অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिंप्रीची तपश्चर्या सिद्धीस!

वेशीवरच्या पाऊलखुणा : सिद्ध पिंप्री

पिंप्रीची तपश्चर्या सिद्धीस!

पिंप्री

गावच्या मूळ पुरूषाच्या पराक्रमांची गाथा एखादे गाव पिढ्यान् पिढ्या मिरवते, मात्र त्यातून शिकत पुढे जाण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे इतिहास हा तेवढ्यापुरताच सीमित राहतो. साहजिकच गावात नव्याने काही घडताना दिसत नाही पण, ‌सिद्ध पिंप्री गावाने पुरातन इतिहासाच्या पाऊलखुणा जपतानाच नवीन पाऊलखुणाही ठसठशीत केल्या आहेत. गावची वेस, प्रथा, परंपरा जपताना त्याला आधुनिक विचारांची सोनेरी किनार लावून गावाला नवी आशा दिली आहे. सिद्ध पुरूषांच्या प्रेरणा, अनेक साधूसंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्शाच्या तपश्चर्येतून पिंप्रीने आपले वेगळेपण सि‌द्धीस आणले आहे. पिंप्रीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पाहताना नव्याने उमटलेल्या पाऊलखुणा या तपश्चर्येचे गमक असल्याचे दिसते.

इतिहास

नाशिकहून आडगावला गेले की, तेथून सिद्ध पिंप्रीला जाता येते. एकूण अंतर १७ किलोमीटर आहे. पिंप्री गावाबद्दल अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. पृथ्वीराज चौहान यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक सरदार भारतभर विखुरले. त्यात बिऊजी चौहानही एक होते. बिऊजींनी सुरुवातीला सरदार होळकरांकडे कामे केली. बिऊजींच्या पराक्रमांमुळे होळकरांनी त्यांना मंगरूळ या गावची जहागिरी दिली. त्यानंतर ते विंचूरकरांकडे गेले. मात्र अंतर्गत राजकारणामुळे त्यांना संस्थानातून बाहेर ढकलण्यात आले. यावरून त्यांना ढिकले म्हटले जाऊ लागले. नंतर ते ओढेकर घराण्याकडे गेले. तेथेही बिऊजी ढिकलेंनी दाखविलेल्या पराक्रमांमुळे त्यांना ओढा गावाची जहागिरी मिळाली. एकदा बिऊजी पिंप्रीत आले. हे गाव गवळी घराण्याचे असल्याचे सांगितले जाते. येथे दुधाचा व्यवसाय करणारे वाघ नावाचे गवळी रहायचे. दुधाच्या व्यवसायामुळे गावात सुबत्ता होती. त्यामुळे पेंढाऱ्यांचा त्रास गावाला होता. पेंढाऱ्यांकडून गाव नेहमी लुटले जायचे. एकदा बिऊजी चौहान-ढिकले आपल्या पांढऱ्या घोड्यासह गावाच्या वेशीबाहेर बसले होते. त्यावेळी पेंढारी गाव लुटण्यासाठी आले होते. बिऊजी चौहानांना पाहिल्यावर पेंढारी पळून गेले व पुन्हा या गावाला पेंढाऱ्यांचा त्रास झाला नाही. हे पाहिल्यावर गावकऱ्यांनी गावाचा रक्षणकर्ता व गावचा मूळ पुरूष म्हणून बिऊजींची व त्यांच्या पांढऱ्या घोड्याची गावातून मिरवणूक काढली. तेव्हापासून दरवर्षी तीन घोड्यांची मिरवणूक गावातून काढली जाते. गावात चैत्रशुद्ध बिजेला सिद्ध महाराजांची यात्रा भरते. तर आषाढ वृद्ध आमावस्येला मलिद्याचा कार्यक्रम केला जातो.

आमदार उत्तमराव ढिकले याच गावचे. सिद्ध पिंप्रीत ७५ टक्के लोकांचे आडनाव ढिकले आहे. त्यामुळे गावाची रचनाही इतर गावांच्या रचनेपेक्षा वेगळी आहे. दक्षिण, उत्तर अशा दोन वेशी आहेत. अनेकदा गावच्या वेशींची अवस्था बिकट असते. अनेक वेशी पडझड झालेल्या अवस्थेतच पहायला मिळतात. मात्र सिद्ध पिंप्रीच्या वेशींचे संवर्धन करण्यात आले आहे. त्यांना नव्यानेही बनविल्याने त्या किल्ल्यांच्या बुरजांसारख्या भक्कम दिसतात. या वेशींमुळे गावची शान वाढली आहे. गावची तटबंदी मात्र गावच्या विस्तारामुळे नष्ट झाली आहे; मात्र तिच्या खाणाखुणा अजूनही पहायला मिळतात. गावाचे निमशाही विभाग, चौथाई विभाग व कुळी विभाग असे तीन विभाग आहेत. यातील निमशाही व चौथाई विभागात ढिकलेंचे वर्चस्व आहे. तर कुळी विभाग हा इतर समाजासाठी असल्याचे मानले जाते. मात्र ही जुनी रचना आहे. प्रत्येक विभागाचा एक घोडा आहे. हे घोडे लाकडात बनविण्यात आलेले आहेत. कोणत्या विभागाचा कोणता घोडा आहे हे लक्षात येण्यासाठी त्यांचे रंगही वेगवेगळे आहेत. या घोड्यांची मिरवणूक दरवर्षी जल्लोषात काढली जाते, असे माजी पोलिस पाटील जगन्नाथ बाळू ढिकले सांगतात.

सिद्ध पिंप्री

सात सिद्ध पुरुषांमुळे पिंप्रीला सिद्ध पिंप्रीही म्हटले जाते. हे सात सिद्ध पुरूष कानिफनाथांचे शिष्य होते. म्हणून त्यांना सप्तसिद्ध नाथ महाराजही अशी ओळखही मिळाली. त्यांच्या समाधी गावाच्या उत्तरेला आहेत. त्यांनी संजीवनी समाधी घेतल्याच्या खाणाखुणा परिसरात आहेत. या समाधींची रचना आणि परिसर थक्क करणारा आहे. सिंहस्थ काळात नाथपंथीय साधू गावात वास्तव्यास यायचे. या साधूंची व्यवस्था गोसावी व गावकरी मिळून करीत असत. मात्र आता ही प्रथा बंद झाली आहे. या समाधींजवळच उत्तरवेशीला सप्तश्रृंगीमातेचे गावकऱ्यांनी नव्याने बनविलेले सुंदर मंदिर आहे. या मंदिरात शाकंबरी देवीची पुरातन मूर्ती आहे. उत्तर वेशीजवळच पेशवाईतील हनुमान मंदिर आहे. सुरेख मंदिरात लाकडी नक्षीकाम हे हनुमान मंदिराचे वैशिष्ट्य आहे. गावातील सूर्यवंशी सुतार कुटुंबाने हे कोरीव काम केले आहे. उत्तरवेशीजवळच अहिल्याबाईंनी बांधलेली ऐतिहासिक बारव आहे. या परिसरात अनेक लहान मोठ्या प्राचीन मूर्ती विखुरलेल्या पहायला मिळतात. गावच्या ईशान्येला महादेव मंदिर आहे. हे गावातील पहिले मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

गावात दुर्मीळ ताम्रपट व मोडीतील कागदपत्रे होती; मात्र ती आता नसल्याने गावचा इतिहास पूर्णपणे प्रकाशात आलेला नाही. मात्र निराश न होता गावाने विकासाच्या माध्यमातून इतिहास घडविण्याचा पण केलेला दिसतो. गावसभा घेण्याची गावची परंपराही फार प्राचीन आहे. तंटामुक्ती व ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीपासून गावात गाव सभा घेतली जायची. गाव सभेत दक्षता पंच समिती नेमलेली आहे. यात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश असतो. या सभेतच न्यायनिवाडा केला जातो. हे अजूनही घडताना दिसते. गावातील याच व्यासपीठावर तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांची कीर्तने झाली आहेत. तर शांतीगिरी महाराजांचा जन्म पिंप्री गावातील आहे. त्यांचे छोटेसे जन्मघर अजूनही पहायला मिळते.

पी. एल. लोखंडे

डॉ. बाबासाहेबांचे निकटचे अनुयायी पी. एल. लोखंडे हे याच गावचे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श सिद्ध पिंप्रीला लाभला आहे. बाबासाहेबांच्या अस्थी चांदीच्या डबीत ठेऊन येथील स्तुपात ठेवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे राष्ट्रीय स्मारक स्तूप फक्त पिंप्रीतील राजवाड्यात आहे. बाबासाहेबांबद्दल एक आठवणही आवर्जून सांगितली जाते. बाबासाहेब एकदा पिंप्रीतील राजवाड्यात सभेसाठी आले होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी त्यांना कोठे बसवायचे, हा ऐनवेळी प्रश्न निर्माण झाला. गावात कोणाकडेच खुर्ची नव्हती. अखेर गावातील शिंपी मुनीर चांदभाई यांच्याकडे असलेली खुर्ची बाबासाहेबांसाठी आणली गेली व सभा व्यवस्थ‌ित पार पडली. मुनीर चांदभाईने ही खुर्ची बाबासाहेबांची आठवण म्हणून अजूनही जपून ठेवली आहे.

परंपरांना फाटा

गावाने अनेक रूढी परंपरा जशा जपल्या आहेत, तशा ज्या रूढी परंपरांमुळे गावाला त्रास होतोय अशा परंपरांना फाटाही देण्यात आला आहे. २००२ पासून गावात जगन्नाथ ढिकले यांच्या पुढाकाराने लग्नासाठी अकरा नियम तयार करण्यात आले आहेत. मिरवणूक काढायची नाही, लग्न सोहळा साध्या पद्धतीने करायचा, मानपान, हुंडा व आहेर यापद्धतींना छेद देण्यात आला आहे. हे नियम गरीब-श्रीमंत सर्व पाळतात. गावातील तालुका क्रीडा संकुलातील क्रिकेटचे मैदान राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांसाठी मान्यता पावले आहे. भानुदास ढिकले यांच्या शेतकरी अवजारांच्या प्रदर्शनासाठीही पिंप्री गाव ओळखले जाते. या संग्रहात शेतीतील शेकडो दुर्मीळ अवजारे पहायला मिळतात. गावच्या रूढी परंपरांवर पंकज वाघले यांनी डॉक्युमेंटरी करून गावाचे गावपण संग्रहित करण्याचा प्रयत्न केला आहे. पिंप्रीच्या मूळ पुरूष, सिद्ध पुरूष व गावकऱ्यांच्या तपश्चर्येतून गावचा इतिहास सिद्धीस आल्याचे अनुभवायला मिळते.

लेखक : रमेश पडवळ

rameshpadwal@gmail.com

contact no : 8380098107

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate