অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रवरेचा प्रवाह, अध्‍यात्‍म आणि निसर्गाचा अनोखा संगम : श्रीक्षेत्र देवगड

प्रवरेचा प्रवाह, अध्‍यात्‍म आणि निसर्गाचा अनोखा संगम : श्रीक्षेत्र देवगड

निसर्गाशी सख्‍य सांगणारा श्रीक्षेत्र देवगडचा निसर्गरम्‍य परिसर. अथक परिश्रमातून फुललेली इथली वनराई सुंदर आहे. संत वास्‍तव्‍याने पावन झालेला हा परिसर आणि इथला निसर्ग भक्‍तीला सुगंध देणारा, मनाला उल्‍हास देणारा आणि एकाग्रतेला सूर देणारा आहे. श्री क्षेत्र देवगड तिर्थक्षेत्र आहे. या तिर्थक्षेत्राला प्रवरेचे पात्र भव्‍यता देते. प्रवरेचा दगडी घाट, नदी किनाऱ्‍यावरील वनराई, नौकाविहार करता येईल असे विस्‍तीर्ण पात्र आणि मंदिर परिसराशी मैत्री वाढवीत मंदिराच्‍या पायथ्‍याजवळून जाणारा पवित्र प्रवरेचा प्रवाह हा अध्‍यात्‍म आणि निसर्गाचा अनोखा संगम देवगडला पाहता येतो.

संत परंपरेला समृद्ध करणारे अलिकडच्‍या काळातील महान संत समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा. देवगडजवळच्‍या गोधेगावात 1907 साली जन्‍म घेऊन त्‍यांनी स्‍वतःसह समाजाच्‍या कल्‍याणाचा ध्‍यास घेतला. अत्‍यंत साधी राहणी आणि सात्विक भोजनाचा आग्रह धरला. किसनगिरी बाबांनी सामान्‍यांना श्रद्धेसह जगण्‍याची शिकवण दिली. देवगडला श्रीदत्‍तप्रभूंच्‍या मंदिराची उभारणी करुन संस्‍थानाची मुहूर्तमेढ रोवली. ज्‍या प्रवरेकाठी नेवासा येथे श्री ज्ञानदेवांनी गीतेचा उपदेश सोपा करुन सांगितला तोच उपदेश प्रत्‍यक्ष आचरणात आणून त्‍याच प्रवरेकाठी देवगड येथे समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिला. अखंड नामस्‍मरण, सर्वकल्‍याणाचा ध्‍यास आणि लोकहिताचा उपदेश दिला. विश्‍वकल्‍याणाचा ध्‍यास घेतलेल्‍या संतशिष्‍यांचा मेळा जमवला होता, तळागाळातील सामान्‍यालाही अध्‍यात्‍म सोपे आहे, असे समजावून मुख्‍य प्रवाहात सामील करुन घेतले. अशा या समर्थ किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर आहे.

भूनंदवन श्रीक्षेत्र देवगड परिसरातील प्रमुख मंदिर म्‍हणजे श्री दत्‍तप्रभूंचे मंदिर. दगडी बांधकाम, संगमरवराचा कल्‍पक आणि योग्‍य वापर, चार फूट उंचीचा भव्‍य सुवर्ण कळस आणि सात्विकतेची प्रचिती देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्‍ट्ये आहेत. या सर्व वैशिष्‍ट्यांना पावित्र्य देणारी श्री दत्‍तप्रभूंची लोभस मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे. मंदिरात प्रवेश करताच दृष्‍टीस पडणारी स्‍वच्‍छता, पावित्र्य जपण्‍याचा केलेला आटोकाट प्रयत्‍न आणि संताच्‍या सहवासाने मंदिर सभागृहाला लाभलेली आध्‍यात्मिक श्रीमंती या मंदिराच्‍या आर्कषणाचा महत्त्वाचा भाग आहे.

श्री क्षेत्र देवगड परिसरातील भव्‍य मंदिर आणि अध्‍यात्मिक श्रीमंतीची यथार्थ कल्‍पना देणारे महाद्वार. जीवनाला अर्थ देणाऱ्‍या परिसरात जाण्‍याचा प्रचंड, सोपा आणि सुलभ मार्ग असाच उल्‍लेख करता येईल.

समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी ज्‍यांच्‍या हाती विश्‍वासाने देवगड सोपवले ते भास्‍करगिरी महाराज म्‍हणजे गुरुनिष्‍ठेचा आदर्श. सदगुरु भास्‍करगिरी महाराज देवगड परिसराचा लौकिक वाढवित आहेत. आध्‍यात्मिक तिर्थक्षेत्रांची लोकविकासातील भूमिका प्रभावीपणे मांडणारे आणि त्‍या संदर्भात कृतिशील असणारे भास्‍करगिरी महाराज भाविकांचे श्रद्धास्‍थान आहेत. परंपरांशी एकनिष्‍ठ राहूनही आधुनिकतेचा विचार मानणारे, ईश्‍वरसेवेला समाजसेवेपर्यंत विस्‍तारत नेण्‍याचे कार्य भास्‍करगिरी महाराज यांनी केले आहे.

श्रीक्षेत्र देवगड परिसरात श्रीदत्‍त मंदिराच्‍या डाव्‍या बाजूस पंचमुखी श्री सिद्धेश्‍वराचे मंदिर आहे. अतिशय सुंदर असे हे सिद्धेश्‍वर मंदिर श्री मूर्तींच्‍या सु‍बकतेमुळे अधिकच आकर्षक ठरते.

निसर्गाचा अनोखा संगम प्रवरा नदी

श्री क्षेत्र देवगड तिर्थक्षेत्र आहे. या तिर्थक्षेत्राला प्रवरेचे पात्र भव्‍यता देते. प्रवरेचा दगडी घाट, नदी किनाऱ्‍यावरील वनराई, नौकाविहार करता येईल असे विस्‍तीर्ण पात्र आणि मंदिर परिसराशी मैत्री वाढवित मंदिराच्‍या पायथ्‍याजवळून जाणारा पवित्र प्रवरेचा प्रवाह हा अध्‍यात्‍म आणि निसर्गाचा अनोखा संगम देवगडला पाहता येतो.

निसर्गरम्‍य परिसर

निसर्गाशी सख्‍य सांगणारा हा श्रीक्षेत्र देवगडचा निसर्गरम्‍य परिसर. अथक परिश्रमातून फुललेली इथली वनराई लक्ष वेधणारी आहे. हा सारा भव्‍य परिसर म्‍हणजे सत्‍य संकल्‍पाचा दाता नारायण या श्री तुकोबांच्‍या उक्‍तीचा प्रत्‍यय देणारा. संत वास्‍तव्‍याने पावन झालेला हा परिसर आणि इथला निसर्ग भक्‍तीला सुगंध देणारा, मनाला उल्‍हास देणारा आणि एकाग्रतेला सूर देणारा आहे.

गोपुर

मंदिराच्‍या सुरुवातीस समोर येणारे गोपुर हे या मंदिर परिसराचे वैभव वाढविणारे आहे. भाविकांना या गोपुरात क्षणभर विसावून महाद्वार अवलोकिता येते, श्री दत्‍तप्रभूंच्‍या मंदिरावरील भव्‍य सुवर्ण कळसाचे दर्शनही घडते. ईश्‍वराभिमुख होण्‍यासाठी मानसिक तयारी करायला क्षणाची सावली देणारे हे गोपुर आहे.

पाकशाळा

मंदिर परिसरातील भव्‍य पाकशाळा, आपल्‍या भव्‍यतेसह स्‍वच्‍छता, नीटनेटकेपणा आणि आधुनिकतेमुळे लक्ष वेधून घेते. पूर्णब्रम्ह असणाऱ्‍या अन्‍नाची येथे खऱ्‍या अर्थाने पूजा होते. लक्षावधी भाविकांना प्रसाद वाटणारी ही पाकशाळा, भाविकांना निरंतर प्रसादाचा लाभ या पाकशाळेतून मिळत असतो. सात्त्विक अन्‍नाचा प्रत्‍यय देणारी ही पाकशाळा अप्रत्‍यक्षरीत्‍या अन्‍नसेवनाचे नियमही सांगून जाते.

श्रीक्षेत्र देवगडला कसे जावे

विमान सेवा - औरंगाबाद 53 कि.मी. अथवा पुणे 180 कि.मी. येथपर्यंत विमानसेवा उपलब्‍ध.
रेल्‍वे सेवा - औरंगाबाद, अहमदनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणंपर्यंत रेल्‍वेसेवा उपलब्‍ध.
बस सेवा - औरंगाबाद ते पुणे महामार्गावर देवगड फाटा येथून केवळ 5 कि.मी. अंतरावर

 

संकलन - उपमाहिती कार्यालय,  शिर्डी,
जि.अहमदनगर

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/12/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate