অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिरेबंदी नायगाव

चिरेबंदी नायगाव

वेशीवरच्या पाऊलखुणा : चिरेबंदी नायगाव

माणूस जेथे कुठे वस्ती करून राहतो, तेथे तो इतिहासाच्या बिया पेरत रहातो. त्या माणसांच्या कल्पनेतून, कलाकृतीतून,पराक्रमातून अन् कर्तृत्वातून तयार होणाऱ्या चिरेबंदी वास्तू कालांतराने पडतात,कोसळतात, पाडल्या जातात... पुन्हा नव्याने उभ्याही राहतात. पण, गेलेल्या काळाचा भूतकाळरूपी इतिहास मात्र कायम चिरेबंदी रहातो. असाच काहीसा चिरेबंदी इतिहास पुढे घेऊन जाणारे संस्थानिकांचे, पेशव्यांच्या सरदारांचे, ‌अहिल्याबाई होळकरांचे अन् स्वातंत्र्यवीर सावरकरांची सासूरवाडी म्हणून प्रसिद्ध असलेले नायगाव आजही आपला इतिहास सांगताना थकत नाही.

प्रत्येक गाव एका विशिष्ट सौंदर्यस्थळाने नटलेलं असतं. हे त्याचं वेगळेपणचं त्या गावच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपताना दिसतं. अहिल्याबाई होळकर यांच्या रूपाने नाशिकलाच नव्हे; तर उभ्या भारताला उत्तुंग अन्‌ महापराक्रमी व्यक्त‌िमत्त्व लाभलं. त्याच्या खाणाखुणा आजही त्र्यंबकेश्वरपासून गोदातीरावरील अनेक गावांमध्ये पहायला मिळतात. नाशिकच्या वैभवशाली इतिहासातील अहिल्याबाई होळकर हे सोनेरी पान आहे. त्यांची न्यायनीती,युद्धकौशल्य, प्रशासन व्यवस्था आजही मोहिनी घालते. १७६६ मध्ये मल्हारराव होळकरांचे निधन झाल्यानंतर राज्याची धुरा अहिल्याबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली व २८ वर्ष ती समर्थपणे चालवली. लोककल्याणकारी भूमिकेतून त्यांनी बांधलेले बारव, धर्मशाळा, अनेक घाट नाशिकमधील नायगावप्रमाणेच अनेक गावांची आजही शान आहेत. अहिल्याबाईंच्या अशाच कामगिरीची उदारता घाटाच्या माध्यमातून पहायची असेल तर गोदातटावर वसलेल्या नायगावची सफर करायलाच हवी. नायगावला नायगाव नाव कसे पडले याबाबतही असे म्हटले जाते की, या गावात न्यायदानाचे काम चालत असल्याने गावाला ‘न्यायगाव’ असे म्हटले जाऊ लागले व पुढे अपभ्रंशाने नायगाव म्हणून रूढ झाले. त्या वेळच्या ‘न्याय’गावाचा इतिहास हाती येत नसला तरी येथील प्रभावशाली माणसांचे कार्य परिस्थितीला न्याय देण्याचेच असल्याने न्यायगाव हे नावही सार्थ ठरते.

नायगावला जाण्यासाठी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील लाखलगावपासून हिंगणवेढे-कोटमगाव-जाखोरी-जोगलटेंभी ही गावे अनुभवत नायगावला जाता येते. असाच एक रस्ता पुणे–नाशिक महामार्गावरून सामणगाव अथवा शिंदे पळसेमार्गाने कोटमगावमार्गे जाखोरी-सोनगिरीतून नायगावला जातो. जोगलटेंभी मार्गे गेल्यास नायगावात मागील बाजूने प्रवेश करता येतो. गावात प्रवेश करण्यापूर्वी जुन्या नायगावकडे जाण्यासाठी डाव्या हाताने गोदावरीकडे निघाल्यावर थोड्याच अंतरावर अनेक वीरगळ स्वागताला उभ्या असल्याच्या पहायला मिळतात. एका वीरगळीवर घोड्यावर बसलेले दोघे अन् दुसरीवर विठ्ठलासारखे कमरेवर हात ठेऊन उभी असलेल्या प्रतिमा दगडावर कोरलेल्या दिसतात. एका शिळेवर नागोबा फणा काढून उभे असल्याचे पहायला मिळते. ही लोकदैवते असल्याचे लक्ष्मण खुरासणे सांगतात. तेथून दोन किलोमीटर वर गोदावरीचे पात्र लागते. पूर्वी नायगाव गोदापात्रालगत वसलेले होते. नंतर ते कोटात स्थलांतरीत झाले.

त्यामुळे नवा मारूती, जुना मारूती असे दोन मारूती गावात पहायला मिळतात. गोदापात्राजवळ गेल्यावर सुंदर घाट पहायला मिळतो अन् घाटावर महादेवाचे सुंदर मंदिर. मंदिरासमोर दगडी दीपमाळ अन् आजूबाजूला असंख्य समाधी पहायला मिळतात. एका झाडाखाली कोपऱ्या हनुमानाची दगडी मूर्ती अन् त्याच्या बाजूला भग्न अवस्थेतील अनेक शिवल‌िंग विखुरलेल्या अवस्थेत आहेत. हा घाट व मंदिर अहिल्याबाईंनी बांधल्याचे ग्रामस्थ लक्ष्मणराव सांगळे सांगतात. मंदिर वैभव पाहिल्यावर आपली नजर खिळते ती अहिल्याबाईंनी गोदातटावर बांधलेल्या घाटावर. नाशिकच्या घाटानंतर (आताच्या नव्हे; शंभरवर्ष पूर्वीच्या) सर्वात मोठा घाट कोणता असेल तर नायगावचा. नाशिकमध्ये आता नायगावपेक्षा मोठा घाट पहायला मिळत नाही. या घाटाच्या पायऱ्यावर अनेक देवतांच्या प्राचीन मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत.

खरतर या मूर्ती संकलित करून गावात सुसज्य असे संग्रहालय उभारले जाऊ शकते. मूर्ती भग्न का असेनात पण, हे मूर्ती वैभव गावाचा प्राचीन वारसा असल्याने तो जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. घाटाच्या पाटांवर नाजूक नक्षीकामही आहे. हा घाट गोदेच्या मध्यापर्यंत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. घाटाची स्थिती मनाला व्याकूळ करते. हा घाट परिसर आपले पाय तेथून काढू देत नाही. तेथेच समाधीसारखे विसावे, असे वाटायला लागते. शेकडो वर्षांचा इतिहास पुढे घेऊन जाणाऱ्या या घाटाचे संवर्धन होण्याची गरज आहे. पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष दिल्यास अन् नायगावकरांनी पाठपुरावा केल्यास हा घाट आणखी पाचशे वर्षे आपला गावचा वैभवशाली इतिहास पर्यटकांना सांगू शकतो. अहिल्याबाईंनीही हा विचार करून हा घाट येथे बांधला असेल, असेही वाटायला लागते.

घाटावरून पुन्हा गावात परतत असताना कपोता नदीकाठी भुमीज शैलीतील महादेवाचे मुक्तेश्वर मंदिर दिसते. या म‌ंदिराचा सभामंडप पडलेला आहे. घाटावर विखुरलेल्या मूर्ती येथीलच असाव्यात. मंदिराचा गाभारा व कळस तेवढा शिल्लक आहे. मंदिरावर झाडवेली वाढल्याने या मंदिराचे आयुष्यही कमी होऊ लागले आहे. मात्र मंदिर आजही आवर्जून पहावे असेच आहे. तेथून जवळच नदीपात्रात नागेश्वर मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे जहागिरदार माधवराव क्षीरसागर यांनी बांधली. त्यांना जनाबाई, मुक्ताबाई, नागूबाई अशा तीन मुली होत्या. त्यातील मुक्ताबाई व नागुबाई यांचा लग्नापूर्वीच साथीच्या आजाराने मृत्यू झाला. या दोन मुलींच्या स्मरणार्थ त्यांनी ही मंदिरे बांधल्याचे म्हटले जाते. मधली मुलगी जनाबाईचे लग्न त्यांनी सिन्नरच्या चौदाचौक वाड्याचे मालक रावबहादुर यांच्याशी केले. क्षीरसागर पेशव्यांचा राज्य कारभार चालविण्यासाठी कर्ज देत असत; मात्र ते जहागिरदार, संस्थानिक होते की, सावकार याबाबत फारशी माहिती मिळत नाही.

मात्र ज्या गावांमध्ये श्रीमंत सावकार अथवा संस्थानिक असतात त्या गावांमध्ये भक्कम कोट पहायला मिळतोच. असाच कोट नायगावातही आहे. मुक्तेश्वर मंदिरासमोरच्या कपोता नदीवरील लहानसा पूल ओलांडला की,समोर गावाभवतीच्या कोटाच्या मागील वेशीजवळ आपण पोहचतो. नायगावला दोन वेशी आहेत. दोन्ही दगडी बांधणीतील या वेशी व गावाभवतीचा कोट शके १६९६ (१७७४) मध्ये बांधल्याचा उल्लेख त्यावरील शिलालेखांत आहे. मात्र काळाच्या आघाताने शिलालेख पुसट झाल्याने तो कोणी बांधला व त्याबद्दलची इतर माहिती मिळत नाही. याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. गावातील कोटाला नऊ बुरूज होते अन् कोटावरून बैलगाडी जाईल इतका त्याचा विस्तार होता. त्यावर नेहमी कडक पहारा असे. आजही कोटाच्या दोन वेशी व कोटाच्या भिंतीचे तसेच क्षीरसागर व खरे वाड्याचे भग्न अवशेष पहायला मिळतात.

गावातून गोदावरी घाटापर्यंत भुयार असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. वाड्यांचा कोट अनुभवताना पूर्वेकडील कोटालगत माती व लाकडाने बांधलेले लक्ष्मीनारायण मंदिर पहायला मिळते. काष्टशिल्प व काळ्या पाषाणातील दुर्मिळ मूर्ती हे मंदिराचे वैशिष्ट आहे. तसेच गावातील दोन बारवही पाहण्यासारख्या आहेत. नायगावकरांना छत्रपती शिवाजी राजांचाही सहवास लाभला होता. सुरतेच्या दुसऱ्या लुटीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज नायगावला दोन दिवस मुक्कामी असल्याचे रामदास कदम सांगतात. नायगावात अनेक उत्सव साजरे केले जातात. पाडव्या दुसऱ्या दिवशी माळोबा बिरोबाची यात्रा होते. तर अंबिका मातेची यात्रा, शनी यात्रा वाडी विभागात मारूती यात्रा, दत्त मंदिरातील यात्रा गावात होतात. यात्रेदरम्यान वाजतगाजत मिरवणूक काढण्याची परंपराही आहे. पूर्वी बोहाडे व्हायचे; मात्र आता ते बंद झाले आहेत,असे पुरूषोत्तम फुलसुंदर व फकीरा जेजूरकर सांगतात.

नायगावची आणखी एक ओळख म्हणजे स्वातत्र्यंवीर सावरकर यांची नायगाव ही सासूरवाडी! जव्हार संस्थानचे राजे कृष्ण शहा यांचे तत्कालीन दिवाण रामचंद्र त्रिंबक ऊर्फ भाऊराव चिपळूणकर व लक्ष्मीबाई यांच्या ज्येष्ठ सुकन्या यशोदा (माई) चिपळूणकर (जन्म ४ डिसेंबर १८८८) यांचा वयाच्या १३ व्या वर्षी भगूरचे विनायक दामोदर सावरकर यांच्याशी नाशिक येथे विवाह झाला. शिक्षणामुळे लग्नाला नकार देणाऱ्या सावरकरांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी भाऊराव चिपळूणकरांनी उचलली होती. पुढे सावरकर स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. स्वातंत्र्यलढ्यात अप्रत्यक्षपणे भाऊरावही सक्रिय असल्याचे इंग्रजांच्या गळी पाडण्यात जव्हार संस्थानातील एका पारशी अधिकाऱ्याला यश आले अन् भाऊरावांना त्रास द्यायला सुरूवात केली. अखेर भाऊरावांना जव्हार संस्थान सोडावे लागले अन् भाऊराव चिपळूणकर नायगावला आले.

त्यांनी नायगावात मोठा वाडा बांधला व ते येथे राहू लागले. स्वातंत्र्यवीर सावरकर नायगावातील सासऱ्यांच्या वाड्यात काही काळ राहिल्याचेही ग्रामस्थ सांगतात. त्यामुळेच नायगावकरांना सावरकर नायगावचे जावई असल्याचा मोठा अभिमान आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव विष्णू चंद्रचूड हे देखील नायगावचेच. त्‍याचा जन्‍म १२ जुलै १९२० रोजी पुण्यात झाला असला तरी त्यांचे बालपण नायगाव येथे गेले आहे. १९७२ च्या दुष्काळात ते नायगावात ग्रामस्थांच्या भेटीसाठी आल्याची आठवण ग्रामस्थ सांगतात. यशवंतराव चंद्रचूड यांची १९६१ मध्‍ये मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्‍यायाधीशपदी निवड झाली. १९७८ मध्ये त्‍यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली. ८८ व्या वर्षी म्हणजेच १४ जुलै २००८ रोज त्यांचे मुंबईत निधन झाले. भारताचे सरन्यायाधीश म्हणून आतापर्यंत सर्वांधीक कार्यकाळ म्हणजे ७ वर्ष चार महिन्यांची सेवा देणारे ते एकमेव सरन्यायाधीश आहेत. ते कठोर निर्णय क्षमतेचे सरन्यायाधीश असल्याने त्यांना पोलादी हातांचा माणूस म्हणूनही ओळखले जायचे.

अहिल्याबाईंचा घाटरूपी वारसा, दोन नद्यांचा सहवास, प्राचीन मंदिरे, माणसांनी घडविलेला इतिहास, प्रथा, परंपरा, नायगावचे समुद्ध सार्वजनिक वाचनालय व भरभरून बोलणारी प्रेमळ माणसं हा नायगावचा वारसा जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज मात्र आहे.

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate