অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यटनाची राजधानी औरंगाबाद

पर्यटनाची राजधानी औरंगाबाद

प्राचीन काळापासून वैविधतेने नटलेले औरंगाबाद. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. या राजधानीत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले होते. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे यंदाचे ‘विकासाचे साधन शाश्वत पर्यटन’ असे घोषवाक्य आहे. नुकत्याच झालेल्या पर्यटन दिनानिमित्त औरंगाबाद पर्यटन राजधानीचा घेतलेला हा विकासात्मक आढावा.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. अजिंठा, वेरुळ लेणी, बिबी का मकबरा, पानचक्की, देवगिरी किल्ला यामुळे औरंगाबादकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षिले जातात. या शिवायही पर्यटनाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आणि पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाने पर्यटन विकासावर भर देण्यात येतो आहे.

आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे 52 दरवाजांचे शहर म्हणूनही औरंगाबादची ओळख आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तूकलेचा, शिल्पकलेचा वारसा, विविध प्रकारच्या वन, वन्यजिवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद.

युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजिंठा लेणी, यादव आणि मुघल काळातील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला, मिनी ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बिबी का मकबरा म्हणजे औरंगाबादसाठी भूषणच. औरंगाबादची विकासाची मुहुर्तमेढ रोवणारा मलिक अंबरचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरींचा उत्तम नमुना असलेली पानचक्की, शहराच्या डोंगरमाथ्यावरील बौद्ध लेण्या, निसर्गरम्य परिसरात वसलेले आणि शैक्षणिक चळवळीचे महत्त्वाचे स्थान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी एक ना अनेक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे. एकाहून एक सरस पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.

औरंगाबादबरोबरच मराठवाड्यातील पर्यटनाला चालना देण्याचे कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार करते आहे. मराठवाडा टुरिस्ट हब व्हावा यासाठी विविध पातळ्यांवर कार्यवाही करण्यात येते आहे. जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न होताहेत. सिद्धार्थ उद्यानातील प्राणी पर्यटकांना मोहित करुन टाकतात, या प्राणी संग्राहलयाच्या विस्तारीकरणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पर्यटकही या प्राणीसंग्रहालयाचा पुरेपुर आनंद घेतात.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत भारतातील जागतिक दर्जाची ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांसाठी औरंगाबाद हेरिटेज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, जनजागृती मोहीम राबवून संवर्धनासाठी पुढाकारही घेतला जातो. यामध्ये सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी होतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचबरोबर संवर्धनासाठीही मोलाची अशीच बाब आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेरुळ, अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचेही याठिकाणी आयोजन करुन पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे याठिकाणी फिटते, असेच म्हणावे लागेल. या पर्यटनस्थळांबरोबरच इतर पर्यटनस्थळांचा विकास व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतात. याचाच भाग म्हणून 434.44 कोटींचा म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद आणि सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या विकास आराखड्यातून विविध पायाभूत सुविधा निर्माण होऊन उत्तम दर्जाची पर्यटनस्थळे विकसित होण्यास मदतच होणार आहे.

महामंडळाबरोबरच महापालिकेतर्फेही शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा आटोकाट प्रयत्न असतो. खुलताबादमध्ये ऐतिहासिक असलेल्या नगारखाना दरवाजाचे महामंडळामार्फत सुशोभीकरण झाल्याने खुलताबादमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीलाही समाधान वाटते. या नगारखाना दरवाजामुळे खुलताबादच्या सौंदर्यीकरणात मोलाची अशी भर पडली आहे.

पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो तो पर्यटक. म्हणूनच ‘अतिथी देवो भव’ या भारतीय संस्कृतीला अनुसरुन पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, त्यांची गैरसोय होऊ नये, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन ठिकठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच औरंगाबाद-वेरुळ, औरंगाबाद-अजिंठा रस्त्यांवर माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सिल्लोड येथील महामंडळाच्या मार्गस्थ सेवा केंद्राचे नूतनीकरण करुन पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयाच्या संकेतस्थळावर पर्यटकांसाठी सुविधा, सवलतींची माहिती दिलेली आहे.

52 दरवाजांचे शहर, खडकी, फतेहपूर अशी औरंगाबादची जुनी नावे. परंतु आता औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात पर्यटनाचा झपाट्याने विकास आणि संवर्धन होतो आहे. तसेच ती आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यटनस्थळांच्या संवर्धनासह त्यांची स्वच्छता राखण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

लेखक: श्याम टरके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate