অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुन्हा पुन्हा साद घालणारं भीमाशंकर

महाराष्ट्राच्या मानचिन्हापैकी एक असलेले शेकरू अर्थात तांबूस खार पहायची असेल आणि घनदाट निसर्गसौंदर्याचा आनंद लुटायचा असेल तर एकदा भीमाशंकरला जायलाच हवं. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिम घाट परिसरात भीमाशंकर अभयारण्य वसलं आहे. अभयारण्याचं संपूर्ण क्षेत्र 130.780 चौ.कि.मी. असून 1985 मध्ये या क्षेत्राला अभयारण्य घोषित करण्यात आले.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग

डोंगराच्या दोन ऊंच कड्यात हे अभयारण्य विभागलं गेलं आहे. अभयारण्याच्या पहिल्या भागात भीमाशंकराचे मंदिर आणि मंदिर परिसरातील जंगलाचा समावेश आहे. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराला शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनी दर्शनासाठी भेट दिल्याच्या नोंदी आढळतात. श्रावणात भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या छतावर सुंदर नक्षीकाम आहे. हा भोळा शंकर असंख्य भक्तगणांना आपल्या दर्शनाने आनंदित करतो. मंदिरावर कृष्णलीला, शिवलीला आणि दशावताराचे प्रसंग चितारलेले आहेत. देवळाला मिळालेल्या देणग्यांची माहिती देणारा शिलालेखही इथं आहे. चिमाजी अप्पा पेशव्यांनी जिंकून आणलेली वसईच्या किल्ल्यावरील भली मोठी घंटा आजही त्यांच्या विजयाची साक्ष देत इथल्या सभामंडपात दिमाखात टांगलेली दिसते.

वनस्पती व प्राणी

अभयारण्याच्या दुसऱ्या बाजूस ठाणे, रायगड जिल्ह्यातील जंगलाचा समावेश होतो. येथील जंगलात आंबा, जांभूळ, उंबर, अंजन, शेंद्री, पिसा, ऐन, साग, मोह, बांबू, हिरडा, बेहडा, करवंद, आईन अशी विविध झाडं आणि वनौषधी आढळतात. येथे बिबट्या, सांबर, हरिण, कोल्हा, साळिंदर, भेकर, लांडगा, वानर, तरस, काळवीट, रानससा, उदमांजर, रानडुक्कर, पिसोरी हरिण, खवल्या मांजर असे अनेक वन्यजीव आपल्याला दर्शन देऊन जातात. अतिशय घनदाट अरण्याने वेढलेल्या या अभयारण्यात अनेक पक्षांचा अधिवास आहे.

शेकरूचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक मोठ्या प्रमाणात इथं येतात. त्याशिवाय लांडोर, गरूड, सर्पगरूड, घार, काळा बुलबूल, नीलमणी, निलांग, हळद्या लीफबर्ड, निखार, स्वर्गीय नर्तक, वेडाराघू, पोपट, खंड्या, सुभग, नाचण, मोर हे पक्षी तर नाग, मण्यार, घोणस, अजगरासारखे सरपटणारे प्राणी आणि असंख्य प्रकारची फुलपाखरंही आपण पाहू शकतो. घनदाट जंगल आणि त्याला ज्योतिर्लिंगाची जोड यामुळे येथे पर्यटकांची सतत गर्दी असते.

कोकण कडा

भीमाशंकर मंदिराच्या पश्चिमेला कोकण कडा आहे. येथून भीमाशंकरच्या जंगलाचे विहंगम दृष्य दिसते. कोकणकड्यापासून सीतारामबाबा आश्रमाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. येथून नागफणीला जाण्यासाठी पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात ऊंच ठिकाण आहे. कोकणातून हे शिखर नागाच्या फणीसारखे दिसते म्हणून या शिखराला नागफणी असे नाव पडले आहे.

घनदाट वनश्रीने सजलेले, अनेक धबधब्यांना अंगाखांद्यावर खेळवणारे, छोटमोठ्या टेकड्यांची गर्दी असलेले हे अभयारण्य भटकंतीला आसुसलेल्या आणि रानवाटांवर प्रेम करणाऱ्या वनपर्यटकांचे आवडते स्थळ आहे. इथल्या वाटा पर्यटकांना जंगलभ्रमंतीसाठी खुणावत राहातात. इथले डोंगर ट्रेकिंगसाठी आव्हान देतात तर इथला भोळा शंकर असंख्य भक्तगणांना आपल्या दर्शनाची ओढ लावतो. भीमाशंकराचं दर्शन घेऊन पुढे गेलं की दरीत पापमोचन तीर्थ दिसतं. भीमाशंकराच्या ज्योर्तिलिंगातून निघालेलं पाणी जमिनीखालून वाहात या ठिकाणी भीमानदीच्या स्वरूपात प्रकट होतं असं म्हणतात. मंदिरापासून साधारणत: 1.5 कि.मी पूर्वेला हे स्थळ आहे. त्यामुळे ही जागा गुप्त भीमा किंवा गुप्त भीमा शंकर म्हणूनही ओळखली जाते. भीमा नदी जिथे उगम पावते तिथे दगडामध्ये छोटेसे शिवलिंग आहे. एरवी लहान झऱ्याच्या स्वरूपात वाहणारा पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात मात्र मोठ्या धबधब्याचं रूप घेतो आणि त्या शिवलिंगावर कोसळून त्याला अभिषेक घालत राहातो.

भीमाशंकरला जाण्यासाठी

भीमाशंकरला जाण्यासाठी पुणे- राजगुरुनगर-मंचर-घोडेगाव- पोखरीघाट ते भीमाशंकर असे जाता येते. शिवाजीनगर बस स्थानकातून ठराविक वेळेच्या अंतराने बस उपलब्ध आहेत. मुंबईहून भीमाशंकरला जायचं असेल तर लोणावळा, तळेगाव, चाकणमार्गे मंचर असं जाता येतं. भीमाशंकर आणि आसपासची ठिकाणं पहायची असतील तर खाजगी वाहनाने जाणं केव्हाही सोयीचं ठरतं. इथं गेल्यानंतर डिंभे धरणाला आणि परिसराला आवर्जुन भेट द्यावी. परिसराची माहिती देणारे एक केंद्र इथे कार्यरत आहे. इथलं सुसज्ज ग्रंथालय निसर्गप्रेमींना या क्षेत्राची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. धकाधकीच्या जीवनातून चार विरंगुळ्याचे क्षण शोधत असाल तर निवांत आरोग्यदायी श्वास घेण्यासाठी एकदा भीमाशंकरला भेट द्यायलाच हवी. गिर्यारोहणाच्या आनंदाबरोबर शिवनेरीसह आसपासचे गडकिल्ले आपल्याला साद घालतात. तिकडेही जायला काहीच हरकत नाही.

देवराई

स्थानिक लोक ज्याला देवराई म्हणतात अशा काही देवराई या भागात आहेत. देवराई म्हणजे जंगलातली पवित्र जागा. देवाच्या नावानं राखून ठेवलेल्या वनक्षेत्राला कोण हात लावणार या उद्देशाने देवराई जपल्याही गेल्या अशी माहिती इथं भेट दिल्यानंतर सांगितली जाते. एका दिवसाच्या सुट्टीत भीमाशंकरचा पूर्ण आनंद घेता येत नाही. देवदर्शनाबरोबर निसर्गपर्यटनाचा तुंबळ आनंद घ्यायचा असेल तर किमान दोन-तीन दिवस नक्कीच हवेत. वन विभागाचे रेस्टहाऊस आपल्या स्वागतासाठी तयार आहेच त्याचबरोबर पर्यटन विकास महामंडळ आणि ग्रामस्थ संचलित निवास व्यवस्थाही येथे उपलब्ध आहे. वन विभागामार्फत कोंढवळ येथे स्वंयसेवी संस्थांच्या सहकार्याने पर्यटकांसाठी रॅपलिंग, ट्रेकिंगची देखील सोय करण्यात आली आहे.

लेखक -डॉ. सुरेखा म. मुळे

माहिती स्रोत:महान्युज

अंतिम सुधारित : 5/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate