा गावांची भटकंती रोमांचक ठरते. जेव्हा त्या गावातील लोकही आपल्या गावाविषयी जाणून घ्यायला उत्सुक असतात तेव्हा हे अधिक रम्य वाटायला लागते. असाच वेगळा प्रवास अनुभवयाला मिळतो तो निफाड तालुक्यातील महाजनपूर, भेंडाळी अन् औरंगपूर या गावांच्या माध्यमातून. ही तीन गावे म्हणजे नकाशावरचा एक त्रिकोण आहे. या गावांत जाण्यासाठी नाशिक-औरंगाबाद रस्त्याने सायखेडाला जावे. तेथील मविप्र कॉलेजशेजारून भेंडाळीकडे जाणाऱ्या रस्त्याने सहा-सात किलोमीटर गेल्यावर उजव्या हाताला पेट्रोलपंप लागला की समजावे आपण महाजनपूरच्या हद्दीत दाखल झालो.

पण महाजनपूर, भेंडाळी अन् औरंगपूर यापैकी नक्की कोणत्या गावात जायचे असा प्रश्न पडतो. कारण ही तीन गावे आता वेगवेगळी आहेत. पूर्वी म्हणजे १६५० ते १७०० च्या दरम्यान या तिन्ही गावाचे नाव एकच होते ते म्हणजे महाजनपूर! महाजनपूर हे नाव गावाला कशामुळे पडले हा शोधही आपल्याला बाराबलुतेदारी अन् ग्रामीण गावगाड्याची रचना तसेच राजामहाराजांकडून दिले जाणाऱ्या वतने, जहागिरीच्या स्मृतीकोषात उलगडतो. महाजन म्हणजे बाजारपेठेचा व्यापार, व्यवहारांतील वजने–मापे, मालाची देवघेव इत्यादींवर देखरेख ठेवणारा आणि व्यापारी कर वसूल करणारा अधिकारी. म्हणजेच असा कोणी अधिकारी महाजनपुरात राहत होता का? यामुळे या गावाला असे नाव पडले याचा उलगडा आता मात्र होत नाही. पण मनातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांना तर्कांच्या आधारे का होईना उत्तरे देण्यास अजूनही ही गावे सज्ज दिसतात.

सायखेडा रस्त्यावर डाव्या हाताला भेंडाळी, उजव्या हाताला महाजनपूर तर भेंडाळीच्या मागील बाजूस औरंगपूर हे गाव लागते. भेंडाळी गावात शिरताच काही अंतर गेल्यावर एक मोठी दगडी भिंत उजव्या हाताला लागते. इतिहासात हरविलेले अनेक पैलू उलगडायला ही दगडी भिंत मदत करते. दोन एकरात एका भल्या मोठ्या वाड्याची ही एकमेव उरलेली भिंत महाजनपूरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देताना दिसते. भेंडाळी गावातील हा वाडा पूर्वी महाजनपूरात होता. म्हणजेच भेंडाळी, औरंगपूर ही गावे देखील महाजनपूर नावाने ओळखली जात. या गावात औरंगजेब व त्याचे सैन्य १६५५ च्या दरम्यान राहिले होते. यावेळी औरंगजेबाकडून ही गावे लुटली गेली असतील अन् या गावातील महाजन म्हणजेच मोठा व्यापारी असलेला कोण्या सरदाराची औरंगजेबाने वाताहत केली असेल. याचदरम्यान त्यांचा वाडाही उद्धवस्त झाला असेल. हा सरदार मराठा असण्याची शक्यता अधिक वाटते. कारण वाड्याच्या आजूबाजूला असलेली मंदिरे व वीरगळी पहायला मिळतात.

याला ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीतून पुष्टीही मिळते. गावात औरंगजेब आला होता व तो जेथे थांबला तेथील महाजनपूरातील भागाला औरंगपूर म्हटले जाऊ लागले, असे ग्रामस्थ सांगतात. वाड्याचा परिसर पाहिला की, ही भिंत अजूनही इतिहास सांगायला आतूर असल्याचे वाटते. वाड्याच्या भिंतीमागे दगडाची लहानमोठी मंदिरे आहेत. येथील वीरगळी पराक्रमांची आठवण करून देतात. ही इतिहासाची साधने पाहिल्यानंतर पुन्हा भेंडाळीकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताला एक रस्ता शेताकडे घेऊन जातो. गावात जाण्यापूर्वी येथे जाणे सोयीस्कर. दोन किलोमीटर गेल्यावर येथे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली लाल वीटांची बारव पहायला मिळते. ही दुमजली बारव वापरात नसल्याने तिची अवस्था वाईट आहे. बारव पाहून पुन्हा भेंडाळी गावात आल्यावर जुन्या नव्या घरांचा संगम असलेले भेंडाळी पहायला मिळते. भेंडाळी हे नाव कसे पडले हे स्पष्ट नसले तरी पूर्वी महाजनपूर हे आमचे मूळ गाव असे ग्रामस्थ आवर्जून सांगतात. भेंडाळीत जुन्या लाकडी व मातीच्या बांधणीतील राममंदिर, हनुमान मंदिर पहायला मिळते. तेथून औरंगपूरकडे जाण्यापूर्वी एक ओढा लागतो हा ओढा पुढे गोदावरीला जाऊन मिळतो. ओढ्याच्या अलीकडेच आणखी एक बारव पहायला मिळते.

भेंडाळीतील या बारवेचे वैशिष्ट्य म्हणजे या बारवेवर असलेला शिलालेख या तीन गावांचा इतिहास उलगडतो. नाशिकमध्ये असलेल्या बारवांवर शिलालेख नाहीत; मात्र, भेंडाळीतील बारवेवर शिलालेख असणे हेही या गावच्या वैभवावर व श्रीमंतीवर प्रकाश टाकते. या शिलालेखावर महाजनपूर असा उल्लेख मिळतो. मात्र शिलालेखाची अवस्था अत्यंत वाईट असल्याने इतर ओळींचा स्पष्ट अर्थ लावता येत नाही. मात्र हा शिलालेख भेंडाळी, महाजनपूर व औरंगपूर एकत्र असल्याचा पुरावा आहे. बारवेची अवस्था कचराकुंडीपेक्षाही वाईट आहे. गावाने अशा ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच स्वयंसेवी संस्थांनी जलशास्त्रांच्या दृष्टीने उपयोगी असलेल्या बारवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत, असे या बारवेकडे प‌ाहिल्यावर वाटते. अत्यंत दयनीय अवस्थेतील बारव व शिलालेख आपल्याला साद घालताना पाहताना यातनांचा डोंगर उभा राहतो. अशीच बारव जवळच्या सोनगावातही असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

बारव पाहिल्यानंतर ओढा ओलांडताना औरंगपूरमधील अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वीची मशीद समोर दिसते. थोडे पुढे गेल्यावर पूर्वी दगडी असलेल्या महादेव मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार केलेला दिसतो. जुन्या दगडी मंदिराचे अवशेष आजूबाजूला विखुरलेले दिसतात. तेथून पुढे शंभर उंबऱ्यांचे औरंगपूर व एक खंडोबा मंदिर पहायला मिळते अन् भेंडाळी अन् औरंगपूरचा प्रवास संपतो. तेथून महाजनपूर हे रस्त्याच्या पलीकडे वसलेले गाव पहायला मिळते. हे गाव औरंगजेबाच्या धास्तीने मूळच्या महाजनपूरातून येथे वसले असावे. या गावात हनुमान मंदिर, खंडेराव मंदिर, विठोबा, महादेव, भैरव आदींची मंदिरे आहेत. या तिन्ही गावांमध्ये रामनवमी व हनुमानजयंती हे गुण्यागोंविदाने साजरी केली जाते. महाजनपूरचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे निफाड तालुक्यातील महाजनपूर या गावास सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. अभियांत्रिकी, पोल‌िस आणि ‘आर्मी’ या तीन क्षेत्रात करिअर करण्यासाठी गावातील तरुण आग्रही दिसतात. या गावातील सर्वाधिक तरुण सैनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे गावाला ‘सैनिकपूर’ असे म्हटले जाते. महाजनपूरच्या धाडसी इतिहासाचे हेही उदाहरणच आहे.

पण, आजही दररोज दिसणारा ओसाड वाडा या तिन्ही गावांना सतावतोय. काय घडलं असेल या गावांमध्ये? आम्ही असे कसे वेगळे झालो? हे दगड का आजही विचारतायेत की, कोण आहोत आम्ही? या अनेक प्रश्न अन् त्यांची कोड्यात टाकणारी उत्तरे घेऊन या गावांच्या प्रवासात पूर्णपणे उलगडत नसली तरी ही अस्वस्थता एक ऐतिहासीक प्रवास घडविते अन् तीन तुकड्यात विखुलेल्या एकाच गावाच्या प्रवासाला विराम मिळतो.

 

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 9/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate