অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागपूर शहर - पर्यटन

जपानीज रोझ गार्डन

नागपूरच्या सिव्हील लाईन भागात हे जपानी रोझ गार्डन आहे. हे गार्डन म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे. नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्याची इच्छा मनात बाळगणा-यांसाठी ठिकाण अतिशय आकर्षक आहे. पक्ष्यांच्या सान्निध्यात राहण्याचा आनंदही येथे घेता येतो. पावसाळ्यात या गार्डनचे सौंदर्य अधिकच फुलत असते. उंच झाडे, हिरवे गवत आणि मनमोहक निसर्गाने ओतप्रोत असलेले हे गार्डन सकाळी आणि सायंकाळी ‘वॉकींग’ करणार्यांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. या रोझ गार्डनमध्ये लाल आणि पिवळे गुलाब मुख्य आकर्षण आहे. या गार्डनच्या सभोवताल असलेले आणि अतिशय काळजीपूर्वक सुशोभित करण्यात आलेले काही लोखंडी शिल्प पाहिले की, हे खरोखरच जपानी गार्डन असल्याचे संकेत मिळतात.

व्हीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला व्हीसीए ग्राऊंड या नावानेही ओखले जाते. 2008 मध्ये ह गाऊंड उभारण्यात आले. त्याचवर्षी त्याचे उद्घाटन झाले. शहरातील जुन्या व्हीसीए मैदानाची जागा त्याने घेतली. हे मैदान रणजी ट्रॉफी आणि दुलिप करंडक स्पर्धेकरिता विदर्भ आणि सेंट्रल झानच्या संघांकरिता होम ग्राऊंड आहे. नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामठा येेथे आहे

33 एकर जागेत असलेल्या ग्राऊंडमध्ये वाय—फाय कव्हरेजची सुविधा असून, 45 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण आणि सरावाचीही येथे सुविधा आहे. या मैदानात चार स्टॅण्ड आहेत. ईस्ट आणि वेस्ट स्टॅण्ड टू टायर्ससह ओपन आहेत. तर, नॉर्थ स्टॅण्डमध्ये कमर्शिअल बॉक्स आहेत. येथे थ्री टायर्स सुविधा उपलब्ध आहेत. साऊथ स्टॅण्डमध्ये थ्री टायर्स सुविधा असून, ते खेळाडूंचे पॅव्हेलिअन आहे.

महाराजबाग आणि झू

शहराच्या मध्यभागी असलेले महाराजबाग आणि झू हे नागपूरचे मध्यवर्ती प्राणीसंग्रहालय आहे. शहरातील भोसले आणि मराठा राज्यकर्त्यांनी ते बांधले आहे. येथे काही दुर्मिळ जातीचे पक्षी आणि प्राणी आहेत. शहरातील अतिशय मनमोहन स्थळ अशी त्याची ओळख आहे. महाराज बागेत अतिशय दुर्मिळ प्राणी असल्याने योग्य उद्देशासाठी त्याचे बॉटनिकल गार्डनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या महाराजबागेतच प्राणीसंग्रहालयही आहे. शहरातील असे हे एकमेव स्थान असल्याने नागपूरकरांना त्याचा अभिमान आहे. दररोज असंख्य लोक येथे येत असतात. याशिवाय, विदेशी पर्यटक जेव्हा जेव्हा नागपुरात येतात, तेव्हा तेदेखील महाराजबागेला आवर्जुन भेट देत असतात. विद्यार्थ्यांना विविध पक्षी आणि प्राण्यांविषयीची माहिती देण्याकरिता अनेक शाळाही आपली वार्षिक सहल महाराजबागेतच आयोजित करीत असतात. शहरातील हे मध्यवर्ती प्राणीसंग्रहालय असून, ते केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियंत्रणात आहे.

नॅशनल पार्क

नागपूर शहरापासून शंभर किलोमीटरच्या परिसरात व्यापक वन आणि व्याघ्र परिसर आहे. यामुळे नागपूर शहराला देशाची व्याघ्र राजधानी घोषित करण्यात आले आहे. नागपूरच्या सभोवताल असलेल्या काही प्रसिद्ध राष्ट्रीय पार्कमध्ये ताडोबा, नागझिरा, मेळघाट आणि कान्हाचा समावेश आहे.

शहरातील व्याघ्र पर्यटनाचा विकास सातत्याने होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने या शहराने विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे.

पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्रप्रकल्प

पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे 257 किलोमीटर परिसरात वसलेले आहे. महाराष्ट्र सरकारने 1975 मध्ये या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केले. 1999 मध्ये या उद्यानाला भारताचे व्याघ्र प्रकल्प असा अधिकृत दर्जा देण्यात आला. जवळच असलेल्या पेंच नदीमुळे या उद्यानाला पेंच उद्यान हे नाव देण्यात आले आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या पार्कच्या सभोवताल पर्वत आणि द-या आहेत.

Museum

रमण सायन्स सेंटर

नागपूर शहरात असलेल्या या रमण सायन्स सेंटरला नोबेल पुरस्कार विजेते भारतीय भौतिकतज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे नाव देण्यात आले आहे. अतिशय उपयुक्त असे हे सायन्स सेंटर असून, ते मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरशी संलग्न आहे. वैज्ञानिक कामकाजांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच उद्योग आणि मानव कल्याणाकरिता वापरण्यात येणार्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा विकास करण्यासाठी या सेंंटरची स्थापना करण्यात आली आहे. विविध स्वरूपाच्या विज्ञान प्रदर्शनीही येथे भरविण्यात येतात. 7 मार्च 1992 रोजी या केंद्राचे उद्घाटन झाले. 5 जानेवारी 1997 येथे कृत्रिम तारांगण सुरू करण्यात आले. शहरातील गांधी सागर तलावाला लागूनच हे सेंटर आहे. नॅशनल कॉन्सिल ऑफ सायन्स म्युझिअमचा एक भाग असलेले हे सेंटर 4333 चौरस मीटरच्या परिसरात स्थापन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्यासाठी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.

मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला)

नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयाला अजब बंगला या नावानेही ओळखले जाते. शहराच्या पश्चिमेकडे दीड किलोमीटर अंतरावर सिव्हील लाईन्स भागात ते आहे. 1863 मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय शहरातील सर्वात जुने आहे. प्राचिन काळात उपयोगात येणार्या अनेक पुरातत्व वस्तू, शिल्पाकृती येथे संग्रहित आहेत. आर्ट, आर्चिओलॉजी, अॅन्थ्रोपोलॉजी, जिऑलॉजी, उद्योग आणि नैसर्गिक इतिहास अशा सहा गॅल-यामध्ये या सर्व वस्तू संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. आर्ट गॅलरीत बॉम्बे स्कूल ऑफ आर्टमधील काही दुर्मिळ चित्रे सजविण्यात आली आहेत. तर, अॅन्थ्रोपोलॉजीकल गॅलरीत पक्षी, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राण्यांचे सांगाडे आहेत. या संग्रहालयात अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रहदेखील आहे. पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे यावर नियंत्रण असून, कधीकधी येथे माहितीपर चित्रपट महोत्सवांचेही आयोजन करण्यात येते .

नॅरो गेज रेल संग्रहालय

नागपूरच्या कामठी रोडवरील कडबी चौकात असलेले हे नॅरो गेज रेल संग्रहालय भारतातील असे एकमेव संग्रहालय आहे. 14 डिसेंबर 2002 रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. 4.5 एकर जागेत असलेल्या या संग्रहालयात भारतीय रेल्वेच्या अनेक जुन्या आणि वारसा वस्तूंचे एकप्रकारे प्रदर्शनच भरविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने लोकोमोटीव्ह आणि कॅरिएजचे मॉडल्स, हॅण्ड लॅम्प, जुने टेलिफोन संच आदींचा समावेश आहे.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://nagpur.nic.in/#

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate