অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाजीराव-मस्तानीच्या सूनेचे पेठ

बाजीराव-मस्तानीच्या सूनेचे पेठ

वेशीवरच्या पाऊलखुणा : पेठ

बाजीराव-मस्तानीच्या सूनेचे पेठ

अनेक राजांच्या सहवासामुळे कधीकाळी समृद्ध असलेले एक गाव व्यापारी ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. प्राचीन मंदिरे, वाड्याचा साज या गावाभोवती बहरला. इतिहासातील थक्क करणाऱ्या घटना अन् राजकिय परिस्थितीशी झुंज देत सर्वांसमोर लढत राहण्याची जिद्द या गावाने ठेवली. बाजीराव-मस्तानीशी नाते सांगणारे, इंग्रजांविरुद्ध लढणारे संस्थानिक म्हणूनही गावाने नाव कमावले. पेठचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहावा इतका मनोरंजक अन्‌ जिज्ञासा वाढविणारा आहे; मात्र पेठ शहरात भटकताना तो कोठेच सापडत नाही. पेठच्या इतिहासाचे देठ हरविल्यासारखे वाटायला लागते.

नाशिक-पेठ हे अंतर ५५ किलोमीटर आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पेठमध्ये प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभारलेले लाकडी बुरूज (वेशी) आपले स्वागत करतात अन्‌ काही वेळ थांबायला भाग पाडतात. हे लाकडी बुरूज म्हणजे गावात रोगराई, इडापिडा येऊ नये म्हणून उभारल्याचे ग्रामस्थ सांगतात. पेठ ही मोठी व्यापारीपेठ होती म्हणून तिला पेठ असे नाव पडले. नाशिक गॅझेटियरनुसार १८८१ मध्ये पेठची लोकसंख्या ५५ हजार १४४ होती अन्‌ पेठमध्ये १० हजार ३३३ घरे होती. तर नाशिक शहराची लोकसंख्या १९२० मध्ये फक्त वीस हजार होती. यावरून पेठचा विस्तार अन् वैभव लक्षात येईल. गुजरातला खेटून असल्याने येथे व्यापार बहरला. हा व्यापारी मार्ग असल्याने याचे वैभव काही निराळेच होते. आता पेठ अगदी मूठभर लोकवस्तीचे गाव वाटते. गावातील तळ्याजवळ महादेवाचे हेमाडपंती मंदिर आहे. जवळच जुन्या विहिरी आहेत. येथील पेठ बाजार पाहण्यासारखा आहे. पेठ परिसरात कोकणा, भिल्ल, कोळी व वारली हा आदिवासी समाज मोठ्या संख्येने असल्याने त्यांच्या संस्कृतीची छाप पेठवर दिसते. आजूबाजूच्या चाळीस पन्नास आदिवासी गावातील मंडळींसाठी ही मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. पेठ-हरणगाव रस्त्याला संगमेश्वर मंदिर असून, जुने मंदिर पाडून नवीन बांधण्यात आले आहे. मंदिराच्या अवतीभवती सुंदर मूर्तीचा खच पडलेला दिसतो यावरून हे मंदिर प्राचीन असेल हे लक्षात येते.

सोळाव्या शतकात पेठ बागलाणच्या राजाच्या अंतर्गत होते. काही कारणांनी पेठवर कमाविसदार (मॅनेजर/मंत्री) म्हणून पवार यांची नेमणूक झाली. पवारांचा इतिहास रोचक आहे. पवार हे परमार या प्राचीन घराण्यापैकी एक होत. ते पेठला आल्यावर त्यांना पवार म्हटले जाऊ लागले. बागलाण संस्थानाने त्यांना पेठचा कारभार सोपविला तेव्हा त्यांच्याकडे सैन्यही होते. पवार दलप्रमुख झाल्याने त्यांना दळवी म्हटले जाऊ लागले. जावजी दळवी यांचा नातू कृष्णाजी दळवी हे स्वतंत्र बाण्याचे होते. ते बागलाणच्या राजाचे नेतृत्व झुगारून स्वतंत्र राहू लागल्याने त्यांनी पेठ संस्थानाची निर्मिती केली. १६३६ मध्ये मुगलांनी बागलाण जिंकला तेव्हा पवार-दळवी यांचा वंशज लक्षधीर संस्थानाच्या गादीवर होता. त्याने मुगलांविरोधात बंड पुकारले. हे बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने मोठे सैन्य पाठवून लक्षधीर व त्यांचा भाऊ राम यांना अटक करून दिल्लीस नेले व त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या दरम्यान पेठ संस्थानचा कारभार औरंगजेबाने मुगल सरदार मंसूर याच्याकडे सोपविला. त्याने संगमेश्वर मंदिरासमोर गढीच्या पाड्यावर मंसूर गढी उभारली. गढीचे ठिकाण अशा ठिकाणी आहे की तेथून सर्व व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवले जाऊ शकते. आता मात्र गढी उद्धवस्त झाली आहे. तिच्या खाणाखुणातून तिचे वैभव दिसते. मात्र गढीच्या समोर वसलेली गढीचीवाडी या आदिवासी पाड्यावरून अजूनही गढीच्या आठवणी जिवंत आहेत.

लक्षधीर दिल्लीत अटकेत असताना औरंगजेबाची मुलगी आजारी पडली. तिच्यावरील सर्व उपचार निरपयोगी ठरत होते. तेव्हा औरंगजेबाला कळाले की, राम दळवी यांना औषधी वनस्पतीचे ज्ञान आहे अन्‌ तेच तिच्यावर योग्य उपचार करू शकतील. औरंगजेबाने राम दळवीला बोलावून उपचार करून घेतले. यामुळे ती बरी झाल्याने दोघा भावांची फाशीच्या शिक्षेतून मुक्तता केली. मात्र मुस्लिम धर्म स्वीकारण्याची अट घातली. त्यामुळे राम दळवी अब्दुल रहीम तर लक्षधर दळवी अब्दुल मोमीन झाला. औरंगजेबाने दोघांच्या निर्वाहासाठी पेठ संस्थान त्यांच्या ताब्यात दिले. लक्षधीरने इस्लाम धर्म स्वीकारला तर रामने तो झुगारला. लक्षधीरही नावा पुरताच मुस्लिम होता त्यांची राहणी हिंदू पद्धतीची होती.

एक दिवस अचानक पेशव्यांचे विश्वासू मराठा सरदार पिलाजी जाधवराव लक्षधीर यांच्याकडे त्यांची मुलगी लाल कुवर हिला पेशव्यांच्यावतीने मागणी घालण्यासाठी आले. पिलाजी जाधवरावांकडे नाशिक प्रांताचा शेतसारा वसुलीची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचा पेठ संस्थांनशी संपर्क होता. बाजीराव पेशवे व मस्तानीच्या मुत्यूनंतर बाजीराव-मस्तानीचा मुलगा समशेर बहाद्दुर यांची जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी घेतली होती. समशेर वयात आल्याने त्याच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू होते मात्र, मात्र योग्य कुळातील मुलगी त्याला मिळत नव्हती. ही जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी पिलाजींवर सोपविली अन्‌ पिलाजींनी पेठ संस्थांची मुलगी शोधली. १४ जानेवारी १७४९ ला समशेर व लाल कुवरचा विवाह धुमधडाक्यात झाला. अशा पद्धतीने बाजीराव पेशवे ज्या नाशिकमध्ये जन्मले तेथेच मस्तानीच्या मुलासाठी मुलगीही मिळाली हा योगायोगच म्हणावा लागेल.

पेठ झपाट्याने बदलत होते. पेठवर मुगलांचा प्रभाव वाढत होता. त्यातच इंग्रजांचाही प्रभाव दिसू लागला. पेठच्या तहसील कार्यालयापासून जवळच डोंगराच्या कड्यावर एक मोठ्या गढीचे अवशेष आहेत. ही गढी दळवी राजांची असावी, असे ग्रामस्थ सांगतात. येथे अनेक समाध्या आहेत. त्या कोणाच्या आहेत हे सांगणारे आता पेठमध्ये कोणीच नाही. मात्र समाधींच्या बांधणीवरून लक्षधीर यांची अथवा राणी बेगमची समाधी असावी असा अंदाज बांधता येतो. राणी बेगम लक्षधीर पवार-दळवी घराण्यातील होत्या. पण त्यांच्याबद्दलही फारशी माहिती मिळत नाही. लक्षधीर नावाचे तीन राजे या दरम्यान होऊन गेले. त्यानंतर लक्षधीर घराण्यातील कर्त्या राणी बेगमने पेठची सत्ता आपल्या हातात घेतली. राम दळवी-पवार घराण्याची दुसरी शाखा असलेले निळकंठराव पवार यांचा मुलगा भगवंतराव ऊर्फ भाऊ राजे यांनी व राणी बेगम यांनी इंग्रजांविरूद्ध १८५७ च्या बंडात सहभाग घेतला. (दिंडोरीतील राम पवार यांच्या शाखेतील राजे घराणे हे मुळचे पेठचेच.)

राणी बेगम यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी या भागातील कोळी बांधवांना एकत्र आणलं. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात आदिवासी भागातील भगवंतराव आणि राणी बेगम या दोन्ही घराण्यांनी निकराची झुंज दिली; मात्र इंग्रजानी हे बंड चिरडले. भगवंतराव पवार राजे यांना १८५८ मध्ये सध्याच्या बिडकर कॉलेजशेजारील रानदेवी मंदिरासमोर असलेल्या झाडावर फाशी देण्यात आली. आता ते झाड नाही; मात्र त्यांची समाधीस्थळ अजूनही पहायला मिळते. यावेळी शेकडो पेठकरांनी इंग्रजांचा अन्याय सोसला. त्यानंतर राणी बेगम यांचा १८७८ मध्ये मृत्यू झाला. इंग्रजांविरोधात बंड पुकारणारे भारतातील एकमेव संस्थान‌िक म्हणून पेठ संस्थानचे नाव आजही घेतले जाते. यानंतर पेठवर इंग्रजांनी पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले. पेठपासून जवळच असलेले सार्वणा गावात इंग्रजांचे बंगले पाहण्यासारखे आहेत, असे दादासाहेब बिडकर कॉलेजच्या इतिहास विभाग प्रमुख श्रीहरी थोरवत सांगतात.

पेठमधील आदिवासी समाजाला स्वावलंबी करण्यासाठी डांग सेवा मंडळाच्या माध्यमातून झटलेल्यांमध्ये दादासाहेब बिडकर यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. त्यांनी पेठमध्ये ज्ञानगंगाही प्रवा‌हित केली. त्याचे कार्य हेमलता बिडकर व डॉ. विजय बिडकर पुढे घेऊन जात आहेत. पेठच्या अज्ञात इतिहासाबाबत इंग्रज अधिकारी एस. ई. गोल्डसमिडस् यांनी १८३९ चा पेठ संस्थानावरील रिपोर्ट पेठच्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेवर प्रकाश टाकतो. पेठबाबतचे ताम्रपटातूनही पेठचा इतिहास उलगडतात. मात्र, सुवर्णाक्षरात लिहावा इतका मनोरंजक अन्‌ जिज्ञासा वाढविणारा पेठच्या इतिहासाचे देठ हरविल्यासारखे वाटते. या इतिहासाचे संकलन करण्याची गरज आहे. तरच आठवणीत हरविलेल्या पेठ संस्थानाला पुन्हा वैभव मिळू शकेल.

 

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate