অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाजीरावांचे डुबेरे

बाजीरावांचे डुबेरे

वेशीवरच्या पाऊलखुणा : बाजीरावांचे डुबेरे

एखाद्या गावाला थोर व्यक्त‌ित्वांच्या आठवणींचा साज असेल तर ते गाव नेहमीच चर्चेचा विषय ठरते. शूरवीराचा पराक्रम, कथा अन् व्यथा अशा सर्व बाजू त्या गावाचे महत्त्व वाढवितात. तसेच गावातील अनेक लहान लहान पैलू प्रफुल्ल‌ित होऊन इतिहास उलगडायला लागतात. असाच अनुभव सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावात येतो. श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचे डुबेरे गाव सटवाईची महती, भोपळ्याच्या झाडाचे आकर्षण, अहिल्याबाईची बारव अन् नटसम्राटाचे गाव म्हणूनही मनाला भुरळ घालते.

मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकविणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे उर्फ राऊ. राऊंची कारकीर्द मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान ठरली आहे. पण हे सुवर्णपान अवतरण्यापूर्वीच्या घडोमोडींची रसदही अनुभवण्यासारखी आहे. कोकणातील श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट शाहू महाराजांच्या दरबारी आले अन् आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या जोरावर सेनाकर्ते ही पदवी मिळवत पुढे पेशवे झाले. दुसरीकडे नेवऱ्याचे मल्हारदादाजी बर्वे (बरवे) यांना छत्रपती राजारामांकडून डुबेरेसह इतर गावांची जहागिरी मिळाली अन् त्यांनी डुबेरेत वाडा बांधला. मल्हारदादाजींची बहीण राधाबाईंशी बाळाजी विश्वनाथ यांचा विवाह झाला. पहिल्या बाळंतपणासाठी

राधाबाई डुबेरेत आल्या. थोरल्या बाजीरावांचा जन्म डुबेरेतील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला, अशी माहिती प्रा. चंद्रशेखर बर्वे यांनी दिली. राउंचे पाळण्यातील नाव विसाजीपंत. विसाजीपंतांनी वड‌िलांच्या पावलांवर पाऊल ठेवत पराक्रम अन् मुत्सद्दीपणाचे धडे गिरविले. दिल्लीला धडक देऊन पराक्रम गाजविलेल्या पेशवा बाळाजी विश्वनाथांचा मार्च १७२० मध्ये सासवड येथे अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर पेशवेपदावरून झालेल्या वादानंतर बाळाजीच्या मृत्यूनंतर १५ दिवसांनी १७ एप्रिल १७२० रोजी शाहू महाराजांनी थोरले बाजीरावांस पेशवाईची वस्त्रे देत मराठा साम्राज्याची जबाबदारी सोपविली. थोरले बाजीराव मराठा साम्राज्यासाठी व‌िजेच्या चपळाईने लढले. मोगलांना त्यांची जागा दाखवित २० वर्षांच्या कारकिर्दीत बाजीराव अपयशाला कधी शिवले नाहीत. मात्र हा पराक्रमी वीर मस्तानीमुळेही सर्वाधिक चर्चिला गेला. मध्य प्रदेशातील नर्मदेच्या तीरावर रावेरखेडी येथे उष्माघाताने या पेशव्याचा २८ एप्रिल १७४० रोजी मृत्यू झाला. नर्मदेच्या काठावर बांधलेले बाजीरावांचे समाधीस्थळ आजही या स्मृतींना उजाळा देते. तसेच डुबेरेतील बर्वे वाड्यातील पेशव्यांची जन्म खोली त्यांचा पराक्रम डोळ्यापुढे उभा करते. म्हणूनच डुबेरेचा प्रवास वेगळा ठरतो.

सिन्नरमधून उजव्या हाताने सिन्नर-ठाणगाव रस्त्याने सात-आठ किलोमीटरवर डुबेरे गाव हिरवळीने दाटलेल्या पुंजक्यात वसलेले दिसते. झाडांच्या गर्द छायेत डुबलेले गाव असल्यानेच गावाला डुबेरे असे नाव पडले असावे, असे नारायण वाजे सांगतात. १६७९ मध्ये जालना लुटीतून पुण्यास परतताना छत्रपती शिवाजी महाराज डुबेरेत राहिले अन् नंतर ते विश्रामगडावर मुक्कामासाठी गेले, असे ग्रामस्थ सांगतात. ठाणगाव रस्ता सोडून डुबेरे गावच्या उत्तर वेशीतून गावात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला असलेले लाकडातील जुन्या बांधणीचे मारूती मंदिर आपले स्वागत करते. हे मंदिर शके १८१९ मध्ये बांधल्याचा शिलालेख या मंदिरावर आहे. मारूती मंदिरासमोर ठेवलेले मोठाले दगडाचे गोळे खांद्यावर घेऊन गणपती मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा येथे आहे. मंदिराशेजारी छोटेखानी शनीमंदिर आहे. मंदिरासमोरून गावात प्रवेश करताना बाजीराव रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या भक्कम दगडी पाठांवरील मोठाली कौलारू घरे डुबेरेचे वेगळेपण सांगतात.

थोडे पुढे उजव्या हाताला नक्षीदार शिल्पांनी मोहरलेले दुमजली जैन मंदिरही येथील एक आकर्षण आहे. मंदिरावरील शिल्प व दगडावरील कोरीवकाम पाहण्यासारखी आहेत. जैन म‌ंदिरासमोरून डोकी नाल्याकडे जाणारा रस्ता आपल्याला भोपळ्याच्या झाडाकडे घेऊन जातो. भोपळ्याचे झाड डुबेरेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या झाडाखाली एक समाधीही आहे. ती कोणाची अन् हे झाड डुबेरेत कोठून आले, असा प्रश्न अनेकांना पडतो. हे झाड सिग्नोनियेसी फॅमिलीतील भोपळा सदृष्य प्रकार आहे. याचे वय साधारण शंभर वर्ष असावे. याचे शास्त्रीय नाव क्रिसेन्शीया कुजेटा असे असून, सर्वसाधारण नाव बेगर्स बाऊल अथवा कॅलॅबॅश ट्री असे आहे. या फळापासून भिक्षेचा कटोरा व एकतारीचा तुंबा बनविला जातो.

भारतात अन्यत्रही हे झाड आढळते. हे झाड येथे कोठून आले याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. या झाडाखाली असलेली समाधी गोपाळा फकीरा या व्यक्तीची आहे. हा व्यक्ती एका इंग्रज अधिकाऱ्याकडे कामाला होता. तो इंग्रज अधिकारी भारत सोडून जात असताना त्याने फकीराला विचारले की, ‘तुला काय हवे आहे.’ तेव्हा फकीराने ‘तुमचा देश पाहायचा आहे’, अशी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा त्या इंग्रज अधिकाऱ्याने पूर्ण केली व फकिरा मायदेशी परतताना भेट म्हणून त्याला या झाडाचे रोप दिले. तेव्हापासून हे झाड येथे आहे. या झाडाच्या फळाला बी नसते त्यामुळे डुबेरेत हे एकमेव झाड आहे. ते भोपळ्याचे झाड फकिराच्या समाधीची साथ देत आपल्या अंगाखांद्यावर उमलणारी फुले त्या समाधीवर शिंपडताना दिसते.

हा सोहळा अनुभवून पुन्हा मुख्य बाजीराव रस्त्यावर यायचे. येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या आवारातील पेशव्यांचा रणधुरंधर पुतळा समोरच्या भिंतीकडे लक्ष वेधायला लावतो. ही भिंत म्हणजे बर्वे वाड्याची उत्तर दिशेकडची तटबंदी आहे. तटबंदी पाहत बुरजाच्या दिशेने निघाले की, डाव्या हाताला वाड्याच्या पूर्वेला पण पश्मिमेकडे तोडं करून उभे असलेले मुख्य प्रवेशद्वार वाड्याची शान दाखवितो. आत गेल्यावर डावीकडे पूर्व दरवाजा वाड्याचा साज अनुभवण्यासाठी आपल्याला आत खेचून नेतो. बर्वे वाड्यात आजही बर्वे कुटुंबीय राहतात, अशी माहिती प्रा. चंद्रशेखर बर्वे यांनी दिली. वाड्यातील तीन चौक, लाकडी खांबांवरचे रेखीव नक्षीकाम, लक्ष्मीनारायण मंदिर, आड, घोड्यांची पागा, प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे वाडा संस्कृतीच्या सर्व खाणाखुणा दाखवितात. बाजीराव पेशव्यांचा जन्म झालेल्या खोलीत ठेवलेले त्यांचे तैलचित्र, तलवार, भाला, ढाल, चिलखत आदी शस्त्रे या योद्ध्याचा पराक्रम जागवितात. बर्वेंकडील अनेक मोडी कागदपत्रे नगरच्या संग्रहालयात आहेत. बाजीरावांचा जन्म डुबेरचाच असावा, याला कागदोपत्री पुरावे नाहीत.

मात्र, परिस्थितीजन्य अभ्यासातून हे पुढे आले अन् प्रचलित झाले असल्याचे प्रा. बर्वे सांगतात. बाजीरावांची म्हणजे बाल विसाजीपंतांची मुंज त्र्यंबकेश्वर येथे झाल्याचे पुरावे मात्र मिळाले आहेत. त्यामुळे बाजीरावांचे बऱ्यापैकी बालपण डुबेरेतच गेले असावे. त्यांच्या मुंजीबाबत एक गंमतीशीर किस्सा मोडी कागदपत्रांतून पुढे आला आहे. विसाजींची मुंज करण्यास त्र्यंबकेश्वरमधील एक प्रसिद्ध क्षेत्रोपाध्ये तयार नव्हते. कारण त्यावेळी विसाजी सरदाराचा मुलगा होता. ते क्षेत्रोपाध्ये छत्रपती व बड्या अधिकारातील व्यक्तींच्या कुटुंबीयांचे विधी करत असत. बाळाजी विश्वनाथांची बरीच विनंती करूनही त्यांनी मुंज केली नाही. अखेर त्र्यंबकमधील रूईकर या क्षेत्रोपाध्येंनी विसाजीपंतांची मुंज केली. विसाजी जेव्हा बाजीराव पेशवे झाले तेव्हा त्यांनी याच रूईकरांची हत्तीवर मिरवणूक काढून त्यांचा सन्मान केला व इनामे दिली.

बाजीराव पेशवे डुबेरेला पुन्हा कधी आल्याचा उल्लेख मात्र मिळत नाही, असे इतिहास अभ्यासक प्रा. रामनाथ रावळ सांगतात. गावातील बर्वे वाडा डुबेरेची शान असल्याचे ग्रामस्थ अभ‌िमानाने सांगतात. कारण डुबेरेला आज मिळालेला नावलौकिक डुबेरेतील नटसम्राट म्हणून प्रसिद्ध पावलेले अभिनेते दत्ता भटांमुळे मिळालेला आहे. १९७८ मध्ये इतिहासाचार्य सेतू माधवराव पगडी व दत्ता भटांची मुंबई भेट झाली. या भेटीत दत्ता भटांनी सेतू माधवराव पगडींना बाजीराव पेशवेंचा जन्म डुबेरेत झाल्याचे सांगितले अन् त्यांना डुबेरेत घेऊन आले. सेतू माधवराव पगडींनी कागदपत्रांचा अभ्यास करून डुबेरेच पेशव्यांचे जन्मस्थान असल्याबाबत वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिला. तेव्हापासून डुबेरेची ओळख देशभर झाली. म्हणून डुबेरे गावचा इतिहास पुस्त‌िकेच्या रूपाने संकलित करण्याची गरज आहे.

डुबेरेतील बर्वे वाड्यातून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला सटवाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिरात देशविदेशातून भाविक येतात. ‘सटीचा लेखा जोखा, न चुके ब्रम्हादिका’ हे मंदिराच्या प्रवेशद्वारावर लिहिलेल्या वाक्यावरून मंदिराचा महिमा समोर येतो. बाळ जन्मल्यानंतर सटवाई त्याच्या भाळी भविष्य लिहिते व ब्रह्मदेव ते वाचतो, अशी अख्यायिका मंदिरातील पुजारी नामदेव मुजगुडे सांगतात. मंदिरात सटवाईची शीळा आहे अन् पंचधातूची मूर्ती आहे. मूर्तीमागे लाकडावर नक्षीकाम असलेली जुनी मखर ठेवलेली आहे. मंदिरात वंशउद्धारासाठी येणारे भाविक नवसपूर्तीसाठी देवीला पाळणा अर्पण करतात तर पाळणा येथून घरी घेऊन जाण्याचीही येथे प्रथा आहे. नवसपूर्ती म्हणून आई केसाने देवीमंदिराचा ओटा साफ करते, अशीही प्रथा असल्याचे मुजगुडे सांगतात.

सटवाईचे मंदिरातून बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्यावरील डोकी नाल्यावरील पूल ओलांडून थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला अहिल्याबाईंची बारव व महादेव मंदिर पहायला मिळते. दगडी बांधणीचे महादेव मंदिर पेशवाईतील आहे व त्या शेजारील अहिल्याबाईंची बारवेची अवस्था मात्र दयनीय आहे. या बारवेला पुनर्वैभव मिळवून दिल्यास ही बारव देखील डुबेरेचे एक वैशिष्ट्य ठरेल. गावात आणखी एक बारव होती, पण ती बुजविली आहे. या बारवेपासून जवळच गोसावी समाजातील अज्ञात व्यक्तीची समाधी आहे. येथून पुन्हा ठाणगाव रस्तावर आल्यावर डावीकडून डुबेरे गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डुबेरेचे ग्रामदैवत भैरवनाथाचे नव्याने बांधलेले सुंदर मंदिर आहे. गावात कोणाला सर्पदंश झाल्यावर त्या व्यक्तीला भैरवनाथाच्या सहवासात आणल्यास सर्पदंशाचा त्रास होत नाही, अशी अख्यायिका असल्याचे राजाराम वाजे, दत्ता पावशे व आयुब शेख सांगतात. डुबेर गडाचा वापर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी चौकी म्हणून केला जाई. पूर्वी या गडाभोवती डुबेरे गाव वसलेले होते. सध्याचे गाव बर्वे वाडा बांधल्यानंतर वाड्याभवती वसले. डुबेर गडावर गडाच्या खाणाखुणा नाहीत; मात्र गडावर सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर आहे.

डुबेरे श्रीमंत बाजीराव पेशव्यांसाठी जसे ओळखले जाते तसेच ते नटसम्राटांचे गाव म्हणून ओळखले जाते, असे नारायण वाजे आवर्जून सांगतात. कुसुमाग्रजांचे ‘नटसम्राट’ नाटक प्रचंड गाजले. या नाटकातील नटसम्राटांची भूमिका वठविलेले दत्ता भट (दत्तात्रेय रामचंद्र भट) यांचा जन्मही डुबेरेतीलच. दत्ता भट यांची ताकद मराठी रंगभूमीला आणि प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने जाणवली ती त्यांनी नटसम्राट या नाटकातील अप्पा बेलवलकर यांच्या भूमिकेमुळेच. कारण नटसम्राट ही भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. यामुळे हे आव्हान त्यांनी खुबीने पेलले. नाशिकमध्ये राहिलेला, शिकलेला हा माणूस मुंबईत आला आणि मराठी नाटक, चित्रपटाच्या दुनियेत आपला प्रभाव पाडून गेला. केवळ अभिनयच नाही तर नाट्यलेखन, दिग्दर्शनही केले. बाजीराव पेशवे, वाडा संस्कृती, सटवाईचे महात्म्य, अहिल्याबाईंची बारव, महादेव मंदिर, गोसाव्याची समाधी, दत्ता भटांच्या आठवणी, जैन मंदिर, भैरवनाथ मंदिर अन् डुबेरेचा टेहाळणी गडाबरोबर गर्द झाडीत वसलेले हे गाव आपला प्रवास ऐतिहासिक करते.

 

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate