অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रत्नागिरीचे पर्यटन

रत्नागिरीचे पर्यटन


रत्नागिरीचे आपुलकीचे… निमंत्रण पर्यटनाचे…’ अशी साद घालणाऱ्या ‘रत्नागिरी पर्यटन महोत्सवा’च्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध पैलूंचे दर्शन एकाचवेळी घेता आले. कोकणवासियांच्या आदरातिथ्याचा, कलेचा, इतिहासाचा आणि आपली अस्सलता व वेगळेपण जपणाऱ्या खाद्यसंस्कृतीचा अशा एक ना अनेक गोष्टींचा आनंद यानिमित्ताने अनुभवता आला.
गेल्या सात वर्षापासून खंडित झालेली ही परंपरा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात पुनरुज्जिवीत झाली. यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्यदेखील खूप महत्वाचे ठरले.

पर्यटन महोत्सवाला झालेली अलोट गर्दी पाहता पर्यटक आणि नागरिक यांनी रत्नागिरीचे आपूलकीचे निमंत्रण स्विकारले हे मात्र नक्की.
महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच महाराष्ट्र दिनाला मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या कलावंतांनी सादर केलेला महाराष्ट्र महोत्सव आपल्या समृद्ध अशा लोककलांचे दर्शन घडवून गेला. यात भारुडापासून ते ठसकेबाज लावणीपर्यंतच्या कलाप्रकारांनी सर्व रसिकांना ताल धरायला लावला.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळी रत्नागिरीलगतच्या भाट्ये किनाऱ्यावरील एका बाजूच्या उंच कड्यावरून रॅपलिंग करण्याचा थरारक अनुभव पर्यटकांनी घेतला. जवळच असलेल्या अथांग समुद्राच्या साक्षीने उंच कड्यावरून दोरीच्या खाली उतरतांनाचा अनुभव सहभागींसाठी अविस्मरणीय ठरला. रत्नदूर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेने यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे पर्यटकांना हा अनुभव महोत्सवाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी घेता आला. एका बाजूला रॅपलिंगचा थरार सुरू असतांना याच भाट्ये किनाऱ्यावरच्या दुसऱ्या टोकावर वाळूत कोकण अवतरला होता.

वाळूशिल्प स्पर्धेत सहभागी कलावंतानी कोकणाच्या देवदेवता, कोकणातील नररत्ने, पर्यटन स्थळे, फळे, कोकणाचा विकास, सागरी जीवन अशा विविध अंगानी शिल्पे साकारली होती. यात कोकणी संस्कृतीचे सर्वसमावेशक दर्शन घडविणाऱ्या गिरीश शिर्के या तरुणाच्या शिल्पाने प्रथम क्रमांक पटकावला.
याचदिवशी दुपारी ढोलताशांच्या निनादात निघालेल्या दिमाखदार शोभायात्रेने महोत्सवाची दमदार सुरूवात झाली. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शोभायात्रेचे उद्घाटन केले. रत्नागिरीची जगभरातील ओळख असलेल्या हापूस आंब्याची पालखी नाचवत आणि कोकणातल्या लोककलांचे दर्शन घडवत शोभायात्रा मुख्य उद्घाटन समारंभाच्या ठिकाणी आली. शोभायात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. पर्यटक, रत्नागिरीवाशिय, पालकमंत्री रविंद्र वायकर, स्थानिक लोकप्रतिनिधीं स्वत: शोभायात्रेतून उद्घाटन स्थळापर्यंत सहभागी झाले. यानंतर आयोजित औपचारिक सोहळ्यात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

महोत्सवाच्या निमित्ताने श्री.गीते यांनी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा या महिन्याच्या अखेरीस भूमिपुजन करण्याची आणि दिघी ते चिपळूण कोस्टल रेल्वेने जोडण्याच्या घोषणेने रत्नागिरीकरांसह पर्यटकदेखील सुखावले. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेली ही घोषणा कोकणाच्या दृष्टीने महत्वाची होती. यानंतरच्या लेझर शो, पायरो टेक्निक आणि सुप्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे यांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीनजीकच्या कर्ला येथील समुद्रात नौकानयन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या निमित्ताने रत्नागिरी शहर आणि लगतच्या भागातील मच्छिमार बांधवांना महोत्सवात आपला सहभाग नोंदवता आला. अधांग समुद्रात एका रांगेत नौकेवर आरुढ झालेले स्पर्धकांना प्रोत्साहन देताना प्रेक्षकांनी ‘दर्यावरी आमची चाले होरी….’ चा ठेका धरल्याचे जाणवत होते. स्पर्धा सुरू होणाऱ्या कर्ला गावात आणि समाप्त होणाऱ्या भाट्ये गावात प्रेक्षकांची गर्दी जमली होती. एकूण 17 संघानी या स्पर्धेत हिरहिरीने सहभाग घेतला.

पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. यात कर्ला येथील शकील वस्ता यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीदेखील नौकाविहार करुन स्पर्धा समाप्तीचे ठिकाण गाठले. त्यांच्यासोबत खास महोत्सवाला उपस्थित पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सुद्धा विजेत्यांचे कौतूक केले.

कायम समुद्रात जिवावर उदार होऊन मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमार बांधवाना स्पर्धेच्या रुपाने महोत्सवात सहभागी होऊन आपले कौशल्य दाखविता आले आणि बक्षिसाच्या रुपाने त्यांना शाबासकीची थाप मिळू शकली. याचा आनंद त्या दर्याच्या राजांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.
संध्याकाळी स्थानिक कलावंतासोबतच मराठी दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कलावंतानी सादर केलेल्या हास्यरंग कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली. अखेरच्या दिवशी एक वेगळे साहस पर्यटकांना अनुभवता आले. रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सुमारे 250 फुट खोल भुयारी सफर पर्यटकांना रत्नदूर्ग माऊंटेनिअर्सच्या देखरेखीखाली करता आली. यात महिला पर्यटकांनीदेखील धाडसीपणे सहभाग नोंदवला.

याचवेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते भाट्ये किनाऱ्यावर वाळूशिल्प आणि नौकानयन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. शिक्षणमंत्र्यांनी वाळूशिल्पांची पाहणी करुन कलावंताचे कौतूक केले. संध्याकाळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा गौरव करण्यात आला. यानंतरच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आणि गायिका बेला शेंडे यांच्या कार्यक्रमाने महोत्सवाचा सुरेल समारोप झाला.
जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या प्रयत्नातून गत 7 वर्षापासून खंडीत महोत्सवाची परंपरा पुन्हा सुरू झाली. स्थानिक कलावंतांना आपली कला सादर करण्याची मिळालेली संधी, महोत्सवातील स्टॉलद्वारे बचतगटांच्या उत्पादनांना आणि आंब्याला मिळालेली बाजारपेठ, त्यामाध्यमातून केवळ तीन दिवसात 19 लाखापर्यंतची झालेली उलाढाल या यशामुळे बचतगट, आंबा विक्रेते आणि आयोजकांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हे या महोत्सवाचे मोठे फलीत म्हणावे लागेल.

जाता जाता… आणखी सांगण्यासारखे म्हणजे.. महोत्सवाच्या निमित्ताने पर्यटन महोत्सव ठिकाणाचे प्रवेशद्वार (थिबा राजवाडाचे मॉडेल) तयार केलेल्या कलाकाराचे आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या भितींवर अवघा रत्नागिरी जिल्हा चित्ररुपाने रेखाटणाऱ्या कलावंतांची आठवण काढणाऱ्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टस् आणि डि कॅड कॉलेज देवरुखचे चित्रकार कलावंताना सलाम करावाच लागेल.. 

-विजय अ. कोळी
माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी.

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ०७ मे, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate