অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नांदेड जिल्हा - पर्यटन

नांदेड जिल्हा - पर्यटन


नांदेड.. मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळे असलेल्या नांदेडला प्राचीन इतिहास लाभला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेले नांदेड शहर म्हणजे रामायण काळातले नंदीग्राम असल्याचे सांगितले जाते. नंद साम्राज्याची गोदातीरावरची उपराजधानी नवनंदडेहरा म्हणजेच आजचे नांदेड होय. वैदर्भीय वाकाटकांच्या वाशिम ताम्रपटात नांदेडला नंदीतट असेही म्हटले आहे.नांदेड दर्शन
नांदेड जिल्हा रेल्वे, रस्ते मार्गाने जोडला गेला आहे. नांदेड येथे अद्ययावत व सर्व सोयींनी युक्त असे श्री गुरू गोबिंद सिंगजी विमानतळही आहे. याठिकाणाहून पुनश्च: लवकरच विमानसेवाही सुरु होणार आहे. त्यामुळे येथून मुंबई, नागपूर आणि दिल्लीसाठी हवाई प्रवासाची सुविधाही सुरू होईल, अशी आशा आहे. रेल्वेद्वारे नांदेड, हैदराबाद, तिरुपती, बंगळुरू, दिल्ली, अमृतसर, मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांशी जोडले गेले आहे. नांदेड जिल्हा रस्त्यांद्वारे राज्यातील इतर शहरांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांशी जोडला गेला आहे.
नांदेडला पर्यटनासाठी येताना पहिल्या दिवशी नांदेड परिसरातील प्रमुख गुरुद्वारांना भेट देऊन सायंकाळी काळेश्वर मंदिर परिसरातील शंकरसागर जलाशयाच्या निसर्गरम्य परिसराला भेट देता येते. सायंकाळी सहाच्या सुमारास श्री हजुरसाहिब सचखंड गुरुद्वारा येथे मुख्य प्रार्थनेनंतर श्री गुरु गोबिंद सिंग यांची शस्त्रे भाविकांना दाखविली जातात. गुरुद्वाराला लागूनच असलेल्या गोबिंदबाग येथे 7.30 वाजता अप्रतिम ध्वनी-प्रकाश योजनेद्वारे (लेजर शो) शीख धर्माचा इतिहास अर्ध्या तासात प्रस्तुत केला जातो.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघाल्यास माहूरला (130 किमी) निवांतपणे शांततेत श्री रेणुकादेवीचे दर्शन घेता येते. तसेच साधारण तीन तासात लेणी, किल्ला, दत्तशिखर, अनसुया मंदिर आदी स्थानांना भेट देता येते. येथूनच दुपारी उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे व त्यानंतर (पावसाळा असल्यास) सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी रूप अनुभवता येते. रात्री नांदेडला मुक्काम सोईचा ठरतो.
माहूर अथवा किनवटला मुक्काम केल्यास इतिहासप्रेमींना केदारगुडा आणि शिऊरच्या लेण्यांना भेट देणे शक्य होते. तिसऱ्या दिवशी सकाळी कंधार किल्ला आणि प्रसिद्ध दर्गाला भेट देता येते. त्यानंतर बिलोली येथील मशिदीस भेट देऊन सायंकाळी होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरातील अप्रतिम शिल्पकला पाहता येते.  श्री गुरु गोबिंद सिंग यांचे नांदेडमधील पावन वास्तव्य श्री गुरू गोबिंद सिंगांचे जीवन विविधता आणि विशालतेने भरलेले आहे. देशाच्या विविध भागांशी त्यांचा शीख धर्माच्या प्रसाराच्या निमित्ताने संबंध आला. त्यांचा जन्म पाटण्याचा, कार्यक्षेत्र उत्तर पूर्वेकडे व महापरिनिर्वाण दक्षिणेत झाले. जीवनाच्या अंतिम क्षणी ते नांदेड (श्री हजुरसाहिब) येथे वास्तव्यास होते. श्री गुरू गोबिंद सिंग हे राजस्थान, दिल्ली, आग्रा, मथुरा, उज्जैन, वृंदावन, बऱ्हाणपूर, बाळापूर, अकोला, बडनेरा, अमरावती, हिंगोली, वसमतनगरमार्गे ते दक्षिणेत नांदेडला आले.
नांदेडला त्यांचा पहिला मुक्काम ब्राह्मणवाडा भागात होता. तेच ठिकाण गुरुद्वारा हीरा घाट साहिबजी तर त्यांची तपोभूमी तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगरसाहिब म्हणून ओळखली जाते. श्री गुरू गोबिंद सिंग हे शिखांचे दहावे गुरू होते. संवत 1765 कार्तिक शुद्ध द्वितीयेला गुरुपद पवित्र श्री गुरुग्रंथसाहिबला सोपवून त्यांनी देहधारी गुरु परंपरा संपुष्टात आणली. 7 ऑक्टोबर 1708 रोजी त्यांनी नांदेड येथेच देह ठेवला. या परलोक गमनाला 2008 मध्ये 300 वर्षे पूर्ण झाली.
तख्त सचखंड श्री हजुर साहिब यांच्याकडून वर्षभर तिथी आणि धार्मिक औचित्याप्रमाणे विविध सण, उत्सव उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये बैसाखी महल्ला, दशहरा महल्ला, दिवाली महल्ला, होला महल्ला, महल्ला गुरियाई, महल्ला गुरुपर्व- 1970 पासून गुरु-त्ता-गद्दी उत्सव तख्त सचखंडमार्फत साजरा केला जातो. संध्याकाळी नगर कीर्तनाचे आयोजन केले जाते. या उत्सवांबरोबरच श्री गुरुनानकदेव व श्री गुरुगोबिंद सिंग जन्मोत्सव व 10 वी ज्योती ज्योत पातशाहीचे (कार्तिक शुद्ध पंचमी) उत्सवदेखील उत्साहाने साजरे केले जातात. गुरुद्वारा संगतसाहिब, गुरुद्वारा शिकार घाटसाहिब, गुरुद्वारा मातासाहिब, गुरुद्वारा हिरा घाटसाहिब, गुरुद्वारा नगिना घाटसाहिब, गुरुद्वारा बंदाघाटसाहिब यांचा समावेश आहे.

श्रीक्षेत्र माहूरगड

नांदेडपासून 130 कि. मी. अंतरावर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहूरगड. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी माहूरचे श्री रेणुकादेवीचे स्थान पूर्ण पीठ मानले जाते. समुद्र सपाटीपासून 2600 फूट उंचीवर असलेल्या दोन शिखरांच्या टोकावर श्री दत्तात्रय आणि रेणुकादेवीचे स्थान आहे. गडाच्या परिसरात माता अनसुया आणि परशुरामाचे मंदिर आहे. माहूर ही गोंडांच्या आदिवासी राज्याची राजधानी होती. पुराणकाळातील परशुरामाच्या कथा या भागात प्रचलित आहेत. ऋषीमुनींची तपोभूमी म्हणूनही माहूरचे प्राचीन काळापासून महत्त्व आहे. देवीच्या मानसपूजा, भोजीपूजा आणि अलंकारपूजा अशा तीन पुजा आहेत. या पुजेनंतर पानाचा विडा 'तांबुल प्रसाद' म्हणून देवीला अर्पण केला जातो. माहूरला मूळ पीठ म्हटले जाते.

माहूर किल्ला

माहूर गावापासून दक्षिणेस उंच अशा दोन टेकड्यांवर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

12 व्या शतकात देवगिरीचे राजा रामदेव यांनी माहूरचा किल्ला जिंकून घेतला. नांदेड व उमरखेड मार्गे किल्ल्याकडे जाता येते. या किल्ल्यास राजगड असेही म्हणतात. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दक्षिण दरवाजा, उत्तरेकडील मुख्य दरवाजा व रेणुकादेवीकडील महाकाली बुरुज येथून जाण्यासाठी रस्ते आहेत. किल्ल्यात हत्ती दरवाजा, बारुदखाना, महाकाली बुरुज, धनबुरुज (दलबुरुज) यासह अनेक बुरुज आजही जसेच्या तसे आहेत. माहूर किल्ला हा गिरीदुर्ग आहे. किल्ल्याच्या स्थापत्यशैलीवरून या किल्ल्याचा विकास बहामनी व मोगलांच्या काळात झाला असावा.

माहूरची पांडवलेणी

माहूरच्या जुन्या बसस्टँडजवळ असलेल्या टेकडीच्या एका भागात लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. एक प्रचंड सभागृह आणि त्यात गाभारा कोरण्यात आला आहे. ही लेणी राष्ट्रकूटकालीन असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असंख्य खांबांचे हे सभागृह मोठे आकर्षक आहे. खांबांची आणि एकूण रचनेची भव्यता नजरेत भरते. 15 मीटर उंचीचे हे सभागृह असल्याने व सभागृहाची लांबी रुंदी खूपच असल्याने सभागृह वैशिष्ट्यपूर्ण ठरते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेतात. अजिंठा-वेरूळची आठवण यावी एवढी भव्यता याही शिल्पात आहे. गाभाऱ्यात भव्य शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. ही लेणी पांडवलेणी म्हणून संबोधिली जातात.

कंधारचे ऐतिहासिक वैभव

नांदेडचे ऐतिहासिक पर्यटन म्हगणजे हजार-बाराशे वर्षांपूर्वीच्याआ शिल्प स्थागपत्यय अवशेषांचे दुर्मिळ दर्शन. राष्ट्र कुट कलाशैलीचे असंख्यच अवशेष राष्ट्राकुटाच्याा उपराजधानीत म्हलणजे कंधार येथे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यामध्ये कंधारचा किल्ला सर्वात मोठा आहे. किल्ल्याचा विस्तार सुमारे 24 एकराचा आहे. या जागेभोवती प्रचंड कोट बांधलेला आहे. संपूर्ण किल्ल्याभोवती 18 फूट रुंद व 100 फूट लांबीचा खंदक आहे. या खंदकास लागून असलेली किल्ल्याची भिंत 120 फूट उंचीची आहे. किल्ल्यास सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे. इसवी सनाच्या 10 व्या शतकातले प्राचीन कंधारपूर, प्राचीन कला अवशेष आणि शांती घाटावरील तत्कालीन शिलालेख यामुळे महाराष्ट्राच्या प्राच्य परंपरेची आठवण करून देते.

शांतीघाटावरील शिल्पवैभव

प्राच्य कंधारपुरातील शिल्पाविष्कार पाहायचा तो इथल्या अप्रतिम मूर्तिशिल्पातून. शहरभर विखरून पडलेला हा प्राच्य शिल्पसंभार शांती घाटावरील एका इमारतीत संग्रहित करून ठेवला आहे. या शिल्पसंग्रहातील सहस्र कोटी स्तंभ, सप्त मातृकांची प्रचंड मूर्तिशिल्पे, लज्जागौरी लक्षणीय आहेत. याच संग्रहात 10 व्या शतकातला शिलालेखही पाहायला मिळतो. बौद्ध विहारातील सिद्धार्थ गौतम बुद्धांची मूर्ती ही नांदेड परिसरातील प्राचीनतम अवशेषांपैकी एक महत्त्वाचा वारसा आहे. शहरामधील जैन शिल्पावशेषही लक्षवेधी आहेत.

कंधारचा दर्गाह

मध्ययुगीन अवशेषांमध्ये सुफी संत हाजी सरवर महदूम सैय्या यांचा दर्गा, मध्ययुगीन वास्तु परंपरा जोपासून आहे. मध्ययुगीन कंधारलाच एक मदरसाही होता. सुफी संतांपैकी हजरत शेख अली ही बडी हस्ती कंधारला वास्तव्यात होती. त्यांची याद जागवीत सांगडे सुलतनाचा दर्गा उभा आहे. इसवी सन 1348 च्या दरम्यान सैइदुद्दीन रफाई उर्फ हाजी सरवर मकदूम सैय्या या नावाचे अवलिया कंधारला आले. त्यांचा इंतखाल कंधारलाच झाला. त्यांचा दर्गा हाजी सैय्या दर्गा म्हणून आज प्रसिद्ध आहे. येथील उरूसही हिंदू-मुस्लिम भाविकांचे एक आकर्षण राहिला आहे. शेवटी- कंधारला भेट देताना इथल्या डोंगराळ भागातील प्रसिद्ध असलेल्या सिताफळाची चव चाखता येते. शिवाय बारुळ प्रकल्पाच्या गोड्या पाण्यातील कोळंबीदेखील प्रसिद्ध आहे. बाचोटीच्या आंब्याची चव वेगळीच असते.

महाविहार बावरीनगर

अडीच हजार वर्षांपूर्वी गोदातटीच्या निबीड अरण्यात अश्मक आणि मुलक जनपदे अस्तित्त्वात होती. अश्मक जनपद नांदेड परिसरात बोधन याठिकाणी होते. या जनपदातील एक जिज्ञासू सिद्धार्थ गौतम बुद्धांची ख्याती ऐकून गोदातटावरून त्याकाळी कपीलवस्तूला प्रयाण करता झाला. गौतम बुद्धांच्या तत्वचिंतनाने तो भारावला आणि बुद्धचरणी लीन झाला. त्याने बौद्धधर्म स्वीकारला. त्याची ही स्मृती लोकपरंपरेने बावरीजातक कथेच्या स्वरुपात जोपासली आहे. या लोकस्मृतीचे पुनर्जीवन बावरीनगर महाविहाराच्या रुपाने नांदेडपासून 10 किलोमीटरवरील दाभड येथे झाले. या परिसराचा विकास शासनामार्फत करण्यात येत आहे.

होट्टल

राष्ट्रकुटांचा कलाविष्कार जसा कंधारला पाहायला मिळतो. तसा चालुक्य शिल्पशैलीचा वारसा देगलूर तालुक्यातील होट्टल या चालुक्यनगरीने जोपासलेला आढळतो. इसवी सनाच्या 11 व्या शतकात कल्याणीच्या चालुक्यांचा प्रभाव नांदेड परिसरावर होता. पोट्टलनगरी म्हणजे आजचे होट्टल हे गाव. त्यांच्या राज्यातले महत्त्वाचे ठाणे. सिद्धेश्वर मंदिर गावाच्या पश्चिमेला असून मंदिराची रचना ताराकृती आहे. समोर मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूस अर्ध मंडप आहे. मधोमध कलात्मक सभामंडप आहे. तसेच अंतराळ आणि गर्भगृह अशा अन्य रचना आहेत. येथील नंदीमंडपात असलेल्या शिलालेखावरून या मंदिराची रचना वन्ही कुळातील राजाच्या सहकार्याने केल्याचे लक्षात येते.हा शिलालेख सहाव्या विक्रमादित्याच्या काळातील आहे. शिलालेखाच्या माध्यमातून त्या काळातील ऐतिहासिक संदर्भ कळतात. इथे तीनशे वर्षांतले म्हणजे 11 व्या व 12 व्या आणि तेराव्या शतकातले चार शिलालेख सापडले आहेत. होट्टल आणि परिसरात आजपासून हजार, आठशे वर्षांपूर्वीचे संस्कृत भाषेतले आणि कन्नड व मराठी लिपीत कोरले गेलेले आहेत. नांदेड जिल्ह्यात चालुक्यकालीन 40 शिलालेख आहेत. एकूण शिलालेखांपैकी चार शिलालेख होट्टल येथे पाहायला मिळतात.

सहस्रकुंड धबधबा

हिमायतनगर तालुका ओलांडून किनवट तालुक्यात प्रवेश केल्यावर इस्लामपूरपासून अवघ्या चार किमी अंतरावर सहस्रकुंड धबधबा आहे. नांदेडहून रेल्वेमार्गानेदेखील येण्याची सुविधा आहे. पैनगंगा नदीवरील हा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. प्राचीन आख्यायिकेनुसार याठिकाणास प्रभू परशुरामाचा पदस्पर्श झाल्याचे मानले जाते. 20 मीटर उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहून 'नांदेडचा नायगरा' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून दिसणारे सहस्रकुंड धबधब्याचे सौंदर्य वेगळे तेवढेच मोहक असते. दोन मोठ्या धारांच्या मधला काळाशार खडक या सौंदर्यात भर घालतो. किनवटकडे जाताना रस्त्यात पिवळी, जांभळी, तांबडी, लाल फुले आणि हरणांचे कळप पाहण्याची मजा काही औरच असते. जुलै ते ऑक्टोबर हा सहस्रकुंडला भेट देण्यासाठी आदर्श कालावधी आहे. विशेषत: पडत्या पावसात याठिकाणी अनोखे सृष्टीसौंदर्य अनुभवायला मिळते.

निसर्गरम्य काळेश्वर

श्रीक्षेत्र काळेश्वर हे नांदेड शहराला लागून असलेले शांत निवांत तीर्थक्षेत्र आहे.

नांदेड-लातूर रस्त्यावर शहरापासून सात किलोमीटरवर काळेश्वर आहे. मंदिर अत्यंत प्राचीन आहे. मंदिर उभारणीचे संदर्भ मध्ययुगातील असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर यादवकालीन कलेचा नमुना आहे. मूळ मंदिर 13 व्या शतकातील असून 20 व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराला लागूनच गोदावरी नदीवर उभारलेला आणि विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प आहे. कै. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रकल्पाच्या जलाशयाला शंकर सागर जलाशय म्हणून ओळखले जाते. या अथांग जलाशयात सायंकाळच्या वेळी नौकाविहाराचा मनमुराद आनंद लुटता येतो.

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा

श्री खंडोबा रायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव एक आहे. मराठवाड्याची ही सर्वात मोठी ग्रामदेवता आहे. नांदेड-लातूर मार्गावर माळावर वसलेल्या या गावात प्रवेश करताच खंडोबाच्या मंदिराच्या परिसरातील भव्य कमान नजरेस पडते. कमानीच्या उजव्या हातास मंदिराची इमारत आहे. मंदिराचे बांधकाम 17 व्या शतकातील आहे. माळेगावची यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष (कृ.) महिन्याच्या 14 व्या दिवशी भरविली जाते. माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान कलामहोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात येत असतात. ही यात्रा उत्कृष्ट प्रतीच्या पशुधनाच्या व्यापारासाठी देशात प्रसिद्ध आहे. नांदेडचे स्थानिक लाल कंधारी वळूदेखील येथील पशुप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असते. येथील घोड्यांचा व्यापार विशेष प्रसिद्ध आहे.

शिऊरच्या लेण्या

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात पैनगंगेच्या काठी, नांदेडच्या उत्तरेला साधारण 70 कि.मी. अंतरावर शिऊर नावाचे एक लहानसे खेडेगाव आहे. या गावाच्या नैऋत्येला एक लहानसा डोंगर असून गावाकडील डोंगरउतरणीचा भाग कोरून तीन लेण्यांचा एक समूह येथे कोरण्यात आला आहे. एका टेकडीच्या कुशीत 100 फुटात तीन लेण्या कोरण्यात आल्या. लेण्यांमधील पुतनावधाचे शिल्प व महिषासुरमर्दिनीचे शिल्प तसेच गर्भगृहाची रचना लेणी निर्मितीचे टप्पे दर्शविणारी आहे. भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाच्या अभ्यासासाठी या लेण्यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.

नांदेडचा नंदगिरी किल्ला

गोदावरीच्या काठावर नांदेडला नंदागिरी नावाचा एक किल्ला आहे. किल्ल्याची नदीच्या पात्राकडील तटबंदी लक्षात येण्याइतपत कायम आहे. या किल्ल्याचा विस्तार खूपच मोठा होता. किल्ल्याभोवतीच्या तटबंदीच्या चार भिंतींचे अवशेष आजही आढळतात. नंदगिरी ही सातवाहनांची पहिली राजधानी असल्याने या किल्ल्याला नंदगिरीचा किल्ला म्हटले जाते. नंदगिरीहून सातवाहन नृपती प्रतिष्ठानकडे (पैठण) वळले.

बिलोलीची मशीद

औरंगजेबाच्या काळातील एक मशीद बिलोली येथे आहे. औरंगजेबाच्या सैन्यातील अधिकारी हजरत नबाब सरफराजखान याचा दर्गा या मशिदीत बांधला गेला. ही वास्तू पूर्णपणे दगडी बांधणीची असून चारमिनार व घुमट विशेष लक्षणीय आहेत. या मिनारावर साखळीच्या आकाराचे शिल्पकाम आढळते. या मशिदीच्याजवळ एका कोपऱ्यात चौकोनी आकारातील कुंड बारव आहे.

उनकेश्वर

उनकेश्वरला माहूर अथवा किनवटमार्गे बसने जाता येते. सागाच्या दाट वनातून होणारा हा प्रवास ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अधिक आल्हाददायक असतो. किनवट तालुक्यातील उनकेश्वर तथा उनकदेव येथे रामचंद्र यादवाच्या काळातला शिलालेख आहे. इ.स.1280-81 सालातील हा शिलालेख म्हणजे नांदेड परिसरातील शेवटचा यादवकालीन शिलालेख आहे. या ठिकाणचे देऊळ बांधल्याचा संदर्भ या शिलालेखात आहे. उनकेश्वरला वेगळेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

येथील गरम पाण्याचे कुंड प्रसिद्ध आहे

मुखेडची ऐतिहासिक बारव

नांदेडपासून 85 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुखेड शहरात राष्ट्रकुट चालुक्यकालीन स्थापत्याचे नमुने पाहायला मिळतात. येथील दशरथेश्वर मंदिर आणि नागनाथ मंदिरात उत्कृष्ट शिल्पकला पाहायला मिळते. सुंदर अशा बारवसाठी मुखेड प्रसिद्ध आहे. 10व्या आणि 11व्या शतकातील मंदिरे तीर्थकुंडाशेजारी स्थापित झालेली दिसतात. या तीर्थकुंडांना बारव म्हटले जाते. मुखेडमध्ये अशाच स्वरूपाचे बारव दशरथेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस आहे.

शंखतीर्थ

नांदेडपासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शंखतीर्थ गाव गोदावरीच्या तटावर वसलेले आहे. विशिष्ट प्रकारचे शंख याठिकाणी आढळतात. गोदावरीचे नाभिस्थान हेच असल्याचे सांगितले जाते. चालुक्यकालीन स्थापत्यकलेचा सुंदर नमुना असलेले नरसिंहाचे मंदिर येथे आहे. मंदिराजवळच आमदुरा उच्च पातळी बंधाऱ्यांची निर्मिती होत असल्याने बंधाऱ्याच्या जलाशयामुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.या पर्यटन स्थळांखेरीज केदारगुडा येथील निसर्गरम्य परिसरातील हेमाडपंथी मंदिर, राहेर येथील यादवकालीन नृसिंह मंदिर, नांदेडमधील मध्यकालीन बडी दर्गा आदी स्थळेदेखील ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून परिचीत आहेत. पर्यटनासोबत वारंग्याची खिचडी आणि लोह्याच्या दही-धपाट्याची लज्जतही पर्यटकांना चाखता येते. नांदेडच्या शेजारील जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ तसेच बासर येथील प्रसिद्ध सरस्वती मंदिरास नांदेड मुक्कामी राहून भेट देणे शक्य होते.

-संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड.

माहिती स्रोत : महान्यूज,

शनिवार, २० जून, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate