অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनेर डॅम

अनेर डॅम

अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला... देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला.... बहिणाबाई चौधरींची ही कविता... सुगरणीचा खोपा ज्यानं पाहिला त्याला त्याची सुंदर वीण आणि त्याचं देखणेपणं विसरता येणार नाही. झाडाला लटकणारे पक्षांचे अनेक खोपे जसं मन वेधून घेतात तसंच झाडांच्या ढोलीतील पक्षांची घरटीही...

आकाशात ऊंच ऊंच उडणाऱ्या पक्षांचं आकर्षण सर्वांनाच असतं... मला या पक्षासारखं आकाशात उडता आलं असतं तर किती छान झालं असतं... असं प्रत्येकाला त्याच्या बालपणी वाटलेलं असतं... चिमण्यांच्या चिमुकल्या विहारापासून गरूडाच्या गगन भरारीपर्यंतचा पक्षांचा उडण्याचा आवाका प्रचंड असतो... तो मनाला भूरळ पाडतो...रानावनातून भटकताना मध्येच चित्रविचित्र आवाज काढणारे आणि आपल्या नयनरम्य रंगांनी मन मोहून टाकणारे पक्षी त्यांच्या आकाराने, आवाजाने, रंगाने, लकबीने आपलं लक्ष वेधून घेतात.

पक्षी निरिक्षण हा अनेकांचा छंद असतो. पण त्याचा यशस्वी प्रवासही संयम आणि शिस्तीच्या वाटेवरून पुढे जातो. पक्षी कुठले..? पिंजऱ्यातील नाही बरं का? अगदी स्वच्छंदपणे निसर्गात विहरणारे... आपल्या भरदार पंखांनी आकाशात कवेत घेणारे. आपल्या पिसाऱ्याने, डोक्यावरच्या तुऱ्याने, रंगीबेरंगी शेपट्याने मनाला मोहून टाकणारे.... एकदा पक्षी निरिक्षणाची सवय लागली की ऋतूमानानुसार त्या-त्या स्थळी असलेले आणि पाहुणे म्हणून येणारे दोन्ही पक्षी आपल्या परिचयाचे होऊन जातात. पहिल्या वर्षी दिसलेल्या पक्षांमध्ये नव्या पक्षाची भर पडली तर आनंद होतोच पण एखादा जुना पक्षी पुन्हा त्याच जागी भेटला नाही तर त्यांच्या अस्तित्त्वाची काळजी देखील वाटायला लागते... इतकं जिव्हाळ्याचं नातं या मैत्रीत निर्माण होतं...

पक्षांची संख्या कमी जास्त होणं हा देखील एक अभ्यासाचा विषय होतो. जो फक्त पक्षी निरिक्षणाचा आनंद घ्यायला जातो तो कदाचित पहिल्यांदा पाहिलेल्या पक्षांच्या नोंदी ठेवणार नाही पण खऱ्या अर्थानं पक्षी निरिक्षणातून संशोधनात्मकदृष्टी विकसित करणारा माणूस या नोंदी नक्कीच ठेवतो.... मग तो पाण्यावरचे पक्षी, शेतातले पक्षी, शहरातले आणि जंगलातले पक्षी अशा वेगवेगळ्यादृष्टीने त्यांचे विश्लेषण करतो... त्यांचा आवाज कानात साठवून ठेवतो. त्यावरून तो त्या पक्षांना ओळखायला देखील शिकतो... महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य आहे. अहमदनगर-औरंगाबादच्या मार्गावर जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. नाशिक मध्ये नांदूर मधमेश्वर, रायगड मध्ये कर्नाळा, धुळ्यात अनेर डॅम, बीड मध्ये नायगाव मयूर अभयारण्य आहेत.
सातपुडा समृद्ध आणि दुर्मीळ अशा वनराईने नटलेला आहे. पूर्णा, तापी नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवताळ, झुडपांचा भाग असल्याने अनेक तृणभक्षीय प्राणी या भागात आहेत. याच सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी शिरपूरपासून 16 कि.मी अंतरावर मुंबई आग्रा रस्त्याला लागून साग, अंजन, पळसाच्या झाडांची दाटी आहे. अरूणावती नदीच्या पाणलोट क्षेत्रानजीकचे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने 1986 मध्ये अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.
ऊंच अशा सातपुडा पर्वतरांगांनी घेरले गेलेले आणि शुष्क पानगळीच्या आणि खुरट्या काटेरी वनांसाठी ओळखले जाणारे हे अभयारण्य 82.940 चौ.कि.मी क्षेत्रात पसरले आहे.

अभयारण्यात प्रामुख्याने साग, अंजन, पळस, धावडा, बाभूळ, हेंकळ, चिंच, मोहा, आवळा, आपटा, सलई या वृक्ष प्रजाती असून जैव विविधतेने संपन्न असा हा प्रदेश आहे. कोल्हा, भेकर, खार, मोर, चिंकारा, सुगरण, कोकिळा, घुबड, ससा, तित्तर, बटेर, गिधाड, सुतारपक्षी, मैना, मुंगूस, कोब्रा, सायाळ, घोरपड, मन्यार, सरडा, लांडगा, अस्वल, हॉर्नबिल, पानकोंबडी, रानडुक्कर, बगळे, तडस अशा प्राणी आणि पक्षांनी हा प्रदेश समृद्ध आहे. शिवाय स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांची खूप मोठी संख्या या अभयारण्यात आढळते.

अभयारण्यात महाराष्ट्राचे मानचिन्ह हरियाल देखील आहे. अभयारण्यामध्ये कडरागड येथे अखंड दगडात कोरलेल्या गुंफा ही आपले लक्ष वेधून घेतात. अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. धुळे येथून शिरपूर येथे जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बस सेवा उपलब्ध आहे. येथील बगीचा सुरेख आहे. बोटिंगच्या सुविधेसह सनसेट पॉईंटवरून मावळत्या दिनकराचे होणारे दर्शन विलोभनीय आहे. निसर्ग पाऊलवाटावर तयार केलेले नक्षत्र वन, चिरंजीव वन ही पाहण्यासारखे आहे. पर्यटकांसाठी बोटची सुविधा उपलब्ध आहे.

 

- डॉ. सुरेखा म. मुळे संदर्भ : वन विभाग

माहिती स्रोत: महान्यूज, मंगळवार, ०२ जून, २०१५

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate