অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यटन आणि विकास

पर्यटन आणि विकास

निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे.

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाला ‘शाश्वत पर्यटन-विकासाचे साधन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे.

जागतिक पर्यटन संघटना पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करते तसेच पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह या संघटनेचे 155 सदस्य आहेत. स्पेनमधील टोरोमॉलीनोज येथे 1979 मध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या सभेत 1980 पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी पर्यटन दिनाच्या ‍निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. यावर्षी ‘पर्यटन आणि विकास’ हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.

गतवर्षी 120 कोटी पर्यटकांनी जगभरातील विविध स्थांनांना भेटी दिल्या आहेत. ही संख्या 2030 पर्यंत 180 कोटींच्या घरात जाईल असा अंदाज जागतिक पर्यटन संघटनेने व्यक्त केला आहे. या संधीचा उपयोग करून शाश्वत विकासाला चालना देता येणे शक्य आहे. पर्यटनाचा यादृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.

पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.

पर्यटनाबाबत विकासाच्या कल्पना मांडतांना त्या भागातील खास खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, निसर्ग याचा फारसा विचार केला जात नाही. पर्यटकांसाठी चांगल्या सुविधांएवढेच त्यांना नव्या जगाचे दर्शन होणे आणि रोजच्या जीवनापेक्षा नवा अनुभव मिळणे महत्वाचे असते. पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या परंपरेच्या खुणा याचसाठी खासकरून जपल्या आहेत आणि त्याचेच मार्केटींग उत्तमरित्या केले जाते.

नाशिक जिल्ह्याचा विचार करता पावसाळी पर्यटन असो अथवा सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन, नाशिकला पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. नाशिक देशाची ‘वाईन कॅपिटल’ म्हणून ओळखली जाते. कृषि पर्यटनाबाबतही जिल्ह्यात खूप मोठी संधी आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग आणि मुंबईशी असलेली समिपता लक्षात घेता नाशिकला पर्यटन विकासाच्या अमर्याद संधी आहेत. या संधीचा उपयोग करून घेत जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळू शकते.

पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्राशी संबंधीत विविध घटकांनी विकासात्मक पैलूंवर चर्चा केल्यास भविष्यातील विकासाच्या वाटा दृष्टीक्षेपात येऊ शकतील. अर्थातच यासाठी पर्यटक केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे. जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिव तालेब रिफाई यांचा पर्यटकांना सुंदर संदेश आहे ‘निसर्ग, संस्कृती आणि यजमान यांचा सन्मान करा, तुम्ही अधिक चांगल्या विश्वाचे दूत बनू शकता’. ही भावना पर्यटकांपुरती मर्यादीत न राहता पर्यटनस्थळ परिसरातील नागरिकांनीदेखील स्वागत, सन्मान आणि सुविधा या तीन बाबी लक्षात घेतल्यास पर्यटनाच्या माध्यमातून अपेक्षित विकास शक्य आहे.

लेखक: डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 5/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate