অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यंदाच्या पावसाळी, गडांवर स्वारी!

पावसाची पहिली सर येताच घरात बसून गरम चहा आणि कुरकुरीत कांदा भजीचा स्वाद घेण्याची बातच काही और असते. परंतु पावसाळी वातावरण भ्रमंतीसाठी सुद्धा अतिशय योग्य असते. काहींना आवड असते ती पावसाळ्यात आरामात फिरण्याची, तर काहींना आवडतात साहसी सहली. ‘ट्रेक्स’ च्या माध्यमातून विविध गडकिल्ल्यांना भेट देऊन ह्या दोन्ही इच्छा समाधानकारक पूर्ण होवू शकतात. महाराष्ट्रात एकूण ५४६ गडकिल्ले आहेत. त्यातील काही गड किल्ल्यांची माहिती आपण येथे घेऊ या !

राजमाची

सह्याद्री पर्वतरांगेत २७१० फूट उंच उभा राजमाची हा अनेक ट्रेकर्सचा अतिशय आवडता किल्ला आहे. ह्या किल्ल्याचे दोन भाग आहेत - श्रीवर्धन व मनरंजन, ज्यांच्या वाटा एका दिव्य कालभैरव मंदिराकडे एकत्र येतात. ज्यांना हे दोन किल्ले दोन दिवसांत पूर्ण करायचे असतील त्यांच्यासाठी ह्या मंदिराचा परिसर ‘कॅम्पिंग साईट’ म्हणून उपयोगी ठरतो. परंतु हा ट्रेक एका दिवसांत पूर्ण होऊ शकतो. राजमाचीला जाण्याचे दोन मार्ग आहेत- कर्जत आणि लोणावळा. दोन्ही मार्ग उधीवडे जवळ मिळतात. उधीवडे हे राजमाचीचे ‘बेस व्हिलेज’ आहे. कर्जतहून जाणारा ट्रेकिंगचा रस्ता लोणावळ्यापेक्षा थोडा कठीण आहे. पण लोणावळ्याचा रस्ता लांबचा पडतो. जर तुम्ही कर्जतमार्गे चढून लोणावळ्याच्या दिशेने उतरलात तर एक अधिक दिवस घेऊन लोणावळा फिरण्याचा बेतही तुम्ही करु शकता. राजमाचीला जाण्याकरीता तुम्हाला कर्जतला लोकलने जावे लागेल. कर्जत रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनेक स्थानिक वाहने उपलब्ध असतात, ज्यांच्या मदतीने तुम्ही राजमाचीला पोहोचू शकता. कर्जत रेल्वे स्टेशनकडून तुम्ही खाजगी ऑटोरिक्शाने जाऊ शकता, पण जर तुम्ही मोठ्या संख्येत गेलात तर तुम्ही १० सीटर रिक्शाचा वापर करुन काही पैसे देखील वाचवू शकता. राजमाचीच्या चारही बाजूस रुंद पठार पसरलेले आहे व हेच ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. हा सोप्पा किंवा मध्यम पातळीचा ट्रेक आहे व हे तुम्ही कोणता मार्ग निवडता ह्यावर अवलंबून आहे.

तिकोणा

तिकोणा किल्ला ‘वितंडगड’ या नावाने देखील प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ६० कि.मी. अंतरावर असलेला हा किल्ला समुद्राच्या पातळीपासून ३५०० फूट उंच आहे व त्याचा आकार त्रिकोणी असल्याने त्याला ‘तिकोणा’ असे नाव पडले आहे. ह्या किल्ल्याकडे जाण्यासाठी, लोणावळा बायपासकडे डाव्या बाजूला वळून पावनगरच्या दिशेने जावे लागते. लोणावळा पोलीस स्टेशन ही निशाणी लक्षात ठेऊन पावनाला जायचे जेथून किल्ला फक्त २० कि.मी. दूर आहे. ह्या किल्ल्याचा ट्रेक तिकोणा पेठ पासून सुरु होतो. तिकोणा पेठ ह्या किल्ल्याचे ‘बेस व्हिलेज’ आहे. ‘भुयारी दरवाजा’ ह्या एका लहानशा गुहेतून ह्या किल्ल्यात आपला प्रवेश होतो. भव्य प्रवेशद्वार, त्रिंबकेश्वर मंदिर, गुहा, कळसावरुन दिसत असलेले लोहगड-तुंगा-विसापूर ह्या गडांचे सुंदर दृश्य आणि गडावर असलेले पावना तलाव हे ह्या किल्ल्याची खासियत आहे.

कोरिगड

अनेक ट्रेकर्सचे नंदनवन मानला जाणारा हा किल्ला, नव्याने ट्रेकिंग सुरु केलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत योग्य पर्याय आहे. कोरीगड लोणावळ्याच्या जवळ असून तो ३०२८ फूट उंच आहे. ह्या गडाकडे पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लोणावळा स्टेशनपासून एखादे स्थानिक वाहन घेणे. ह्या किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचे दोन मार्ग आहेत. पेठ शहापूर द्वारे जे ह्या किल्ल्याचे बेस व्हिलेज आहे व अंगावणे गावाद्वारे. पेठ शहापूर वरुन, भैरवनाथ मंदिराकडे सुरुवात होणाऱ्‍या ५१० पायऱ्‍या ह्या किल्ल्याचा बहुतांश भाग पूर्ण करतात, ज्याने हा मार्ग ट्रेकिंगदृष्ट्या सोपा पडतो. १६५७ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कोरीगड जिंकला होता, परंतु ११ मार्च, १८१८ रोजी इंग्रजांनी त्याच्यावर परत कब्जा मिळवला. गडावर स्थानिक देवता, कोराईदेवीचे एक सुंदर मंदिर आहे, ज्याचे हल्लीच नुतनीकरण करण्यात येऊन तेथे ३ फूट उंच दिपमाला बांधण्यात आली आहे. ह्या किल्ल्याचे अजून एक आकर्षण म्हणजे येथील ६ तोफा ज्यामध्ये लक्ष्मी तोफ ही सगळ्यात मोठी तोफ आहे. कोरीगडचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या कळसाची परिमिती २ कि.मी. रुंद आहे व हे क्षेत्र कॅम्पिंगसाठी सुद्धा वापरता येऊ शकते. कोरीगडावर दोन तलाव आहेत, जे ह्या किल्ल्याची शोभा दुप्पट करतात.

कळसुबाई

५४०० फूट उंच कळसुबाई हे सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर आहे. प्रत्येक ट्रेकर किमान एकदा हा ट्रेक जरुर करु पाहतो. कळसुबाईला जाण्याकरीता सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे कसारा रेल्वे स्टेशन, जेथे उपलब्ध असलेल्या स्थानिक वाहनाने बरी गावात पोहचावे लागते. कळसुबाई पुण्याहून १७५ कि.मी. तर मुंबईहून १५३ कि.मी. च्या अंतरावर आहे आणि म्हणूनच रस्त्याचा प्रवास करताना हा वेळ लक्षात घेऊन आपले वेळापत्रक बनवावे. स्थानिक देवता कळसुबाईचे मंदिरही ह्या किल्ल्यावर आहे. ह्या मंदिराने किल्ल्याची प्रसन्नता अधिकच वाढते. हा ट्रेक मध्यम किंवा अवघड पातळीचा आहे. पण ह्याची वाट चिन्हांकित आहे. दाट धुके व जोरदार वाऱ्‍याचा आनंद लुटण्यासाठी हा ट्रेक खास पावसाळ्यात केला जातो. पण ह्या मोसमात आपल्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

लोहगड

जर तुम्हाला ट्रेकिंग सोबत फोटोग्राफीची आवड असेल तर लोहगड तुमच्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. तर तुम्हाला एक दिवस निसर्गशोभेच्या संगतीत घालवायचा असेल तर हा सोप्या पातळीचा ट्रेक तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. बरेचदा लोहगड आणि विसापूर एकत्र एका दिवसात पूर्ण केले जातात. मळवली किंवा लोणावळा ही स्टेशने लोहगडसाठी सगळ्यांत जवळची आहेत. तेथून भाजे गावाकडे जायचे जे ह्या ट्रेकसाठी बेस व्हिलेज आहे. लोहगड समुद्राच्या पातळीपासून ३३८९ फूट उंच आहे व आपल्या उदात्त प्रवेशद्वारासाठी प्रसिद्ध आहे. बहुतांश रस्ता हा पायऱ्‍यांचा असल्यामुळे, ट्रेकिंगचा अनुभव नसलेले देखील हा ट्रेक सहज पूर्ण करु शकतात. लोहगड हे विविध जीवजंतू व पक्षांचे घर आहे, ज्यामुळे फोटोग्राफीसाठी येथे भरूपर वाव मिळतो. लोहगडाच्या ‘विंचूकाट्यावरुन’ दिसणारे विहंगम दृष्याने नक्कीच तुमचे भान हरपून जाईल. बरेच ट्रेकर्स थोडं फिरुन भाजे लेणी बघून कळसाच्या दिशेने जातात. भाजे लेणी फोटोग्राफीसाठी अत्यंत देखण्या आहेत.

सिंहगड

पूर्वी ‘कोंढाणा’ या नावाने प्रसिद्ध असलेला सिंहगड महाराष्ट्राचा खूप मौल्यवान ऐतिहासिक ठेवा आहे, असे म्हणण्यास काही हरकत नाही. सिंहगड मध्य पुण्यापासून फक्त ३० कि.मी. दूर आहे. जरी हा किल्ला ४३२० फूट उंच असला तरी हा ट्रेक एक ते दीड तासांत पूर्ण होऊ शकतो. गडावर पिठलं-भाकरीचे जेवण तुम्ही चुकवू शकत नाही. त्याच्या सोबत असलेला झणझणीत मिर्चीचा ठेचा, कांदा भजी, मटका दही आणि ताक जेवणाची चव चौपट वाढवतात ! सिंहगडापर्यंत ट्रेक करण्यासाठी अटेकर वस्तीच्या रस्त्याचा वापर करावा आणि ज्यांना एक दिवसीय सहल करायची आहे, ते सिंहगड घाटाचा रस्ता घेऊन वाहनाच्या मदतीने गडावर पोहचू शकतात; परंतु हा रस्ता अरुंद असून एवढ्या चांगल्या परिस्थितीत नाही, पण आम्ही तुम्हाला पावसाळ्याची मौज लुटण्यासाठी ट्रेक करण्याचा सल्ला देऊ. सिंहगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे तानाजी मालुसरेंची समाधी, तानाजी कडा आणि लोकमान्य टिळकांचा बंगला.

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड ट्रेक हे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असते. हा अतिशय कठीण पातळीचा ट्रेक आहे व जहाल पाऊस आणि कठोर पर्वतारोहणाच्या अनुभवासाठी अत्यंत योग्य आहे. हरिश्चंद्रगड ४६७१ फूट उंच असून हा ट्रेक दोन दिवसांत पूर्ण करावा असा सल्ला आम्ही देऊ. ह्या किल्ल्यामध्ये नऊ गुहा आहेत, ज्यातील दोन गुहा साधारण १००-१५० व्यक्ती मावतील इतक्या प्रशस्त आहेत. ह्या गुहा पावसापासून तुम्हाला निवारा देऊ शकतात. ह्या संपूर्ण ट्रेकमध्ये अद्वितीय निसर्गशोभा व बहुरंगी वनस्पती आणि पशुवर्गांशी तुमची ओळख होईल. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरुन दिसणारे दृश्य तुमचा सगळा त्रास नाहीसा करतो. हा गड अहमदनगरमध्ये आहे व तेथे पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत.

  1. खिरेश्वरद्वारे जाणारा मार्ग जो प्राधान्याने वापरला जातो कारण तो मध्यम कठीण पातळीचा असून खूप सुंदर आहे.
  2. ‘नळीची वाट’ हा मार्ग अतिशय कठीण आहे.
  3. पाचनाई गावाद्वारे जाणारा रस्ता जो सगळ्यात सोपा आहे.

कामणदुर्ग

तुंगारेश्वर, वसई जवळ असलेला कामणदुर्ग बऱ्‍याच लोकांसाठी अज्ञात आहे. सायकलिंग आणि ट्रेकिंगसाठी हा गड योग्य आहे. वसई-पनवेल लाईनवरचे कामणरोड स्टेशन सगळ्यात जवळचे स्टेशन आहे; परंतु वसईपासून कामणदुर्ग फक्त १५ कि.मी. च्या अंतरावर असल्याने वसईद्वारे चिंचोटी-अंजूर फाटा घेऊन सुद्धा जाऊ शकतो. पण हा अत्यंत कठीण पातळीचा ट्रेक आहे आणि सायकलिंग करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

तर उठा मग ! तयारीला लागा आणि यंदाचा पावसाळा निसर्गाच्या सोबतीत घालवा !

 

लेखिका - मधुरा पाटकर

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate