অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चला मस्त्यालय पाहूया.. जलसृष्टीचा आनंद घेऊया

चला मस्त्यालय पाहूया.. जलसृष्टीचा आनंद घेऊया


पिवळे.. निळे.. तांबुस.. तपकिरी.. अशा सप्तरंगी रंगातले मासे आणि जलचर प्राण्यांचा कुंभमेळा पुन्हा एकदा भरलाय मुंबईच्या चर्नीरोडवरील तारापोरवाला मस्त्यालयामध्ये. पर्यटकांबरोबरच अभ्यासकांसाठी पर्वणी ठरलेले हे अर्धशतकी वाटचाल करणारे मस्त्यालय पुन्हा एकदा सामान्यांसाठी मंगळवार दि. 3 मार्च पासून खुले करण्यात आले आहे. सिंगापूर, दुबई, चीनच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्यावहिल्या भुयारी मत्स्यालय (मरीन टनेल) ठरलेल्या तारापोरवाला मत्स्यालयामुळे सागरी जीवन जवळून बघण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. बच्चेकंपनीसाठी तर विशेष पर्वणीच ठरणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी मोफत मस्त्यालय पाहण्याची संधी दिल्याने एकाच दिवशी सुमारे 10 हजार पर्यटकांनी त्याला भेट दिली.
समुद्राचा उथळ तळ, चारी बाजूंना पाणी आणि विविधरंगी, विविधढंगी जलचरांचा असलेला वावर... याच साऱ्या सागरी जीवनाची सफर मुंबईकरांना पुन्हा एकदा घडवून देण्यासाठी मुंबईचे तारापोरवाला मत्स्यालय नव्या रंगात आणि नव्या ढंगात सज्ज झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पदुम मंत्री एकनाथ खडसे आणि मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या मत्स्यालयाचं लोकार्पण झालं.
हे मत्स्यालय नूतनीकरणासाठी दोन वर्षं बंद होतं. मुंबईतील एका महत्वाच्या पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या या मत्स्यालयाला नवं रुप देणं ही काळाची गरज ओळखून ते अत्याधुनिक करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत प्रयत्न करण्यात आले आहेत. सुमारे 21 कोटी रुपये खर्चून या मत्स्यालयाचं नूतनीकरण करण्यात आले आहे. नूतनीकरणानंतर आता येथे स्थानिक माशांव्यतिरिक्त परदेशातून आयात केलेले जगभरातील दुर्मीळ, शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे रंगीत, आकर्षक मासे व इतर जलजीव अधिक स्पष्टपणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक टाकीत खाऱ्या व गोड्या पाण्यातील जलचरांच्या विविध प्रजाती, नैसर्गिक खडक, पानवनस्पती अतिशय आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केल्या आहेत. विविध प्रकारच्या माशांच्या प्रत्येकी 200 जाती ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची माहिती एलसीडी स्क्रीनवर प्रदर्शित केलेली पाहता येते. थंड आणि सुखद वातावरणात प्रेक्षकांना मत्स्यालयातील जलसृष्टीचा अनुभव घेता यावा, यासाठी नूतनीकरणानंतर संपूर्ण मत्स्यालय वातानुकूलित करण्यात आले आहे.
मत्स्यालयातील सागरी विभागात बटरफ्लाय, एंजल, ट्रीगर, स्क्विरल, ग्रुपर, पोम्प्यानो, व्हीम्पल, मूरीश, सी अनिमोन असे दुर्मिळ जातीचे आणि परदेशातून आयात केलेले मासे येथे पाहायला मिळतात. तसंच हॉलमधील गोड्या पाण्याच्या विभागातदेखील विदेशातून आयात केलेले अरोवाना, फ्लॉवर हॉर्न, शार्क, ब्लॅक घोस्ट, पिरान्हा, रोहू, मृगळ इत्यादी प्रकारचे आकर्षक आणि शोभिवंत जलजीव पाहण्यास मिळतात. या साऱ्याची काळजीपूर्वक देखभालीचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरुन आणलेले मासे टँकमध्ये टाकण्यासाठी त्यांना वातावरणाशी समरस होण्यासाठी तसंच त्यांचं रोगनिदान, उपचार करण्यासाठी गोड्या व खाऱ्या पाण्याचं स्वतंत्र युनिट तयार करण्यात आलं आहे. प्रत्येक टँकमध्ये एलईडी व मेटलहॅलाइड ट्युब लावून प्रकाशयोजना करण्यात आली आहे, ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात. सोमवारी हे मत्स्यालय बंद राहणार असून अन्य दिवसांत या सागरी सफरीचा मनमुराद आनंद घेता येईल.

तारापोरवाला मत्स्यालय

तारापोरवाला मत्स्यालय हे मुंबईतील अतिशय जुने व प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिनांक 27 मे, 1951 रोजी तारापोरवाला मत्स्यालयाचे उद्घाटन झाले. श्री. व श्रीमती विकाजी डी.बी.तारापोरवाला या निसर्गप्रेमी दांपत्याने दोन लाख रुपये देणगी मत्स्यालयाच्या बांधकामासाठी दिली.
1951 मध्ये तारापोरवाला मत्स्यालय प्रेक्षकांना खुले करण्यांत आले, त्यावेळेस भारतातील हे एकमेव सार्वजनिक मत्स्यालय होते. या ठिकाणी प्रेक्षकांना एकाचवेळी समुद्रातील, गोड्यापाण्यातील तसेच उष्ण कटिबंधातील लहान शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळत असल्याने आजपावेतो तारापोरवाला मत्स्यालय हे भारतातील प्रेक्षणीय स्थळ ठरलेले आहे. प्रतिवर्षी 4 ते 5 लाख प्रेक्षक मत्स्यालयास भेट देतात. या मत्स्यालयाला आजपर्यंत देशविदेशातील व भारतातील महनीय व प्रसिद्ध व्यक्तींनी भेट दिल्या आहेत.
मत्स्यालयातील सागरी विभागातील 16 टाक्यांमध्ये स्थानिकरित्या मिळणारे लेपटी, किळीस, पाकट, हेकरु, तांब, खडकपालू, शेवंड, समुद्र साप, जेलीफिश इत्यादी 30 ते 50 प्रकारचे विविध मासे व जलजीव प्रेक्षकांना पहावयास मिळते. त्यासाठी मुंबईतील कुलाबा लाईट हाऊस, गिरगांव चौपाटी, वरळी चौपाटी, कफपरेड या क्षेत्रातील समुद्र किनारी वाणा, फरी पद्धतीची जाळी लावून मत्स्यालयातील मत्स्यालयपाल, क्षेत्रसमाहारक, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी हे स्थानिक कोळी बांधवांच्या सहकार्याने नियमितपणे मासे व जलजीव उपलब्ध करुन घेऊन ते मत्स्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येत असत. ही परंपरा आजही चालू आहे.
मत्स्यालयाच्या नुतनीकरणानंतर भारतातील पर्यटकांना आता स्थानिक माशांव्यतिरिक्त परदेशातून आयात केलेले जगभरातील दुर्मिळ विलोभनीय शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पूर्वीच्या टाक्या आता आकाराने मोठ्या करण्यात आल्या असून त्यांना फ्लेक्सी ग्लास प्रकारच्या काचा बसविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रंगीत आकर्षक मासे व इतर जलजीव अधिक सुस्पष्टपणे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. नवीन मत्स्यालयामध्ये प्रत्येक टाकीमध्ये खाऱ्या व गोडया पाण्यातील आकर्षक शोभिवंत मासे व जलजीवांच्या विविध प्रजाती, नैसर्गिक वातावरणानुरुप खडक, पान वनस्पती, इत्यादीसह आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केलेल्या पाहता येतील, तसेच त्यांची माहिती एल.सी.डी. स्क्रीनवर प्रदर्शित केलेली पाहता येईल. नुतनीकरणानंतरचे संपूर्ण मत्स्यालय वातानुकूलीत करण्यात आले असून प्रेक्षकांना थंड आणि सुखद वातावरणात मत्स्यालयाची जलसृष्टी पाहता येईल.
मत्स्यालयाच्या प्रवेशद्वाराशी अतिशय भव्य भुयारी मत्स्यालय ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्रेक्षकांना 180 अंशामध्ये खाऱ्या पाण्यातील मासे पाहण्याचा अनुभव घेता येईल. भुयारी मत्स्यालयातून आत आल्यानंतर डाव्याबाजूस नव्याने स्थापित करण्यात आलेल्या 50 आसनव्यवस्था असलेल्या वातानुकूलीत प्रेक्षागृहामध्ये मत्स्यालयातील मासे, मत्स्यव्यवसाय, सागरी मासेमारी, इत्यादीबाबत वैज्ञानिक तसेच उद्बोधक माहितीपट आता प्रेक्षकांना मत्स्यालयात पाहाता येतील. भुयारी मत्स्यालयाच्या समोरच कारंजा असून त्यानंतर भव्य मुख्य प्रदर्शनी हॉल आहे. ज्यामध्ये खाऱ्या व गोड्या पाण्यातील मासे, 110 मी.मी. जाड फ्लेक्सी ग्लास असलेल्या सिमेंटच्या भव्य टाक्यांमध्ये प्रेक्षकांना पहावयास मिळतील.
सागरी विभागामध्ये भारतातील तसेच परदेशातून आयात केलेले अतिशय दुर्मिळ डॅम्सेल, बटरफ्लाय, एंजल, ट्रिगर, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मुरीश, सी ॲनीमोन इत्यादी प्रजातींचे शोभिवंत मासे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच जेली फिशची एक आकर्षक टाकी ठेवण्यात आली आहे. हॉलमध्ये मधील भागात असलेल्या गोड्या पाण्याच्या विभागामध्ये देखील देश विदेशातील अरोवाना, बेडुक, सिक्लिड, पिरान्हा, कॅट फिश, रोहू, कटला, मृगळ इत्यादी प्रकारचे शोभिवंत मासे व जलजीव प्रेक्षकांना पहायला मिळतील. तसेच छोट्या प्रदर्शनी विभागात लहान टाक्यांमध्ये गोल्ड फीश, एंजल, गोरामी, बार्ब शार्क, फ्लॉवर हॉर्म, सिक्लिड, पॅरट, ट्रेटा, गप्पी, कोळंबी, डिरकस इत्यादी प्रजातींचे आकर्षक मासे पाहता येतील.
तारापोरवाला मत्स्यालय हे पाण्याखालील जलसृष्टी अनुभवता येईल असे भारतातील महत्वाचे पर्यटन स्थळ असून मनोरंजनाचे तसेच शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण असल्याने लहानांपासून वृद्धांपर्यत तसेच देशविदेशातील प्रेक्षकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.

टचपुल नविन आकर्षण


नुतनीकरण करण्यात आलेल्या तारापोरवाला मस्त्यालयात दोन ठिकाणी टचपुल ही व्यवस्था करण्यात आली आहे. खास करून बच्चे कंपनीसाठी ही सोय म्हणजे धम्मालच आहे. टचपुलमध्ये स्टारफिश सारख्या समुद्रजीवांचा समावेश असून या टाकीच्या वरचा भाग उघडा ठेवण्यात आला आहे. या उघड्या भागातून आतमध्ये हात घालून त्यातील जलचराला हात लावण्याची संधी मिळणार आहे. 

-अजय जाधव

 

माहिती स्रोत: महान्यूज, बुधवार, ०४ मार्च, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate