অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तीन मारूतींचा बेलगाव ढगा!

तीन मारूतींचा बेलगाव ढगा!

वेशीवरच्या पाऊलखुणा : तीन मारूतींचा बेलगाव ढगा!

जगण्यासाठी माणूस जसा प्रदेश बदलतो, तसेच एखादे गावदेखील काळाची गरज म्हणून आपली जागा बदलते, स्थिरावण्याचा प्रयत्न करते अन् आपल्यासोबत घेऊन आलेल्या माणसांना उभे रहायला शिकविते. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेलगाव ढगा हे असेच गाव आहे. हेमाडपंती मंदिराच्या अवशेषांना सोबत घेत अख्यायिकांनी भरलेले अन्‌ पेशवाईच्या जहागिरीचे तीन मारूतींचे गाव नंदिनीचे उगमस्थान म्हणूनही ओळखले जाते. बेलगाव ढगा फक्त निसर्गरम्यच नाही, तर ऐतिहासिक व अनोखेही आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्याला संस्कृती हॉटेलपूर्वी डाव्या बाजूचा एक फाटा आपल्याला बेलगाव ढगा या गावात घेऊन जातो. त्र्यंबकरस्ता सोडून गावाच्या दिशेने निघाले की, एक हिरवीगार डोंगर रांग आपल्या स्वागताला सज्ज दिसते. डोंगराला भिडण्याआधी गावाच्या तोंडावरच्या मारूती मंदिरासमोर ठेवलेले दगडाचे दोन तुटलेले खांब आपल्याला थबकायला लावतात अन् येथून सुरू होतो बेलगाव ढग्याचा प्रवास. हे खांब प्राचीन मंदिराचे असल्याने बेलगाव ढगा हे गाव प्राचीन अन् ऐतिहासिक गाव असेल हे लक्षात येते. अर्थात नदीच्या संस्कृतीशी जोडले गेल्याने गावचे महत्त्व त्या अर्थानेही मोठे आहे. बेळगाव ढगा येथे संतुषा (संतोषी, संतोषा या नावानेही या डोंगराला ओळखले जाते. याच संतोषा डोंगरावर दैत्याची पाऊले उमटल्याचे सांगितले जाते.) डोंगराच्या पायथ्याशी नंदिनीचा उगम ही बेलगाव ढग्याच्या संस्कृतीची नांदी ठरली आहे. बेलगावातून निघालेली नंदिनी थेट टाकळी येथे गोदेला मिळते. नंदिनी ही गोदावरीची उपनदी आहे. परंतु, वाढत्या नागरिकरणाचा फटका या नदीला बसल्याने नंदिनी शहरात दाखल होताच नासर्डी नाला म्हणून ओळखली जाते.

बेलगाव ढगा हे नाव गावाला कसे पडले याबाबतही गावातील ज्येष्ठ अनेक अख्यायिका सांगतात. त्र्यंबकेश्वरला जाण्यापूर्वी भाविक बेल नेण्यासाठी डोंगरांच्या कुशीत अन् ढगांच्या गर्दीत वसलेल्या बेलाची खूप झाडे असलेल्या गावात येत. त्यामुळे बेलाच्या झाडांचे गाव म्हणून बेलगाव अन् ढगांच्या गर्दीतील गाव म्हणून गावाला बेलगाव ढगा असे नाव पडले, अशी अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे गावा ते राहणाऱ्यांना ढगा वरून ढगांच्या गावात राहणारे ढगे असे नाव पडले, असेही दत्तू ढगे यांनी सांगितले. मात्र, पेशवाईत या गावाला फक्त बेलगाव असेच म्हणण्यात आले आहे. त्यामुळे ढगे आडनावाचे लोक येथे जास्त प्रमाणात राहत असल्यानेही ढग्यांचे बेलगाव म्हणून बेलगाव ढगा असे नाव पडले असावे. बेलगाव ढगा येथे दाखल झाल्यावर एक गंमतीशीर प्रकार लक्षात येतो तो म्हणजे या गावाला तीन मारूती आहेत. महिरावणीत अहिरावणीचा मारूती आणून ठेवल्याने या गावात जसे दोन मारूती आहेत तसेच.

बेलगाव ढग्यात प्रवेश केल्यावर सध्याच्या गावातील जे मारूती मंदिर लागते ते तिसरे मारूती मंदिर आहे. गावातून दक्षिणेला काही अंतर आत गेल्यावर पुन्हा बेलगाव ढगा हेच गाव लागते. येथून स्थलांतरीत होऊन सध्याचे गाव वसले आहे. मात्र येथेही लोकवस्ती अन् येथे दुसऱ्या क्रमांकाचे मारूती मंदिर आहे. हे गाव पेशवाईत वसले असावे. पेशवाईतील या गावातून पूर्वेला काही अंतर गेल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. मधोमध एका पाटीवर डावीकडे त्र्यंबकेश्वर रस्ता तर उजवीकडे अंबड, चुंचाळे रस्ता असा बाण दाखविण्यात आला आहे. डाव्याहाताच्या त्र्यंबक रस्त्याने काही अंतर गेल्याने नव्याने झालेल्या महावितरण सब स्टेशनमागे मूळचे बेलगाव ढगा गाव होते. हे गाव आता तेथे नाही; मात्र मूळच्या बेलगाव ढग्यातील मारूती मंदिर (पहिल्या क्रमांकाचे) व हेमाडपंती मंदिराचे अवशेष, प्राचीन पिंड, मंदिराचे अवशेष व काही मूर्ती येथे विखुरलेल्या दिसतात. येथील मूळ बेलगाव ढगा गावच्या पुरातन अवशेषावरून आजही नजरेसमोर उभे राहते. हे गाव येथून का विस्थापित झाले याबाबतही एक अख्यायिका सांगितली जाते.

नाशिकचा इतिहास पेशवाईच्या इतिहासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बेलगाव ढग्याला नावाची जशी अख्यायिका आहे, तसेच बेलगावचा उल्लेख पेशवे माधवरावांच्या दप्तरातही मिळतो. पेशवाईच्या राजकीय घडामोडीत पुणे शहराचे महत्त्व तत्कालीन राजधानी म्हणून जेवढे होते तसेच नाशिकचेही महत्त्व होते. त्यामुळे हा इतिहासही रंजक आहे. सन १७६१ च्या सुमारास चौथे पेशवे माधवराव यांच्या कारकीर्दीत नाशिकच्या विकासाची गती वाढलेली दिसते. श्रीमंत माधवरावांनी रास्ते मामांचे बरेचसे वाडे बेचिराख केले. त्यामुळे गोपिकाबाई रागावल्या. संतापून पुणे सोडून त्या नाशिकला आल्या आणि प्रारंभी पंचवटीतील रास्ते या बंधूंच्या घरात मुक्कामी राहिल्या. सन १७६४ च्या सुमारास गोपिकाबाईंना राहण्यासाठी पेशव्यांनी १८ हजार रुपये खर्चून गंगापूर येथे वाडा बांधून दिला अन् तेव्हाच नाशिक येथे प्रथमच टांकसाळ सुरू केली.

गोपिकाबाईंच्या खर्चासाठी पेशव्यांनी गंगापूर व बेलगाव या गावांची जहागिरी त्यांना दिली. दरम्यान, बेलगाव ढग्याला पेंढाऱ्यांपासून त्रास होत असल्याने गाव मूळ ठिकाणाहून दुसरीकडे विस्थापित झाले. पेंढाऱ्यांचा त्रासाला वैतागून जहागिरीचे बेलगाव ढगा नव्या जागेत वसले. यावेळी आहिल्याबाई होळकरांनी नव्याने वसलेल्या गावात विटाची बारव बांधून दिली. ही बारव आजही चांगल्या स्थितीत असून, पाण्याने तुडूंब भरलेली आहे. नाशिकमधील अहिल्याबाईंच्या काळातील खूप कमी बारवांचा आजही उपयोग होतो. सर्वच बारवा आजही सेवा देण्यास सज्ज आहेत मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसल्यासारखी स्थिती आहे. मात्र बेलगावात आजही या बारवेचे पाणी वापरले जाते.

मूळ जागेतून दुसऱ्या ठिकाणी वसलेल्या बाराबलुतेदारी गावाने नव्या गावात नव्याने मारूती मंदिर व मूर्ती उभारली, पण मूळ मारूती मंदिरातील मूर्ती तेथेच ठेवत तेथील काही कोरीव दगड येथे आणले. हे दगड आजही पहायला मिळतात. मारूती मंदिराच्या शेजारी देवीचे मंदिरही आहे. मारूती मंदिरासमोर अहिल्याबाईनी बांधलेली सुंदर बारवही आहे. येथूनही गाव सध्याच्या बेलगाव ढग्यात वसले. या घटनेला शंभर वर्षे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. याबाबतही एक अख्यायिका सांगितली जाते. असे म्हटले जाते की, या बारवेतील पाण्याचा ग्रामस्थांना त्रास होऊ लागला, लोकांचे पोट फुगू लागले. यामुळे मराठा व आदिवासी समाज येथून सध्याच्या गावात वसला. दुसऱ्या ठिकाणी वसलेल्या गावातील इतर विहिरींना चांगले पाणी असल्याने इतर समाज तेथेच राहिला. येथील लाकडी बांधणीची जुनी घरे आजही पाहण्यासारखी आहेत.

राजवाड्यातील कडूनिंब अन् येथील दुसरे मारूती मंदिर आजही त्या उलथापालथीचा साक्षीदार आहेत. नव्या म्हणजे सध्याच्या ठिकाणी वसलेल्या बेलगाव ढग्यातही तिसरे मारूती मंदिर अन् मूळच्या मंदिराचे दगड या म‌ंदिराबाहेर पहायला मिळतात. बेलगाव ढग्यात बोहाड्यांची परंपराही कालांतराने बंद पडली असली तरी हरिनाम सप्ताहाची शंभर वर्षांची परंपरा आजही कायम आहे. संतोषा अन् बागड्या या डोंगर रांगेमुळे बेलगाव ढगा आवर्जून पहावे असे वाटते. ऐतिहासिक पाऊलखुणांचे साक्षीदार असलेल्या या गावाने मागील काही वर्षांत प्रगतीशील गाव अशीही ओळख निर्माण केली आहे. इथले तरूण शेतकरी आधुनिक साधनांचा वापर करीत शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यामुळेच द्राक्षे आणि भाजीपाल्याचे कोठार म्हणूनही गाव ओळखले जाते.

बेलगावातून बाहेर पडताना डाव्या हाताला तळेगावकडे जाणारा रस्ता लागतो. बेलगाव ढगा ते तळेगाव हा रस्ता म्हणजे हिरवाईचा नयनरम्य प्रवास ठरतो. गावात दोन हेमाडपंती मंदिरे होती; मात्र ती आता नाहीत. काही मूर्ती अन् जुनी घरे पहायला‌ मिळतात. मात्र बेलगाव ढगा या गावाचा प्रवास माणसाच्या सतत उभारी घेण्याच्या उमेदीवर प्रकाश टाकत राहतो.

 

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate