অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्रातील लेण्या

नाशिक येथे असणार्‍या पांडवलेण्यांमुळे ‘लेण’ हा शब्द आला. त्यापासूनच लेणी हा शब्द रूढ झाला. लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम होय. लेणी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा एकसंध व कणखर स्वरूपाचा दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. महाराष्ट्रात बौद्ध, जैन, हिंदू या धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतात. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असणार्‍या अजिंठा-वेरूळ येथील लेणी या महाराष्ट्रात आहेत. या लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच आहेत. इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. आठवे शतक या काळात औरंगाबादमधील अजिंठा आणि वेरुळ येथे या लेणी निर्माण करण्यात आल्या.

अजिंठा

अजिंठ्याच्या एकूण ३० लेणींपैकी काही लेणी खूपच अप्रतिम आहेत. सह्याद्री पर्वताजवळ वसलेल्या अजिंठा गावाच्या वायव्येस एका डोंगरात अजिंठा लेणी कोरलेली आहे. या डोंगररांगेतील बेसॉल्ट जातीचा एकसंघ दगड या लेणी निर्माण करण्यासाठी खूप उपयोगी ठरला आहे. एकूण ३० गुहांचा समावेश असणार्‍या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौद्धधर्मीय लेणींचा समावेश होतो. इ.स. ६०२ ते इ. स. ६६४ या काळात युऑन श्वॉंग हा चिनी प्रवासी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता. त्याने अजिंठ्याच्या लेणीला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडत नसला, तरी त्याने या लेणींविषयी जे लिहून ठेवले आहे, त्यावरून या लेणींच्या तत्कालीन वैभवाची आपल्याला कल्पना करता येऊ शकते.

वेरूळ

अजिंठा येथील लेणी ज्या चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत त्याच कारणांमुळे वेरूळ येथील लेणीदेखील प्रसिद्ध असून, त्यास मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली ती येथील ‘आधी कळस मग पाया’ ही नवी म्हण निर्माण करणार्‍या ‘कैलास मंदिरामुळे.’ औरंगाबादपासून वायव्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात वेरूळच्या लेणी वसलेल्या आहेत. अहल्याबाई होळकर यांनी या कैलास लेण्यांचा जीर्णोद्धार केला.

अजिंठा-वेरूळ येथील लेणींनी जरी महाराष्ट्राचे, भारताचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात पसरवलेले असले, तरी महाराष्ट्रातील इतर छोट्या लेणींचे महत्त्वही काही कमी नाही. या छोट्या लेणीदेखील राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत.

घारापुरी

प्राचीन काळी ‘श्रीहरी’ असे नाव असलेल्या सध्याच्या घारापुरी या बेटावर शैव संप्रदायाच्या लेणी आहेत. मुंबईपासून ११ कि.मी. अंतरावर समुद्रात घारापुरी या बेटावर या लेणी आहेत. इ.स. ३ ते इ.स. ७ या काळात या लेणींची निर्मिती झाली असे मानले जाते. या लेणींमधील अकरा हात उंचीची तीन मुखे असलेली शिवाची मूर्ती जगातील भव्य आणि सुंदर अशा शिल्पांपैकी एक समजली जाते. अर्धनारीनटेश्वराची मूर्तीदेखील या ठिकाणी बघायला मिळते. पूर्वी या बेटाच्या (पान १ वरून)

दक्षिणेला एक मोठा दगडी हत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. त्या हत्तीवरूनच या लेणींना ‘एलिफंटा केव्ह्‌ज’ हे नाव मिळाले. हा हत्ती सध्या मुंबईतीलच जिजामाता उद्यान (जुने नाव राणीची बाग) येथे आहे. या लेणींचादेखील ‘जागतिक वारसा’ च्या यादीमध्ये समावेश झाला आहे.

पांडव लेणी

पांडव लेणी या नाशिकमध्ये ‘पांडवलेणी’ या नावानेच ओळखल्या जाणार्‍या डोंगरावर आहेत. याच लेणींमध्ये प्रथम ‘लेण’ हा शब्द आला व त्यापासून पुढे ‘लेणी’ हा शब्द तयार झाला. यामध्ये एकूण २४ लेण्या असून त्या सर्व हीनयान पंथीय (बौद्ध धर्मीय) आहेत. १२०० वर्षांपूर्वी या लेण्यांची निर्मिती झाली. या लेणी पूर्व दिशेला तोंड करून असल्यामुळे तेथून सूर्योदयाचे सुंदर दर्शन होते. या लेणींमधील ‘चैत्य’ ही लेणी खूप सुंदर आहे. या लेण्यांमध्ये असणार्‍या बोधिसत्व, गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना स्थानिक जनता पाच पांडवांच्या मूर्ती समजते. त्यामुळे कदाचित या लेण्यांना पांडव लेणी म्हणत असावेत, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात.

कान्हेरी

बोरिवली येथे कान्हेरीच्या लेणी वसलेल्या आहेत. इ.स. पू. १ ले शतक ते इ.स. ९ वे शतक या काळात या लेणींची निर्मिती झालेली आहे. यामध्ये १०९ छोट्या-छोट्या लेणी आहेत. यातील प्रत्येक लेणीला दगडाच्या जोत्यावर उभे करण्यात आले आहे. या लेणींची एकंदर रचना पाहता येथे बर्‍याच बौद्ध भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था केली होती हे लक्षात येते. बेसॉल्ट खडकावर या लेणींची निर्मिती झालेली आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात या लेण्या आहेत. या लेणींच्या पायथ्याशी-सभोवताली दाट जंगल असल्याने येथील थंड हवा, शांतता, निसर्गरम्यता, प्राणिदर्शन आणि शिल्पकला या सर्वांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.

कार्ला

सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कार्ला येथे या लेणी आहेत. बौद्ध भिक्षुंनी या लेणी बांधल्या, कोरल्या. इ.स.पू. ३ रे व २ रे शतक या काळात थरवेदा या बौद्ध भिक्षूने लोणावळ्याजवळील निसर्गरम्य भागात या लेणींची निर्मिती केली. भारतात ज्या काही मोजक्या दगड कापून तयार करण्यात आलेल्या लेणी आहेत, त्यात यांचा समावेश होतो.

याशिवाय महाराष्ट्रात भाजे (जि. पुणे), जिंतूर (जि. परभणी), बेडसे (जि. पुणे.), हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर या ठिकाणी देखील हिंदू, जैन, बौद्ध धर्मीय लेणी आहेत. इतिहासाचा मागोवा घेतला, तर असे लक्षात येते की तत्कालीन राज्यकर्त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अमलात आणून त्याद्वारे शिल्पकलेच्या विकासाला चालना दिली. अशा या समृद्ध वारशाचे आपण सर्वांनीच जतन करायला हवे.

माहिती संकलन - अमरीन पठाण

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate